BREAKING NEWS
latest

डोंबिवलीकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित किलबिल फेस्टिवल मध्ये बच्चे कंपनीची उत्साहात धमाल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  बाल दोस्तांच्या आवडीचा 'किलबिल फेस्टिवल' आज १० नोव्हेंबरला बालगोपाळांच्या धमाल मजा मस्तीत डोंबिवलीच्या रेल्वे मैदानावर प्रचंड उत्साहात साजरा झाला. डोंबिवलीकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित या किलबिल फेस्टिवलचे यंदाचे १२ वे वर्ष होते. हजारो मुला मुलींनी या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. लेखक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात मुक्ताईची मुख्य भूमिका करणाऱ्या इश्मिता जोशी आणि ज्ञानेश्वरांची भूमिका करणाऱ्या मानस बेडेकर या वेध अकॅडेमीच्या डोंबिवलीकर बालकलाकारांच्या हस्ते फेस्टिवलचे उदघाटन झाले.
डोंबिवलीत वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते पण बालगोपाळांसाठी डोंबिवलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल म्हणजे बाळगोपाळांसाठी हक्काचा खराखुरा बालदिन. मुलांना  खेळा-शिका-स्वतः बनवा या संकल्पनेच्या माध्यमातून हा मौज मजा धमाल मस्तीचा अविस्मरणीय उत्सव सुरु झाला. त्यात मुलं चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर करतात,  कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी घडवतात, वायरची खेळणी कशी बनवतात ते शिकतात. याच बरोबर  बोलक्या बाहुल्या, जम्पिंग मून वॉक,  बालनाट्य, जादूचे प्रयोग असे कार्यक्रमही पाहायला मुलांबरोबर आई बाबा आजी आजोबांचे मनही बालक होऊन जातं अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेक डोंबिवलीकर पालकांनी दिली. मुलं आणि पालक इतके हरवून गेलेले की उत्सव प्रवेशद्वारापासून ते आत मध्ये प्रत्येक बहुरूपी व्यक्तिमत्वांबरोबर छायाचित्र काढण्याची चढाओढ लागली होती.  

यंदा तर 'थाऊसंड हँड डान्स ग्रुप' आणि 'झिरो डिग्री डान्स', हा भन्नाट डान्स आकर्षणाचा विषय ठरला.  याच बरोबर जायंट पांडा, टेडी बेअर, हेडलेस मॅन, अल्लाउद्दीनचा जिन अशा विविध बहुरूप्यांसोबत   सेल्फी काढण्याची बालदोस्तांची स्पर्धा लागली होती. 
साहसी खेळांमध्ये कमांडो ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायंबिंग या थरारक प्रकारांनी यावर्षीही मुलांची गर्दी खेचली तर तांदुळावर नाव कोरणे, मेहंदी, लाखेच्या बांगड्या हे लाडक्या छोट्या बहिणीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. डोंबिवलीकर किलबिल महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व खेळ आणि सुविधा डोंबिवलीकर बाळ गोपाळांसाठी मोफत असतात त्यामुळे डोंबिवलीच्या कानाकोपऱ्यातून किलबिल फेस्टिवलला कुटुंब आवर्जून हजेरी लावतात असे आयोजकांनी सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत