BREAKING NEWS
latest

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रात मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जाण्यास मनाई - अशोक शिनगारे

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात एकूण ६ हजार ९५५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतदान केंद्रात छायाचित्र ओळखपत्राशिवाय मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करु नये, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. 

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना त्यांचा मतदान करण्याचा हक्क अधिक प्रभावीपणे बजावता यावा यासाठी सर्व मतदारांनी त्यांचे मतदान करण्यापूर्वी, मतदान केंद्रामध्ये ओळख पटविण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणे अपेक्षित आहे. ज्या मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणे शक्य होणार नाही, ते त्यांची ओळख पटविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे आधारकार्ड, मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड), बँक टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रममंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक लायसन्स, स्थानी खाते क्रमांक (पॅनकार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), केंद्र सरकार/ राज्यशासन / सार्वजनिक क्षेत्र उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद सदस्य / विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य यांनी  दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र (यूडीआयडी), सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आदी दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत सर्व नागरिकांनी मतदान करुन आपला राष्ट्रीय हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी नागरिकांना केले आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत