डोंबिवली : दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील दिनांक १६ नोव्हेंबर रोजी वार्षिक खेळ स्पर्धा 'जे एम एफ' संस्थेच्या 'ब्रह्मा रंगतालय ' मैदानावर आयोजित करण्यात आली होती. इयत्ता शिशु विहार ते दहावी पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला होता. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे तसेच प्रमुख पाहुण्या पॉवर लिफ्टींग मधे सुवर्ण पदक विजेत्या व राष्ट्रीय पातळीच्या खेळाडू कु. प्रतिभा लोणे तसेच इतर पदाधिकारी यांची उपस्थिती प्रार्थनीय होती.
संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व प्रमुख पाहुणे यांनी क्रीडा मशाल पेटवून खेळ स्पर्धेला हिरवा कंदील दर्शवला. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली, तर कु. प्रतिभा लोणे यांनी शपथ विधी ग्रहण केला. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण स्पर्धा खेळामध्ये धावणे बरोबरच बुध्दी व शरीराला चालना देणारे वेगवेगळ्या खेळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मैदानी खेळ तसेच बैठे खेळामध्ये देखील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. "हिप हिप हुर्रे" च्या नादात सर्व विद्यार्थी मित्र आपापल्या मित्राला, संघाला प्रोत्साहित करत होते. शिशु विहारच्या सर्व मुलांना विजेते घोषित करून त्यांना पाहुण्यांच्या हस्ते बॅट-बॉल बक्षीस देण्यात आले तर इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना सापशिडी बक्षीस देण्यात आली. सकाळी आठ ते अकराच्या सत्रात जल्लोषात 'ऍन्युअल स्पोर्ट्स डे' साजरा करण्यात आला. सर्व जिंकलेल्या मुलांना अनुक्रमे सुवर्ण,चंदेरी व ताम्र प्रशस्तीपत्रक व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्व विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले. जिंकणे किंवा हारणे हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणे म्हणजे स्वप्नपूर्ती होय. आज ज्या विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही त्यांनी नाराज न होता, आपल्या मित्राच्या जिंकण्यांमधे उस्फूर्तपणे तुम्ही जल्लोष करून जी दाद दिलीत तिथेच तुम्हीही जिंकलात, असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना सांगून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. मनाचा, बुद्धीचा आणि शरीराचा विकास होण्यासाठी खेळ खेळणे हे निरोगीपणाचे लक्षण आहे, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले, योगा, धावणे, ध्यानधारणा, तसेच मैदानी खेळ हे आपल्या शरीराला चालना देण्याचे काम करतात, यामधे हार किंवा जीत हा मुद्दाच येत नाही त्यामुळे दीर्घायुषी राहण्यासाठी अभ्यासाबरोबरच खेळाकडे ही लक्ष द्या असे सांगून सर्व मुलांचे अभिनंदन केले.
प्रमुख पाहुणे प्रतिभा लोणे यांनी देखील स्वतःचे अनुभव सांगून मुलांना प्रोत्साहित केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी व दहावी मधील रिवा चौरसिया व इव्हा शॉ यांनी केले, तर निषाद रानडे यांनी आभारप्रदर्शन करून, संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा