BREAKING NEWS
latest

कुशल नेतृत्व,कर्तृत्व,वक्तृत्व यांचा सुरेख संगम अटलबिहारी वाजपेयी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कवी मनाचे, प्रखर राष्ट्रवादी अशी प्रतिमा असणारे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती. २५ डिसेंबर १९२४ रोजी जन्मलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एमए ची पदवी मिळवली. पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करता करता त्यांनी पत्रकारिताही केली. राष्ट्रधर्म, पांचजन्य आणि वीर अर्जुन या नियतकालिकांसाठी त्यांनी पत्रकारिता केली. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेऊन त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५१ साली जनसंघांची स्थापना केली. जनसंघाच्या स्थापनेत श्यामाप्रसाद मूखर्जी इतकाच अटलबिहारी वाजपेयी यांचाही वाटा आहे. 

१९५७ साली पहिल्यांदा ते जनसंघाच्या तिकिटावर लोकसभेत पोहचले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी त्यांनी लोकसभेत ठसा उमटवला. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आवर्जून लोकसभेत उपस्थित राहत. पंडित जवाहरलाल नेहरु अटलजींच्या वक्तृत्वाने मोहित झाले होते. अटलबिहारी वाजपेयी एकदिवस भारताचे पंतप्रधान बनतील असे भविष्य त्यांनी वर्तवले होते. अटलबिहारी वाजपेयी सलग ९ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. १९६८ साली ते जनसंघाचे अध्यक्ष बनले. पक्षाध्यक्ष या नात्याने जनसंघ घरोघरी पोहचवण्याचे काम त्यांनी केले. त्याचवेळी विरोधी पक्षाची भूमिकाही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे बजावली. १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. या आणीबाणीला त्यांनी प्रखर विरोध केला. आणीबाणीला विरोध केला म्हणून त्यांना दोन वर्षाचा कारावास भोगावा लागला. आणीबाणी उठल्यानंतर इंदिरा गांधी यांना पदावरुन हटवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. 

अटलबिहारी वाजपेयी यांनीही आपला जनसंघ हा पक्ष जनता पार्टीमध्ये विलीन केला. पण अवघ्या तीन वर्षात १९८० साली त्यांनी मुंबईत भारतीय जनता पार्टीची घोषणा केली. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात अटलजी परराष्ट्रमंत्री होते. परराष्ट्रमंत्री या नात्याने त्यांनी इतर देशांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्रमंत्री म्हणून संयुक्त राष्ट्र संघात त्यांनी हिंदीतून भाषण केले. संयुक्त राष्ट्र संघात हिंदीतून भाषण करणारे ते पहिले नेते होते. १९९६ साली ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले पण लोकसभेत बहुमत सिद्ध न करता आल्याने अवघ्या तेरा दिवसांतच त्यांचे सरकार पडले. त्यानंतर १९९८ साली ते पुन्हा पंतप्रधान बनले यावेळी मात्र त्यांचे सरकार तेरा महिने टिकले. पण या तेरा महिन्यात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता त्यांनी अणुस्फोट करून आपले सामाजिक व वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. ते पंतप्रधान असतानाच भारताने कारगिल युद्ध जिंकले होते. जय जवान,  जय किसान, जय विज्ञान ही घोषणा त्यांनी दिली. 

१९९९ साली तिसऱ्यांदा ते पंतप्रधान बनले. यावेळी मात्र त्यांचे सरकार पाच वर्ष टिकले. सलग पाच वर्ष पंतप्रधान राहिलेले ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते. अटलबिहारी वाजपेयी हे उत्कृष्ट कवी होते त्यांच्या सर्व कविता लोकप्रिय झाल्या त्यातील 'आओ फिरसे दिया जलाये'.. ही कविता लोकांना खूप आवडली. त्यांनी सुमारे ४० पुस्तकांचे लेखन केले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना अनेकवेळा मिळाला. सरकारने त्यांना पद्मविभूषण हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व यांचा सुरेख संगम असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत