डोंबिवली दि.१५ - डोंबिवली जिमखाना हा केवळ क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांसाठीच नव्हे, तर डोंबिवलीतील सांस्कृतिक परंपरेच्या जतनासाठी देखील ओळखला जातो. आधुनिक सुविधांसह परिपूर्ण असलेल्या जिमखान्याने नेहमीच आपल्या कार्यक्रमांद्वारे उच्च दर्जा राखला आहे. जिमखान्याचे नाव अनेक क्रीडापटूंनी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा उज्वल केलेले आहे. डोंबिवली मधील विद्यार्थ्यांसाठी स्वस्त दरात प्रशिक्षणाची सोय, तसेच क्रिकेट सारख्या खेळात गुणवैशिष्ट्य असलेल्या होतकरू व गरजू मुलांसाठी विशेष दरात प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केलेली आहे. डोंबिवली जिमखान्याचे देशभरातील ४९ जिमखान्यांशी ऍफिलीएशन आहेत. भ्रमंती करणारे अनेक सदस्य याचा लाभ घेत असतात. डोंबिवली जिमखाना आपल्या डोंबिवली शहराचे एक प्रतिष्ठित सांस्कृतिक व क्रीडा केंद्र आहे. गेली अनेक दशके जिमखान्याने आपल्या कार्यक्रमांद्वारे समाजातील विविध स्तरांतील लोकांना एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. याचे प्रथम श्रेय आमच्या सर्व संस्थापक सदस्यांना जाते असे अध्यक्ष दिलीप भोईर म्हणाले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही, डोंबिवली जिमखाना उत्सव २०२४ मोठ्या उत्साहाने आणि आनंदाच्या वातावरणात आयोजित केला जात आहे. डोंबिवली जिमखाना उत्सव हा फक्त मनोरंजनाचा नाही तर स्थानिक कलेचे आणि परंपरेचे दर्शन घडवणारा एक मंच आहे. हा उत्सव नवोदित कलाकारांसाठी संधी देत असतानाच, ग्राहकांसाठी एक मौजमजा लुटण्याचा अविस्मरणीय अनुभव देतो. उत्सव चे हे २७ वे वर्ष असून १९९७ साली उत्सवला सुरुवात झाली. उत्सव बद्दल सांगायची विशेष गोष्ट म्हणजे उत्सवचे आयोजन हे डोंबिवली जिमखान्याचे सभासद पूर्णतः स्वेच्छेने करत असतात आणि घरच्या कार्यासारखे आनंदाने पार पाडतात. गेल्या वर्षी प्रमाणेच उत्सवचे ६०% स्टॉल्स तीन महिन्यापूर्वीच आरक्षित झाले होते आता सर्व स्टॉल हाउसफुल झाले आहेत. यावर्षी शनिवार २१ डिसेंबर ते रविवार २९ डिसेंबर पर्यंत 'उत्सव २०२४' संपन्न होणार आहे. उद्घाटन समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे आमदार मा. श्री रवींद्र चव्हाण, खासदार मा.श्री डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मा.श्री. राजेश मोरे तसेच 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक मा. समीर कर्वे अशी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे उत्सवच्या यशाला प्रायोजक डॉ. श्रीमंत शिंदे फाऊंडेशन, डोंबिवलीकर, महाराष्ट्र टाईम्स, झी मराठी आणि पितांबरी यांचा हातभार लागणार आहे. उत्सव मध्ये नेहमीप्रमाणे गृह उपयोगी वस्तु, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, शैक्षणिक उत्पादने, परिधान, दागिने, कला वस्तू, खाद्यपदार्थ, नाविन्यपूर्ण उत्पादने, पुस्तके, बँका, आर्थिक गुंतवणूक, सामाजिक संस्था, पोलीस सायबर सिक्युरिटी अशा विविधरंगी उत्पादनांचे आणि सेवांचे दर्शन घडणार आहे.
उत्सव मध्ये मनसोक्त फिरल्यानंतर उपलब्ध असणारे मनोरंजक खेळ आणि खानपान व्यवस्था ही लहान व थोरांसाठी आनंदाची सफरच असते आणि अशा प्रकारे उत्सव "सर्वांसाठी सर्वकाही" हे ब्रीदवाक्य नेहमीच सार्थकी लावत असतो. उत्सव मध्ये विविध आवडत्या मालिकेतील 'झी मराठी'चे कलाकार आपल्या भेटीसाठी २४ डिसेंबर ते २७ डिसेंबर या दिवसांमध्ये येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांस एक लाख 'फ्री पास' देण्यात येणार आहेत. त्याचा वापर विद्यार्थी आनंदाने घेतात व उत्सवमध्ये सहभागी होतात. तसेच दरवर्षी क्रीडाक्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा उत्सवमध्ये क्रीडापुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले जाते. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून काही गरजूंना व संस्थांना विशेष सवलतीत स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातात. दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट स्टॉल, उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट चवीचा पदार्थ असलेला स्टॉल, तसेच नीटनेटकेपणा व स्वच्छता याचा विचार करून काही स्टॉल धारकांना पारितोषिके दिली जातात.
उत्सवचा समारोप समारंभ रविवार दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपन्न होईल. या समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, आमदार मा. श्री रवींद्र चव्हाण खासदार मा. श्री डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मा.श्री. राजेश मोरे तसेच क.डों.म.पा.च्या आयुक्त मा. डॉ.सौ इंदुराणी जाखड तसेच पितांबरीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. रविंद्र प्रभुदेसाई असे मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
ह्या कार्यक्रमात दरवर्षी आनंदाने व उत्साहाने महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, एम एस ई बी, फायर अधिकारी, पोलीस, ट्रॅफिक, अनेक संस्थां सहभागी होऊन उत्सव मध्ये ते आपली जबाबदारी पार पाडतात. याकरिता डोंबिवली जिमखानाची कार्यकारी समिती या सर्वांची ऋणी आहे. तसेच आपलेही सहकार्य महत्त्वाचे असून आपण सर्वांनी उत्सवाच्या यशासाठी कायमच साथ दिली आहे आणि यापुढेही सकारात्मक प्रचारासाठी सहकार्य करावे अशी विनंती मा. सचिव पर्णाद मोकाशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना केली. यावेळी व्यासपीठावर जिमखाना चे अध्यक्ष श्री. दिलीप भोईर, सचिव श्री. पर्णाद मोकाशी, खजिनदार श्री. आनंद डिचोलकर, सह सचिव श्री. सलील जोशी, कार्यकारी समिती सभासद श्री. रवींद्र मोकाशी व प्रशासनाच्या सौ.सुवर्णा वाघ हे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा