BREAKING NEWS
latest

ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी हा देश सोडून चालते व्हावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

प्रतिनिधी: अवधुत सावंत

परभणी - महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अखंड ठेवणारे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दीले आहे. या संविधानाची शपथ घेऊन मंत्री लोकप्रतिनिधींना पद ग्रहण करावे लागते. संविधानानुसार देश चालतो. ज्यांना संविधान मान्य नाही त्यांनी या देशातून चालते व्हावे असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

परभणी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तेथे संविधानाचा अवमान झाल्याच्या घटनास्थळाची पाहणी ना.रामदास आठवले यांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परभणीतील संविधान अवमान प्रकरणाची  माहिती घेतली. 

यावेळी आरोपीची नार्को टेस्ट करण्याची सर्व चौकशी करण्याची सर्व आंबेडकरी समाजाची मागणी आहे त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाची ही आरोपीची नार्को चाचणी करण्याची मागणी  आहे. संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपी मागे कोण सुत्रधार आहे ? कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी स्थानिक पोलीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. त्यांना जमत नसेल तर  या प्रकरणी क्राईम ब्रांचने चौकशी करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.

१० डिसेंबर रोजी संविधान अवामनाचा प्रकार परभणीत घडल्यानंतर आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्त निषेध  आंदोलन परभणीत केले. संविधान अवमान प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यानंतर निषेध आंदोलनात आंबेडकरी जनतेने कुणाचेही मोठे नुकसान केलेले नाही. तुरळक ठिकाणी केवळ २  गाड्यांच्या काचा आणि काही दुकानाच्या नाम फलकाचे नुकसान झाले आहे. या आंदोलनात विद्यार्थी महिला आणि निर्दोष कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवू नयेत. ज्या पोलीसांनी महिला आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर अतीप्रमाणात मारहाण केली आहे, वस्तीमधील पार्किंग मधील गड्याफोडल्या आहेत. त्या पोलीसांची ही चौकशी व्हावी. काही समाजकंटक यांनी पोलीसांसोबत आंबेडकरी आंदोलकांवर हल्ले केले आहेत त्यांचे व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

अटक ४२ आंदोलकांपैकी १० जणांना जामीन मिळाला आहे पोलीस कोंबिंग ऑपरेशन करणार नाहीत निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करणार नाहीत असे शांतता कमिटीत ठरले असल्याची माहिती पोलीसांनी आपल्याला दिल्याचे ना.रामदास आठवले यांनी सांगितले. याप्रकरणी आपण दिल्लीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. परभणीत कोंबिंग ऑपरेशन करू नये आणि निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊ नयेत याबाबत आपण मागणी केल्याची ना. रामदास आठवले यांनी आज परभणीत पत्रकारांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत