कल्याण : शासकीय योजनांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणासाठी व सामाजिक बळकटीकरणासाठी तृतीय पंथीयांना शक्यतोपरी मदत करु असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी केले. काल सायंकाळी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे दालनात तृतीय पंथीय समुदायाच्या प्रतिनिधीनींसमवेत आयोजिलेल्या बैठकीत बोलताना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले.
शासनाने तृतीय पंथीयांसाठी धोरण जाहिर केले असून महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या पुढाकाराने समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी आयुक्त दालनात तृतीय पंथीयांच्या प्रतिनिधींची काल सायंकाळी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस महापालिकेच्या उपायुक्त स्वाती देशपांडे कुलकर्णी, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ला, समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, तृतीय पंथीयांच्या जिल्हा आयकॉन व किन्नर अस्मिता संस्थेच्या अध्यक्षा निता केणे व त्यांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत आयुक्तांनी तृतीय पंथीयांच्या अडचणी समस्या जाणून घेतल्या. तृतीय पंथीयांना आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यासाठी मदत करावी अशी विनंती तृतीय पंथीयांमार्फत करण्यात आली. त्यावेळी लाईट हाऊच्या माध्यमातून तृतीय पंथीयांना प्रशिक्षण दिले जाईल त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांना महापालिकेमार्फत शक्य तितकी मदत केली जाईल तसेच आधारकार्डाअभावी तृतीय पंथीय शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित रहात असल्यामुळे त्यांना आधारकार्ड बनवून देण्यास महापालिकेतर्फे सहकार्य केले जाईल अश्या शब्दात आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आश्वासित केल्यामुळे तृतीय पंथीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुललेले दिसून आले. निवडणूक कालावधीत तृतीय पंथीयांना महापालिकेमार्फत निवडणूक कार्ड (वोटर आयडी) वितरीत करण्यात आले होते. त्याबाबत तृतीय पंथीयांनी आयुक्त महोदयांचे आभार मानले.
महाराष्ट्र शासनाच्या तृतीय पंथीय धोरणाच्या अंमलबजावणीस प्रथम: महापालिकेतर्फे प्रारंभ करण्यात आला असून तृतीय पंथीयांसाठी लवकरच किन्नर महोत्सवाचे आयोजन महापालिकेच्या नाटयगृहात करण्यात येईल अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी या बैठकीत दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा