डोंबिवली : सर्व मुलांचा आवडता आणि आनंद देणारा सण म्हणजे नाताळ. शाळेला दहा दिवसांची सुट्टी आणि त्यातच कल्पना विश्वात रममाण होऊन सांताक्लॉज भेटीला येऊन काहीतरी भेटवस्तू मिळणार हे निरागस मन. 'जे एम एफ' शिक्षण संस्था अंतर्गत जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर शाळेने जल्लोषात नाताळ सण साजरा केला. सर्व मुली लाल रंगाचे पोशाख परिधान करून आले होते. जणू काही ब्रह्मा रंगतालयात लाल पऱ्या अवतरल्या आहेत असे वातावरण होते. तर सर्व मुले सांताक्लॉज च्या वेषात आले होते. 'जिंगल बेल्स' च्या संगीतावर सर्वच जण थिरकत होते.
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे तसेच इतर पदाधिकारी यांनी येशू ख्रिस्ताच्या प्रतिमे पुढे मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले, त्याच बरोबर सर्व विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्ताचे प्रार्थना गायन केले. सर्व मुलांनी नाताळच्या विविध वस्तू स्वतः हाताने बनवून आणून शाळा सजवली होती. हस्तकला शिक्षिका सपना येंनंम व दीपा तांबे यांनी सुबकपणे ख्रिसमस ट्री, स्नो मॅन अशा बऱ्याच हस्तकला वस्तू मुलांना शिकवून त्यांच्या कडून तयार करून घेतल्या. लोकांनी केलेली अवहेलना सहन करून देखील , जगाला शांततेचा मार्ग दाखविणारा एक अमर आत्मा म्हणजे येशू ख्रिस्त. स्वतःच्या हृदयात शांतता आणि दयेची ज्योत तेवत ठेऊन जगाला जो उपदेश येशू ख्रिस्ताने केला आहे अशा सामर्थ्याला जगी तोड नाही,असे उदगार संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले. तर सर्वांगाला खिळे ठोकत असतानाही 'हे ईश्वरा या लोकांना माफ कर' असे म्हणणारा साक्षात येशू म्हणजे ईश्वराचाच अंश आहे आणि त्यांनी केलेल्या उपदेशाचे आपण पालन करणे म्हणजेच येशूच्या जन्म दिवसाची येशूला दिलेली सर्वोत्तम भेट आहे, असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.
सकाळी नऊ ते अकराच्या वेळेमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. त्यामधे अनेक उत्साही पालकांनी नृत्य, गिटार वादन सादर केले. सर्व पालकांना संस्थापक व सचिव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व चषक देण्यात आले. सांताक्लॉज चे आगमन होताच सर्व मुलांनी एकच जल्लोष केला व भेटण्यासाठी सर्व मुलांनी सांताक्लॉज भोवती गराडा घातला, तर सांताक्लॉज ने देखील सर्वांना आलिंगन देऊन चॉकलेट, केक, बिस्कीट, आणि अनेक भेटवस्तू त्याच्या पोटलीतून काढून वाटल्या. केक कापून सर्वांनी नाताळ सण साजरा केला, व जल्लोषात बेभान होऊन नाचू लागले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवी मधील संयुक्ता व आयुशी या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन आरोही हिंगमिरे ने केले व आनंदाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा