कल्याण : कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत व बंदी असलेल्या गुटख्याच्या गोदामावर पोलीस परिमंडळ-३ उपायुक्तांच्या पथकाने छापा टाकून सात लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन गुटखा माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपायुक्तांच्या पथकाने घटनास्थळावरून जहांगीर शेख नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तर मुनावर खान आणि जीशान खान फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितले की, परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पथकाला बंदी असलेल्या गुटख्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त पथकाने महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून ६ लाख ६८ हजार ५७० रुपयांचा गुटखा जप्त केला. सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गुटख्यांमध्ये दहा वेगवेगळ्या प्रकारच्या गुटख्यांचा समावेश आहे.
पोलीस उपायुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यानंतर कल्याणच्या गुटखा माफियांमध्ये घबराट पसरली आहे. हे गुटखा माफिया भिवंडीतून मोठ्या प्रमाणावर गुटखा आणतात, आणि कल्याण स्टेशनसह संपूर्ण शहरात पुरवठा करतात, असे सांगितले जाते. टाकलेल्या या छाप्यानंतर गुटखा माफियांमध्ये घबराट पसरली असून, अटकेच्या भीतीने ते शहरातून पळून गेले आहेत असे वर्तविण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा