प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुंबई : नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आज इंडिगो एअरलाइन्स चं ए३२० विमानाचं यशस्वी लँडिंग झालेलं आहे. अग्निशमन दलाकडून विमान लँड झाल्यानंतर विमानाला पाणी फवारून सलामीही देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामंही पूर्ण झालेली आहेत.
महिनाभरापूर्वी वायुदलाच्या सी २९५ आणि सुखोई ३० या विमानांचे येथे लँडींग झाले होते, या विमानांचे लँडींग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेलं हे विमानतळ पुढील वर्षी म्हणजेच मार्च २०२५ रोजी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.
हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवी मुंबईतील विमानतळ हे दुसरे देशातील सर्वात मोठं विमानतळ आहे. जवळपास ५,९४५ एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. मुंबईपासून ४० किमी अंतरावर पनवेलजवळ हे विमानतळ बांधण्यात आले आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून लवकरच केंद्र सरकारकडूनही त्यास मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा