BREAKING NEWS
latest

दुर्गाडी किल्ला मशीद नाही तर मंदिर असल्याचा कल्याण न्यायालयाचा निर्णय, पेढे वाटून हिंदू समाजात जल्लोष..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली - कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या माथ्यावर मशीद नसून मंदिर असल्याचा निर्णय कल्याण न्यायालयाने दिल्यानंतर येथील हिंदू जनतेने पेढे वाटून आनंद व्यक्त केल्याचे माजी मंत्री आणि डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. डोंबिवली जिमखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत हिंदु मंचचे अध्यक्ष दिनेश देशमुख आणि बजरंग दलचे पराग तेली या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
याशिवाय, रवींद्र चव्हाण म्हणाले की, १९७६ पासून शासनाच्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल असलेल्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर असल्याचा निर्णय दिला होता, मात्र या निर्णयाविरोधात मुस्लिम समाजाने आंदोलन केले होते. खोटा दावा दाखल केला आणि ही जागा वक्फ बोर्डाची आहे असा अर्ज दाखल केला तेव्हा हे प्रकरण कल्याण न्यायालयात वर्ग करण्यात आले. वक्फ बोर्डाची रिक्त जागांबाबतची याचिका कल्याण न्यायालयाने फेटाळून लावली. गेली ४८ वर्षे येथील हिंदू तसेच दिवंगत आनंद दिघे व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने लढा देऊन न्यायाच्या प्रतिक्षेत होते. त्याबाबत आज कल्याण न्यायालयाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा पूर्वीचा निर्णय कायम ठेवत दुर्गाडी किल्ला हे मशीद नसून मंदिर असल्याचा निर्णय दिला आहे. या निकालामुळे येथील हिंदू समाजाने कल्याण न्यायालय आणि सरकारचे आभार मानले असून मलंगगडचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून हिंदू संघटना योग्य पद्धतीने लढा देतील, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
तत्पूर्वी शिवसेना नेते रवी पाटील, अरविंद मोरे, अरविंद पोटे यांच्यासह अनेक नेत्यांनी कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर उपस्थित राहून आनंद व्यक्त केला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत