BREAKING NEWS
latest

ग्रामीण भागांनाही जोडत सुरू होणार कल्याण ते तळोजा मेट्रो..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : मुंबई आणि उपनगरात मेट्रोचे जाळे पसरत आहेत. शहरांत मेट्रोचे काम वेगाने होत आहेत. मेट्रोमुळं प्रवासाचा वेळ तर वाचतो पण इंधनाचीही बचत होते. एमएमआरडीए ने आता ऑरेंज मेट्रो लाईन १२ चे काम हाती घेतले आहे. या मेट्रोचे काम ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून कल्याण आणि तळोजा अशी दोन शहरे जोडण्यात येणार आहेत. एकूण २३,७५६  किमीचा कॉरिडोर असणार आहे. 

एमएमआरडीए ने कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई मेट्रो लाईन १२ ला दोन इंटरचेंज असणार आहेत. एक मुंबई मेट्रो लाईन ५ वरील कल्याण एपीएमसी आणि दुसरा नवी मुंबई मेट्रो लाईन १ वरील अमनदूत (तळोजा) येथे कनेक्ट होणार आहे. या मेट्रोमुळे कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास फक्त ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबई-ठाणे-भिवंडी-कल्याण-डोंबिवली-नवी मुंबई असा वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होईल आणि प्रवाशांना अत्यंत किफायतशीर दरात, कमीत कमी वेळेत आरामदायी आणि सुलभ प्रवास करता येणार आहे. 

मेट्रो मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग थेट नवी मुंबई, तळोजा या भागांसोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वडवली स्टेशनशी जोडलेल्या निळजे गाव येथे डेपो तयार करण्यात येत आहे. जेणेकरुन येथे मोठ्या दुरुस्ती, किरकोळ दुरुस्ती, अवजड उपकरणे बदलणे आणि चाचण्या करता येणार आहे. हे डेपो ३०.१२ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणार आहे. सहा-कार गाड्यांच्या २४ रेकसाठी १२ स्टॅबलिंग लाईन, भविष्यासाठी नियोजित अतिरिक्त ३ सह तीन तपासणी/देखभाल लाईन आणि चार वर्कशॉप लाईन्सचा समावेश असेल. डेपो आणि संबंधित कामांसाठी एमएमआरडीएने ५७ हेक्टर सरकारी जमीन संपादित केली आहे.

ही असतील स्थानके..

कल्याण तळोजा (मेट्रो १२) अंतर्गत कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागांव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली(खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा, या स्थानकांचा समावेश असणार आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत