BREAKING NEWS
latest

२० साव्या 'अखिल भारतीय आगरी महोत्सव' च्या दिनांक १० ते १७ डिसेंम्बर रोजी आयोजना निमित्त पत्रकार परिषद संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे लोकमान्यतेस पात्र ठरलेल्या 'आगरी युथ फोरम' या सेवाभावी संस्थेच्या वतीने सन २००४ पासून "अखिल भारतीय आगरी महोत्सव" या समाज सोहळ्याचा आयोजनास सुरुवात केलेली आहे. कल्याण-डोंबिवलीकरच नाही तर ठाणे, रायगड, मुंबईवासिय सुद्धा आगरी महोत्सवची चातकासारखी वाट पाहत असतात. असा २० सावा अखिल भारतीय आगरी महोत्सव दिनांक १० ते १७ डिसेंबर २०२४ या कालावधीत श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे संपन्न होणार आहे.

या महोत्सवाचा उ‌द्घाटन सोहळा महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते व समाजाचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर (माजी खासदार), जगन्नाथ पाटील (माजी उत्पादन शुल्क मंत्री), दशरथ पाटील (ज्येष्ठ सामाजिक नेते), कपिल पाटील (केंद्रीय पंचायतराज मंत्री), गणेश नाईक (आमदार व माजी मंत्री),  खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, खासदार संजय दिना पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०५.००  वाजता संपन्न होणार आहे. या उदघाटन सोहळ्यासाठी समाजातील ज्येष्ठ नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव विधानसभा व लोकसभेच्या हिवाळी अधिवेशन काळात होत असल्याने सर्व लोकप्रतिनिधी हे महोत्सव कालावधीमध्ये आगरी महोत्सव ला शुभेच्छा भेट देणार आहेत.

अखिल भारतीय आगरी महोत्सव म्हणजे "एक आनंदाची पर्वणी" या आनंदाच्या पर्वणी मध्ये मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रचंड जनसागर उसळण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन महोत्सव मध्ये भेट देणाऱ्या आबालवृद्धांना, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, खरेदीसाठी येणाऱ्यांना मनपसंत वस्तूच्या खरेदीचा आनंद घेता यावा, संगीत नृत्य प्रेमींना आगरी कोळी ठसकेबाज गीतांवरील नृत्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, खवय्यांना स्वादिष्ट आगरी कोळी खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारता यावा, बच्चे कंपनी बरोबर त्यांच्या पालकांनाही आकाश पाळण्यात बसून आकाशा एवढा आनंद घेता यावा, त्यांच्या आनंदामध्ये बाधा येऊ नये म्हणून महोत्सव समितीने अत्यंत नियोजनबद्ध अशी कार्यक्रमांची आखणी केलेली आहे.

'चूल आणि मूल' या संसार चक्रात अडकलेल्या आमची माताभगिनी आज संसार चक्र भेदून समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे अशा महिला वर्गाच्या सन्मानार्थ महोत्सव मध्ये एक दिवस महिलांसाठी राखून ठेवलेला असून त्यादिवशी रंगमंचापासून सर्व व्यवस्थापन महिलांकडे देण्यात येणार आहे. आगरी कोळी समाजातील लग्नसोहळे हे वैशिष्ट्यपूर्ण असेच असतात. या लग्न सोहळ्यामध्ये 'धवला' गायनाला विशेष महत्त्व असते. एखा‌द्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये पौराहित्य करणाऱ्या गुरुजींच्या वेदमंत्रांना जसं महत्त्व असते तेवढेच महत्त्व या लग्न सोहळ्यामधील धवल्याला असते, समाजामधील महिला या धवला गीतांचे मौखिकरित्या संवर्धन करत असते. अशा लग्न सोहळ्यामधील 'धवला' गाणाऱ्या लाडक्या बहिणीच्या मुलाखतीच्या कार्यक्रम 'धवला आगरी पौराहित्य' या शीर्षकाखाली आयोजीत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे वसुधैव कुटुंबकम अध्यात्मक पिठामधील कैवल्यपाद माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज गुरुकुला मध्ये अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या वि‌द्यार्थ्यांचा टाळ मृदंगाच्या गजरात हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या हरिपाठाचे कार्यक्रमांमुळे आगरी महोत्सव परिसरातील वातावरण मंगलमय होणार आहे.

माणूस चाकोरीबद्ध जीवन जगत असताना त्याच्या धकाधकीच्या जीवनातून मनाला विसावा देण्याचे काम लोकगीतातून होत असते. म्हणूनच लोकगीत म्हणजे माणसाच्या मनाचा आरसा समजला जातो आगरी कोळी गीतांमध्ये हा भाव ठळकपणे दिसून येतो आगरी समाजामधे अनेक कवी गीतकार आहेत. त्यामध्ये गीतकार अनंत पाटील यांचं नाव अग्रभागी आहे. त्यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना संगीत आणि स्वराची जोड मिळाल्याने ती अजरामर झालेले आहेत. असे गीतकार स्वर्गीय अनंत पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आगरी समाजातील प्रसिद्ध गायकांचा सहभाग असणाऱ्या आगरी कोळीगीतातील भाव सौंदर्य या मुलाखत पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांमध्ये समाजातील प्रसिद्ध गायक श्री जगदीश पाटील, बिग बॉस फेम, दादूस संतोष चौधरी, गायक योगेश आग्रावकर, रॉक सिंगर सपना पाटील, बदामचा बादशहा सुजित पाटील यांचा सहभाग असणार आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत प्रसिद्ध निवेदक प्रतिक कोळी.

मराठी भाषेला अभिषेक दर्जा मिळावा ही गेल्या अनेक दशकापासून मराठी जनतेची मागणी होती. मराठी भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेने सर्व निकष पूर्ण केलेले असल्याने केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. अभिजात दर्जा म्हणजे काय, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा कसा विकास घडून येणार आहे या संदर्भात सर्वसामान्य मराठी माणूस अनभिज्ञ आहे. ही सर्वसामान्य जणांची अनभिज्ञता दूर व्हावी, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने मराठी भाषा प्रांतातील साहित्यिकांचा सहभाग असलेल्या परिसंवादाचे आयोजन करण्याचे ठरवलेलं आहे. या परिसंवादामध्ये अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे मा. अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, ९१ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे मा. अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे उपस्थित राहणार असून त्यांच्याशी समन्वय साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार श्री राजेंद्र हुंजे.

यावर्षीच्या महोत्सवामध्ये वाचकांसाठी दर्जेदार विविध विषयांवरील लाखो पुस्तकांचा खजिनाच उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत भाषेतील पुस्तकांचा भरणा असणार आहे. या विज्ञान युगामध्ये माणसाचे जीवन अत्यंत धावपळीचे झालेले आहे. सत्ता संपतीच्या मागे धावत असताना त्याचे स्वतःच्या शरीराकडे मात्र दुर्लक्ष होत आहे त्यामुळे त्याला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग अशा आजारांना बळी पडावे लागत आहे. अशा अनेक प्रकारच्या आजारांपासून आपली तब्येत कशी सांभाळावी. याबाबत माधवबाग स्वास्थ्य परिवारातील डॉक्टर प्रवीण घाडीगांवकर उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.

प्रबोधनात्मक कार्यक्रमांप्रमाणे लोकरंजन करण्यासाठी दररोज नवोदित हौशी कलाकार, शालेय विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार पहावयास मिळणार आहेत त्याचप्रमाणे कलर्स मराठी वाहिनीवरील प्रक्षेपित होणारी लोकप्रिय मालिका "लय आवडते तू मला", "अशोक मामा" व "पिंगा ग पोरी पिंगा" या मालिकांमधील तसेच "मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी" या चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार महोत्सवामध्ये सदिच्छा भेट देणार असून प्रेक्षकांना त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधीही मिळणार आहे. त्याचप्रमाणे आगरी महोत्सवमधील "एक आनंदाच्या पर्वणी" मध्ये आपला आनंद ‌द्विगुणीत करण्यासाठी अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकाराची उपस्थिती लाभणार आहे.


सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले बी यु निक उर्फ निक यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. ते तरुणांना स्फूर्तीदायी ठरणारे टॉक शो आगरी महोत्सवमध्ये करणार आहेत. महोत्सव साठी जगप्रसिद्ध नेपथ्यकार श्री संजय धबड़े व ओम साई डेकोरेटर्स हे नेपथ्याचे काम करणार आहेत. महोत्सव कालावधीमध्ये लकी ड्रॉ च्या माध्यमातून दररोज दोन लाडक्या बहिणींना पैठणीचा मान मिळणार आहे. तसेच आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी महोत्सव कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार यांची उपस्थिती ही मिळणार आहे त्याची घोषणा महोत्सव मंचावरून एक दिवस अगोदर करण्यात येईल. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमा आणि अग्निशमन याची चोख काळजी घेण्यात आली असल्याचे गुलाब वझे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत