मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम वेगाने पुढे सरकत आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाचा हिस्सा असलेल्या या प्रकल्पासाठी जवळपास २,७८२ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०२४ पर्यंत ६७ टक्के पूर्ण झाले आहे.
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास निगम (एमआरविसी) कडे सोपवण्यात आले आहे. नवीन कॉरिडोरमुळे पनवेल आणि कर्जतच्या मध्ये फास्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटीचा कायापालट होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन पूर्ण झाले असून वनक्षेत्रातील कामाला सुरुवात होणार आहे.
पनवेल-कर्जत रेल्वेमार्गावर एकूण ५ स्थानके असणार आहेत. पनवेल, चिखले, मोहापे, चौक आणि कर्जत स्थानकांत वेगाने काम सुरू आहे. प्लॅटफॉर्म, फुट ओव्हर ब्रिज आणि प्रशासकीय कार्यालये सारख्या सुविधांवर काम प्रगतिपथावर सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश हा नवी मुंबईतील रायगड जिल्ह्यातील क्षेत्राला कर्जतपर्यंत जोडणे हा असून एमएमआरचा विस्तार करणे हा आहे. यामुळं मुंबई लोकलला एन्ड टू एन्ड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. तसंच, पनवेल ते कर्जत दरम्यान असलेल्या परिसराचा विकास होण्यासही मदत मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे कर्जतहून थेट सीएसएमटी व्हाया पनवेल मार्गे जाता येणार आहे. कर्जतकडील प्रवाशांना पनवेलवरुन हार्बर मार्गाने मुंबई सीएसएमटी स्थानक गाठता येणार आहे. यामार्गामुळं प्रवाशांची २५ मिनिटांची बचत होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा