डोंबिवली दि.०८: प्रेस असोसिएशन कल्याण-डोंबिवली (रजि) आणि जेष्ठ पत्रकार बापू वैद्य यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत डोंबिवली येथील प्रसिद्ध फडके गणपती मंदिराच्या विनायक सभागृहात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार बापू वैद्य यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुमे म्हणून १४४ ग्रामीण मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे उपस्थित होते.
ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, डोंबिवली 'ब' प्रभाग क्षेत्र अधिकारी हेमा मुंबारकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील यांच्यासह कल्याण प्रेस क्लबचे अध्यक्ष विष्णू कुमार चौधरी, केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक राष्ट्रीय पदक विजेता पत्रकार अवधुत सावंत, इंडिया टिव्ही न्यूज कल्याण चे संपादक महादेव पंजाबी, डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव, प्रशांत जोशी, महावीर बडाला, शरद शहाणे, डोंबिवली पत्रकार संघाच्या खजिनदार सोनल पवार यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
४० वर्षाहून प्रदिर्घकाळ बापू वैद्य पत्रकारिता करत असून कल्याण-डोंबिवली येथील पत्रकारांना शासकीय कोट्यातीन हक्काचे घर मिळावे, या करिता त्यांचा संघर्ष मोठा असल्याचे सांगत शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी बापू वैद्य यांचे कौतुक केले. पत्रकारांच्या घराच्या मागणीसाठी शासनाकडे आपण पाठपुरावा करू असे आश्वासन मोरे यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवक महेश पाटील यांनी सांगितले की पत्रकार हे समाजाला दिशा देण्याचे काम नेहमीच करत असतात. पत्रकारांच्या घराच्या विषयाबाबत आपण नेहमी महापालिकेशी पाठपुरावा करू असे सांगितले.
यावेळी उपस्थित पत्रकारांना पेन व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव किशोर पगारे (जय महाराष्ट्र न्यूज) यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रेस असोसिएशन कल्याण-डोंबिबली (रजि) च्या सचिव सारिका शिंदे (संपादिका आपला भगवा/राजमुद्रा) यांनी विशेष मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा