दिल्ली : दिल्लीच्या शेजारी असलेल्या राज्यांप्रमाणेच दिल्लीतही आता कमळ फुलेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. भाजपाच केवळ दिल्लीला सर्वश्रेष्ठ राजधानीचा दर्जा देऊ शकते, दिल्लीला सुरक्षा, आरोग्य व विकास योजनांसाठी केंद्र सरकारने ७५ हजार कोटी रुपये दिले याची पंतप्रधानांनीच आठवण करून दिली आहे. दिल्ली हे शहरी विकासाचे जगातील आदर्श मॉडेल ठरले पाहिजे हा भाजपाचा प्रयत्न राहील. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असेल, तर दिल्लीच्या विकासाला डबल इंजिनचा लाभ मिळू शकतो.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांच्या लगत असलेल्या राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. यावेळी विधानसभेवर कुणाचा झेंडा फडकणार, आम आदमी पक्षाचा, भाजपाचा की काँग्रेसचा या प्रश्नाने सर्वांचीच मती गुंग केली. दिल्ली विधानसभेसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. दि. ६ जानेवारीला दिल्ली विधानसभा क्षेत्रातील मतदारांची यादी प्रकाशित झाली तेव्हाच निवडणुकांचा बिगुल लवकरच वाजणार हे स्पष्ट झाले. दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीपर्यंत आहे. पण त्या अगोदर १८ फेब्रुवारीला मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार सेवानिवृत्त
होत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासूनच दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली. विधानसभेच्या ७० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आप, भाजपा व काँग्रेस हे तीनही पक्ष सज्ज झालेत. या तीनही पक्षांनी आपल्या बहुसंख्य उमेदवारांच्या नावाचीही घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तीनही पक्षात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहिणी क्षेत्रातील जापानी पार्कमध्ये झालेल्या भाजपाच्या परिवर्तन मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर आम आदमी पक्षात चिंता वाढली आहे. पंतप्रधानांची एन्ट्रीच धमाकेदार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा भाजपाचा हुकुमी एक्का आहे. मोदींच्या करिष्म्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र व हरियाणात चमत्कार घडवला. म्हणूनच दिल्लीतही हाच चमत्कार यंदाच्या निवडणुकीत आपचे वर्चस्व संपुष्टात आणणार का हा कळीचा मुद्दा आहे. आम आदमी पक्षाचा उल्लेख मोदींनी ‘आप’दा असा केल्याने आपच्या नेत्यांना फारच झोंबले आहे. मोदींच्या उपस्थितीत झालेल्या भाजपाच्या परिवर्तन मेळाव्याला मिळालेला अफाट प्रतिसाद व लोकांचा जबर उत्साह बघता यंदा दिल्लीत जनतेला परिवर्तन हवे आहे हाच संदेश सर्वत्र गेला.
दिल्लीचा विकास केवळ भाजपाच करू शकेल, भारताला जगात तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्याच्या गौरवशाली यात्रेत दिल्लीकरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. गेल्या दहा वर्षांतील दिल्लीतील आप सरकारचा कारभार घोटाळे व भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. हाच भाजपाचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. आप सरकार आप-दाहून कमी नाही अशी खिल्ली स्वत: पंतप्रधानांनीच उडवली आहे. शीशमहल या दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानावर सुशोभीकरणासाठी ३३ कोटी खर्च झाले, दिल्लीकरांच्या पैशाचीही उधळपट्टी आहे असा भाजपाने प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. दिल्लीच्या शेजारी असलेल्या राज्यांप्रमाणेच दिल्लीतही आता कमळ फुलेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. भाजपाच केवळ दिल्लीला सर्वश्रेष्ठ राजधानीचा दर्जा देऊ शकते. दिल्लीला सुरक्षा, आरोग्य व विकास योजनांसाठी केंद्र सरकारने ७५ हजार कोटी रुपये दिले याची पंतप्रधानांनीच आठवण करून दिली आहे. दिल्ली हे शहरी विकासाचे जगातील आदर्श मॉडेल ठरले पाहिजे हा भाजपाचा प्रयत्न राहील. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असेल तर दिल्लीच्या विकासाला डबल इंजिनचा लाभ मिळू शकतो.
दिल्ली मेट्रो ही दिल्लीच्या कानाकोपऱ्यांत भाजपानेच पोहोचवली आहे. नमो ट्रेन सेवा, राज मार्ग, फ्लायओव्हर, हे सर्व केंद्रानेच केले आहे. गरिबांसाठी पंतप्रधान निवारा योजना हे तर दिल्लीतील जनतेला वरदान ठरले आहे. रेवड्या वाटपाशिवाय निवडणूक जिंकता येत नाही हे सर्व राजकीय पक्षांना ठाऊक झाले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा या तिन्ही राज्यांत भाजपाने रेवड्या वाटून सत्ता काबीज केली. यापासून सर्वच राजकीय पक्षांनी त्याचे अनुकरण सुरू केले. आम आदमी पक्षाचे संयोजक व संस्थापक अरविंद केजरीवाल व मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारची लाडकी बहीण योजना आपने अगोदरच ढापली व जाहीर केली. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना पत्रकार परिषदेत रडू आवरले नाही. त्या म्हणाल्या-भाजपाचे नेता रमेश बिधुडी हे माझ्या ८० वर्षांच्या पित्याला अपशब्द बोलून अवमान करीत आहेत. राजकारण इतक्या गलिच्छ थराला जाईल याची मी कल्पनाही करू शकले नव्हते. माझे वडील आजारी आहेत, ते चालूही शकत नाहीत, ते शिक्षक होते. त्यांना अपशब्द बोलून रमेश बिधुडी मते मागत आहेत. विशेष म्हणजे बिधुडी हेच कालकाजी मतदारसंघातून आतिशी यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. बिधुडी हे त्यांच्या दोन वादग्रस्त वक्तव्यांनी घेरले गेले आहेत. एकदा ते म्हणाले, ‘मतदारसंघातील रस्ते आम्ही सत्तेवर आल्यावर प्रियांकाच्या गालासारखे बनवू’. दुसऱ्या वेळी ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री आतिशी यांनी आपले वडील बदलले का? त्या (आडनाव बदलून) मार्लेनाच्या सिंह झाल्या आहेत.
बिधुडी एका सभेत म्हणाले, लालूप्रसाद यादव यांनी आश्वासन दिले होते की, बिहारमधील रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे बनवू, पण ते करू शकले नाहीत. पण मी आश्वासन देतो की, कालकाजीमधील सारे रस्ते प्रियंकाच्या गालासारखे आम्ही बनवू….
आम आदमी पक्षातून भाजपामध्ये आलेल्या अनेकांना भाजपाने उमेदवारी दिली आहे, हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून, मुख्यमंत्री आतिशी कालकाजीतून, सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलाशमधून, तर सत्येंद्र जैन शकूर बस्तीमधून निवडणूक लढवत आहेत.
दिल्लीतील आप सरकारमधील तीन मोठ्या घटना म्हणजे १) केजरीवाल यांची १५६ दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली. मद्य धोरणात घोटाळा झाल्याच्या आरोपावरून केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्याविरोधात ईडी व सीबीआय दोन्ही यंत्रणांनी कोर्टात केस केली होती. ईडी व सीबीआय दोन्ही चौकशांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. २) जेलमधून बाहेर आल्यावर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून आतिशी मुख्यमंत्री झाल्या. मुख्यमंत्री बदलला म्हणून आपवरील डाग पुसला जाणार नाही, अशी टीका भाजपाने केली. ३) आतिशी या दिल्लीच्या ९ व्या मुख्यमंत्री झाल्या. शपथ घेतल्यानंतर त्यांनी केजरीवाल यांना चरणस्पर्श केला. ४३ वर्षांच्या आतिशी या दिल्लीच्या सर्वात युवा मुख्यमंत्री बनल्या. केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते ४५ वर्षांचे होते. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आता आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत.
पाच वर्षांपूर्वी म्हणजे सन २०२० मध्ये दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले व ११ फेब्रुवारीला निकाल घोषित झाले होते. या निवडणुकीत आपला ५३.५७ टक्के मते मिळाली व आपचे ६२ आमदार निवडून आले होते. भाजपाला ३८.५१ टक्के मते मिळाली व ८ आमदार विजयी झाले. काँग्रेसला केवळ ४.२६ टक्के मते पडली, पण काँग्रेसला साधे खातेही खोलता आले नाही. सन २०१५च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नव्हता. आम आदमी पक्षाला आता चौथ्यांदा दिल्लीची सत्ता काबीज करणे यंदा महाकठीण आहे. आपला २०१३ मध्ये पहिल्यांदा सत्ता मिळाली. पण सरकार दीड वर्षांतच कोसळले. काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित व त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून २०१५ मध्ये आपने दिल्लीवर पुन्हा सत्ता मिळवली. गेली दहा वर्षे सलग दिल्लीत आपचे सरकार आहे. २०१३ मध्ये अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून केजरीवाल यांचे नेतृत्व पुढे आले. स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. आता भाजपाने केजरीवाल यांना भ्रष्टाचाराने बरबटलेला नेता म्हणून खलनायक ठरवले. मद्यविक्री घोटाळ्यावरून अरविंद केजरीवाल, संजय सिंह व मनीष सिसोदिया हे सर्व आपचे दिग्गज नेते जेल रिटर्न आहेत. भ्रष्ट कारभारावरून भाजपाने आपची कोंडी केली आहे. यंदा दिल्ली विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार याची देशभर उत्सुकता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा