मुंबई : विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला आहे. विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केलं, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी प्रदेश भाजपा समन्वयक विश्वास पाठक आणि भाजपाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘पुलोद’च्या निर्मितीबाबत बोलताना आपण जनसंघाच्या बळावर मुख्यमंत्री झालो हे मान्य केलं. मात्र हे सरकार बनवण्याआधी विश्वासघाताचे आणि खंजीर खुपसण्याचं कोणते विचारमंथन तुम्ही केलं होते, कोणाच्या विरोधात केलं होते हे सत्य ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येऊ द्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयीन प्रक्रीयेद्वारे निर्दोषत्व मिळाले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून अमित शाह यांच्यावर तुम्ही टीका करणार असाल तर ‘लवासा’ पासून अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने कोणाकडे बोट दाखवले आहे हे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका असेही शेलार म्हणाले.
शेलार यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना पवार साहेबांचा राजकीय न्यूनगंड दिसून आला आहे त्यामुळेच ते शाह यांच्यावर अशा भाषेत टीका करत आहेत. शरद पवार यांनी विश्वासघाताच्या राजकारणाचे प्रशिक्षण उद्धव ठाकरे यांना दिले आहे, हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिसून आले आहे. या विश्वासघाताच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेने यावेळी मतपेटीतून उत्तर दिले आहे. सत्तेच्या लोभासाठी एकत्र आलेली ही महाविकास आघाडी एक्सपायरी डेट संपल्याने केव्हाही फुटण्याची शक्यता आहे असेही शेलार यांनी नमूद केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा