चीन : सध्या चीनमध्ये एका गूढ आजाराने थैमान घातले आहे. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांमुळे रूग्णालय पुन्हा फुल्ल झाले आहेत. या ठिकाणी गर्दी दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत असल्याने जगाची चिंता वाढली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर याविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र तेजीने व्हायरल होत आहेत. चीनमधील काही रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे. चीनमधील कोरोना आजाराने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते. चीनवर त्यावेळी जगभरातून टीका झाली होती. जगभरात लॉकडाऊन लागले होते. आता इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस (एच एम पी व्ही) या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. ही एक महामारी असल्याची चर्चा होत आहे. अर्थात जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू एच ओ) आणि चीन सरकारकडून याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
चीनमध्ये श्वसनासंबंधीच्या आजारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. खासकरून रुग्णालयात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांची गर्दी वाढली आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने हा प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. पण हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. त्याची लक्षण ही सर्दी-पडशा सारखी आहेत. यामध्ये ताप, खोकला, नाक वाहणे, श्वास घेताना धाप लागणे वा श्वास घेण्यास कष्ट पडणे अशी लक्षणं दिसत आहेत. चीन सरकार अथवा डब्ल्यूएचओ ने याविषयी कोणताही अलर्ट दिला नाही. हा आजार वातावरणातील बदलामुळे झाला की चीन सरकारने पुन्हा एकदा हलगर्जीपणा केला हे समोर आलेले नाही.
खरंच आहे का महामारी ?
समाज माध्यमांवर याविषयीचे व्हिडिओ आणि छायाचित्र व्हायरल होत आहे. चीनमधील अनेक दवाखाने सध्या अबालवृद्धांमुळे गजबजले आहेत. सध्या ही गर्दी अधिक दिसत असल्याचा दावा सोशल मीडियातून करण्यात येत आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, वातावरणातील बदलामुळे आणि थंडीच्या लाटेने चीनमध्ये आजार बळावले आहे. कोरोनानंतर अनेक लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आहे. अशावेळी वातावरण बदलानंतर सर्दी-पडशाचे प्रमाण वाढले आहे. इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्यूमन मेटापनेयूमोवायरस (एच एम पी व्ही) या आजारांचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात यापूर्वी हे आजार या देशात बळावले होते. हा नवीन आजार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आर एस व्ही आणि इन्फ्लुएंजा चा देखील कहर
एच एम पी व्ही व्यतिरिक्त, इतर विषाणू देखील चीनमध्ये पसरत आहेत, त्यापैकी आर एस व्ही (रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस) आणि इन्फ्लुएंझा प्रमुख आहेत. हे सर्व विषाणू एकत्रितपणे संसर्गाचे प्रमाण वाढवत आहेत आणि परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहेत. चीनमध्ये सध्या अत्यंत बिकट परिस्थिती असून अनेक जण मृत्यूमुखी पडत आहेत असं चित्र दिसून येत आहे. तर यामुळे जगभरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एचएमपीव्ही ची काय आहेत लक्षणे ?
एचएमपीव्ही ची लक्षणे खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास लागणे आणि अशक्तपणा यासारख्या सामान्य सर्दीप्रमाणे सुरू होतात. परंतु यामुळे गंभीर प्रकरणांमध्ये, विशेषत: लहान मुले आणि वृद्धांमध्ये न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस होऊ शकते. डॉक्टरांच्या मते, या विषाणूवर सध्या कोणतीही विशिष्ट लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्याचे उपचार केवळ लक्षणे नियंत्रणाच्या आधारे केले जात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा