जोगेश्वरी (पूर्व): स्वामी विवेकानंद जयंती आणि भारतीय युवादिनाचे औचित्य साधून रविवार, १२ जानेवारी २०२५ रोजी "निर्धार-एक हात आपुलकीचा" या सामाजिक संस्थेने अरविंद गंडभीर हायस्कूल, जोगेश्वरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या संस्थेचे नववे रक्तदान शिबिर असून दर सहा महिन्यांनी असे शिबिर आयोजित केले जाते.
शिबिराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत शेलार (मुख्याध्यापक, जे.ई.एस महाविद्यालय) यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि साहित्यकृती देऊन करण्यात आला.
सकाळपासून रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत एकूण ११० जणांनी नाव नोंदवले, त्यापैकी ८६ जणांनी रक्तदान केले. नवोदित रक्तदात्यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला, यामुळे निर्धारतर्फे समाजात जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले.
सध्या रक्तपेढ्यांमध्ये जाणवणाऱ्या रक्ततुटवड्याला काही प्रमाणात हातभार लावणारे हे शिबिर अतिशय यशस्वी ठरले. शिबिराच्या यशस्वितेसाठी "निर्धार" संस्थेचे कार्यकर्ते, मातोश्री मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे प्रतिनिधी आणि जे.ई.एस. महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.
शिबिराच्या समारोपाला प्रायोजक, हितचिंतक, रक्तदाते आणि संस्थेचे सहकार्यकर्ते यांचे विशेष आभार मानण्यात आले. "निर्धार"च्या पुढील शिबिरांसाठीही अशाच प्रकारचा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा