मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी (एस एस सी) इयत्ता १० वी आणि (एच एस सी) इयत्ता १२ वी ची परीक्षा अगदी तोंडावर आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचं हॉल तिकीट शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मात्र हे हॉल तिकीट आता वादग्रस्त ठरत आहे. हॉल तिकीट पाहून एकच गोंधळ उडाला आहे. कारण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर कास्ट कॅटेगरी (जात प्रवर्गाची श्रेणी) नमूद करण्यात आली आहे. हे पाहून शिक्षण तज्ज्ञ व शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे शिक्षण मंडळाला मोठ्या टिकेला सामोरं जावं लागत आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. गोसावी म्हणाले, “हॉल तिकिटांवर जात नव्हे तर जात प्रवर्गाचा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा उल्लेख केला गेला आहे.
शरद गोसावी म्हणाले, “हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख नाही तर जातप्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, म्हणजे ओबीसी, एसटी, एससी असा उल्लेख आहे. आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्या शिष्यवृत्ती घेताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या हॉल तिकीटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या जनरल रजिस्टरवर विद्यार्थ्याच्या जातीची, जातप्रवर्गाची नोंद असेल तर त्यांना शिष्यवृत्ती मिळवणं सोपं होतं. विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख फक्त दाखल्यावर असतो त्यात चूक झाली तर पुढील शिक्षणात अडचण येऊ शकते ते टाळण्यासाठी हॉल तिकींटावर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे.
शरद गोसावी म्हणाले, शाळा सोडल्यानंतर शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्याला त्याचं नाव, त्याच्या पालकांचे नाव, जात अथवा जात प्रवर्गात कुठलीही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून येत नाही. अनेकदा विद्यार्थ्यांच्या जातीचा अथवा प्रवर्गाचा उल्लेख चुकलेला असतो. त्यामुळे भविष्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक विद्यार्थी अशा तक्रारी घेऊन आमच्याकडे येतात. नियमानुसार विद्यार्थ्यांनी एकदा का शाळा सोडली की त्याला शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये त्याचं नाव, आडनाव, आई-वडिलांची नावे, जन्मतारीख किंवा जातीच्या उल्लेखात कोणताही बदल करता येत नाही. यात एखादी चूक असेल तर हे हॉल तिकीट त्यांच्या उपयोगी पडणार आहे. हॉल तिकिटावर एखादी चूक असेल तर ती आत्ताच निदर्शनास आणून देता येईल आणि दुरुस्त करून घेता येईल. या एकमेव उदात्त हेतूने राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जात प्रवर्गाची नोंद केली आहे. यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या नावातच काय इतर कोणत्याही गोष्टीत चूक असेल तर ती बदल करण्याची संधी मिळते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा