BREAKING NEWS
latest

सर्वसामान्य प्रवाशांचा एसटीचा प्रवास ३ रुपयांनी महागला..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :  सर्वसामान्य प्रवाशांना दूरपर्यंतच्या ठिकाणांवर सुरक्षित पोहचवणाऱ्या लाल परीची अर्थात एसटी बसची शुक्रवारपासून ३ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाने सादर केलेल्या एसटी दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळ प्राधिकरणाची गुरुवारी मंत्रालयात बैठक पार पडली. गृह तसेच अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत एसटी दरवाढीचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित निर्णय घेण्यात आला. या बैठकीत लोकप्रतिनिधी सहभागी होत नाहीत.

डिझेल, सीएनजी या इंधनासह एसटीच्या सुट्या भागांच्या किमतीत गेल्या काही वर्षांत मोठी दरवाढ झाली. एसटी कर्मचाऱ्यांचे पगारही वाढले. मात्र, तरीही एसटीच्या भाड्यात गेल्या ३ वर्षांपासून कुठलीही दरवाढ झाली नव्हती. त्यामुळे एसटी महामंडळ प्राधिकरणाने सुचविल्यानुसार एसटीच्या दरात १४.९५ टक्के म्हणजे, ३ रुपये दरवाढ करण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने या भाडेवाढीला मंजुरी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑटोरिक्षा, टॅक्सीचीही दरवाढ

मुंबईतील ऑटोरिक्षा, टॅक्सी भाडे संघटनांनी ३ रुपयांनी दरवाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सी दरवाढ लागू केली जाणार आहे. ऑटोरिक्षाचे किमान भाडे २३ रुपयांवरून २६ रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे २८ रूपयांवरून ३१ रुपये होणार आहे. टॅक्सी, ऑटोसाठी शेवटची भाडेवाड ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आली होती.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत