कल्याण : काल सायं. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे व मालमत्ता विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विभागाचे अधिक्षक जयराम शिंदे व लिपिक प्रशांत धिवर, प्रविण घिगे व इतर कर्मचारी वर्गाने कल्याण रेल्वे स्थानकाजवळील बोरगांवकर वाडी वाहनतळ संबंधित ठेकेदाराकडील रु. १,२८,०२,४४०/- इतक्या रक्कमेच्या थकबाकी पोटी महापालिकेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही केली. बोरगांवकर वाडी बांधिव वाहनतळ (पे ॲन्ड पार्क) या धरतीवर ३ वर्षाच्या कालावधीकरीता, भाडेतत्वावर चालविण्यासाठी मे. श्री.समर्थ एंटरप्रायझेस यांस दि. १६/११/२०२३ रोजीच्या कार्यादेशान्वये देण्यात आले होते. सदर वाहनतळ पे ॲन्ड पार्क तत्वावर सुरु करण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने पहिल्या ३ महिन्याचे भाडे रु. ५९,२०,९७६/- इतकी रक्कम महापालिका फंडात भरणा केली होती.
तद्नंतर सदर परिचालक हे करारनाम्यातील अटी व शर्तीप्रमाणे महापालिकेचे भाडे नियमित भरणा करीत नसल्यामुळे, त्यांस बोरगांवकर वाडी वाहनतळाचे भाडे भरण्यासाठी नोटीसा बजावून देखील, संबंधित ठेकेदाराने भाडे रक्कम महापालिकेत भरणा केली नाही.
महापालिकेच्या मालमत्ता विभागाने दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी प्रत्यक्ष वाहनतळाची पाहणी केली असता, बेसमेंटमधील पार्कींगसाठी वापर सुरु असल्याचे, त्याचप्रमाणे पार्कींग शुल्क आकारणी करीत असल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये सुमारे १००० दुचाकी वाहने पार्कींग केल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर ठिकाणी पार्कींग होत नसल्याची सबब पुढे करुन संबंधित ठेकेदार वाहनतळाचे भाडे भरणा करण्यास टाळाटाळ करुन, महापालिकेचे आर्थिक नुकसान करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बोरगांवकर वाडी वाहनतळावर पे ॲन्ड पार्क धरतीवर चालविणेबाबतचा मे. श्री.समर्थ एंटरप्रायझेस यांचे सोबतचा करारनामा संपुष्ठात आणून, निविदाकाराने महापालिकेकडे जमा केलेली सुरक्षा अनामत, इसारा रक्कम जप्त करणेबाबत आदेश मालमत्ता विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ यांनी निर्गमित केले आहे.
संबंधित मे. श्री.समर्थ एंटरप्रायझेस यांस काळ्या यादीत टाकण्यात येत असून, त्यांस अन्य कोणत्याही प्राधिकरणाकडे व्यवसाय करण्यास मनाई करण्यात येत आहे असे प्रसार माध्यमांना सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा