BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत तरूणीचा पाठलाग करणाऱ्या इसमाला नागरिकांचा चोप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : मागील वर्षभर नोकरीवर जाणाऱ्या एका तरूणीचा पाठलाग करणाऱ्या एका इसमाला तरूणीने आरडाओरडा करताच नागरिकांनी रस्त्यावर पकडले. त्याला बेदम चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिले. विष्णुनगर पोलीसांनी संबंधित नोकरदार तरूणीच्या तक्रारीवरून इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की नोकरदार तरूणी आपले आई, वडिल आणि कुटुंबीयांसह महात्मा फुले रस्ता भागातील गायकवाडवाडी भागात राहते. ही तरूणी डोंबिवलीत नोकरी करते. सकाळी ती रिक्षेतून कामाच्या ठिकाणी जाते. कामावरून सुटल्यावर पुन्हा रिक्षेतून घरी येते. मागील वर्षभराच्या कालावधीत तरूणी कार्यालयात जायला निघाली की एक इसम दुचाकीवरून येऊन या तरूणीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. या तरूणीला या तरूणाची भीती वाटायची. सतत हे प्रकार घडू लागल्याने तरूणीने घडत असलेला प्रकार आपल्या आई, वडिलांना सांगितला.

तरूणीने अनेक वेळा पाठलाग करणाऱ्या या इसमाला आपल्या वाट्याला जाऊ नकोस. मला तूझ्याशी कोणत्याही प्रकारचा संंवाद करायचा नाही, अशी तंबी दिली होती. तरीही इसम ऐकत नसल्याने एक दिवस तरूणीने वडिलांना सोबत ठेवले आणि ती कामावर जायला निघाली. नेहमीप्रमाणे इसम पुन्हा तरूणीचा पाठलाग करत आला. त्यावेळी तक्रारदार तरूणीच्या वडिलांनी त्या पाठलाग करणाऱ्या इसमाला रोखून आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारचा आपण त्रास देऊ नये. तिचा पाठलाग करायचा नाही. हा प्रकार सुरू राहिला तर मात्र आम्ही तुझ्या विरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू, असे सांगितले. या प्रकारानंतर काही दिवस इसम तरूणीचा पाठलाग करणे थांबला होता. अलीकडे पुन्हा संबंधित इसम तरूणीचा पाठलाग करून तिला रोखून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. तरूणी त्याला झिडकारत होती. मंगळवारी तरूणी कामावरून सुटल्यावर घरी जाण्यासाठी कार्यालयाच्या बाहेर रिक्षेची वाट पाहत होती. त्यावेळीही संबंधित इसम पुन्हा तरूणीजवळ दुचाकीवरून आला. हा इसम आपल्याशी काही गैरकृत्य किंवा आपल्या जिवाला काही दुखापत करण्याची भीती तरूणीला वाटू लागली. इसम तरूणीजवळून दूर होत नव्हता. यावेळी तरूणीने मोठ्याने आरडाओरडा करून दुचाकीवरील इसम आपल्याला त्रास देत आहे असे सांगितले. पादचाऱ्यांनी त्या तरूणीला त्रास का देतोस, असे प्रश्न करत त्या इसमाला भर रस्त्यात चोप दिला. घनश्याम गुप्ते छेद रस्त्यावर हा प्रकार घडला.

हा प्रकार तरूणीने आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर या इसमाविरुध्द तरुणीच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महात्मा फुले रोड परिसरात मागील अनेक वर्षापासून काही टवाळखोर, गुंडांची दहशत आहे. याच भागातील एका माँटी भाईला पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पत्रकारांना मारहाण प्रकरणी रस्त्यावर झोडपून काढले होते. याच भागातील हा इसम असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत