BREAKING NEWS
latest

३९५ व्या शिवजयंती दिनी शिव गर्जनेत घुमला 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचा प्रांगण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा आणि महाराष्ट्राच्या कडा कपारीतून घुमणारा आवाज म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची दिनांक १९ फेब्रुवारी रोजी जयंती. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित वंदे मातरम् पदवी महाविद्यालय, जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात यंदा ३९५ वी शिवजयंती साजरी केली गेली. एखादे वादळ घोंगावत असताना त्या वादळामधून येणारा आवाज हा सर्वत्र ठिकाणी घुमतो तसंच जणू 'जय भवानी, जय शिवाजी' चा ध्वनी ने संपूर्ण 'जे एम एफ' संस्था आणि संस्थे बाहेरचा परिसर गजबजून गेला. एक महिना पूर्व तयारी करत असलेले महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी हिंदुत्वाच्या ओतप्रोत भावनेने आज शिवजयंती साजरी केली. 
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर सर, शाळेच्या उप-मुख्याध्यापिका तेजावती कोटीयन तसेच सर्व शिक्षक , कर्मचारी, पालक यांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. पालखी मध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेऊन ढोल ताशे, लेझिम वाजवत भव्य दिव्य  शिवाजी महाराजांच्या पालखी ची मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शाळा व परिसर फुलांनी सजवला होता. शिवकालीन संस्कृती जपत सर्व विद्यार्थिनींनी अंगावर नऊवारी चा साज चढविला होता तर सर्व विद्यार्थी भगव्या वेशात हातात हिंदुत्वाचा  भगवा झेंडा फडकवत गर्जनेत नृत्य करत होते. प्रवेश दाराजवळ पालखीचे आगमन होताच संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे औक्षण केले तर सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी पालखी वीरांचे चरण प्रक्षाळून त्याचे स्वागत केले. 
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुलभ गायकवाड तसेच माजी नगरसेवक महेश पाटील व इतर मान्यवर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. शाल,श्रीफळ व प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी बाळ शिवाजीचा पाळणा म्हणत नृत्य सादर केले तर मुलांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि शिवगीत सादर केले. इयत्ता तिसरी मधील यश खामकर ह्या विद्यार्थ्याने मावळा होऊन गायन व नृत्य सादर केले, त्याच बरोबर इतर विद्यार्थ्यांनी शिव गर्जना करून शिवाजी अफझलखान ह्यांची नाटिका सादर केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील बहारदार नृत्य सादर करून शिवरायांना मानवंदना दिली. 
ज्या प्रमाणे काशी-विश्वेश्वर हे भगवान शंकराच्या त्रिशूळावर टिकून उभे आहेत त्याच प्रमाणे आपला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या टोकावर भक्कमपणे उभा आहे, भारदस्तपणे विराजीत आहे, प्रत्येकाच्या नसानसात भिनलेल्या शिवाजी महाराजाचे नाव म्हणजे अभिमानाने आणि गर्वाने फुगणारी छाती आहे, असे उद्गार काढून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. इयत्ता चौथी मधील अर्णव डोंगरे या विद्यार्थ्याने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ट चित्र रेखाटले होते, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी त्याचे कौतुक करून प्रशस्ती पत्रक व बक्षीस दिले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक करून आज आपल्याल्या बाल शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकाच वेळी दर्शन घडले यासारखा मणी कांचन योग नाही असेही जान्हवी कोल्हे यांनी वक्तव्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.एकनाथ चौधरी यांनी केले व पुनश्च शिव गर्जना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत