डोंबिवली - डोंबिवलीतील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात प्रांत अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे. बांधकामासाठी लागणारा सातबारा आणि नकाशे बनावट तयार केले गेले होते. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी रामनगर पोलिसांना खोटे सातबारे, मोजणी नकाशे आणि बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
डोंबिवलीत रेरा नोंदणी घोटाळ्यात ६५ बेकायदा बांधकामं उभी राहिली असल्याची बाब उघडकीस आली आहे. या ६५ बेकायदा इमारत प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि पदाधिकाऱ्यांनी कल्याणचे प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांची भेट घेऊन तक्रार केली होती. बेकायदा इमारतीच्या बांधकामाकरिता खोटे सातबारा आणि मोजणी नकाशे वापरले गेले आहेत, या प्रकरणाची चौकशी करुन करावाई करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला यश आले असून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना अटक होईल, अशी आशा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली. तसेच प्रांत कार्यालयाचे देखील त्यांनी आभार मानले आहे.
प्रांत अधिकारी विश्वास गुजर यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले होते. या चौकशीअंती इमारतीसाठी वापरलेले जाणारे सातबारा आणि मोजणी नकाशे खोटे आहेत ही बाब लक्षात आली. त्यानंतर तहसीलदार शेजाळ यांनी डोंबिवली रामनगर पोलिसांना पत्राद्वारे या संदर्भात त्वरित गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या प्रकरणात हे आदेश दिले गेले आहेत, त्या प्रकरणात खोटे सातबारा आणि नकाशे 'मेसर्स. साई डेव्हलपर्स' तर्फे भागीदार शालिक भगत आणि त्यांचे साथीदार यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस गुन्हा दाखल करुन पुढील तपास करणार आहेत. बिल्डरांसोबत खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीचा म्होरक्या लवकरच अटक होईल, अशी अपेक्षा दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा