अलर्ट सिटीजन फोरम संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून आणि एरियन फाउंडेशन, मुंबई यांच्या CSR सहकार्यातून "प्रोजेक्ट डिग्निटी - दुर्गम शाळांसाठी स्वच्छता सुविधा" या उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या अंतर्गत सावरखिंड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह उभारण्यात आले असून, आज या सुविधांचे विद्यार्थ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधा
ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता ही मोठी समस्या राहिली आहे. अनेक विद्यार्थ्यांना अस्वच्छ किंवा अपूर्ण सुविधांमुळे शिक्षण सोडावे लागते. हा अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने अलर्ट सिटीजन फोरम आणि एरियन फाउंडेशनने हा विशेष उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाद्वारे शाळेत स्वच्छ आणि सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले असून, यामुळे मुलांना आता स्वच्छतेच्या सुविधांचा लाभ मिळणार आहे.
मुलींसाठी मासिकपाळी नियोजन कक्ष - आरोग्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
हा उपक्रम केवळ स्वच्छतागृहापर्यंत मर्यादित न राहता मुलींसाठी स्वतंत्र मासिकपाळी नियोजन कक्ष उभारण्यावरही भर देण्यात आला आहे. ग्रामीण भागात अद्याप मासिकपाळी संदर्भात जागृतीचा अभाव दिसून येतो. मुलींना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे शालेय जीवन व्यत्ययग्रस्त होते. या नियोजन कक्षामुळे मुलींना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात मासिकपाळी व्यवस्थापन करता येईल, तसेच त्यांना स्वच्छतेबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळेल.
स्वच्छतेच्या दिशेने एक मोठी पुढाकार!
"प्रोजेक्ट डिग्निटी" हा केवळ एका शाळेसाठी नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी एक दिशादर्शक उपक्रम ठरणार आहे. अशा सुविधा अधिकाधिक दुर्गम शाळांमध्ये पोहोचाव्यात, यासाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे अलर्ट सिटीजन फोरम आणि एरियन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छता आणि आरोग्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली.
समाजासाठी सकारात्मक बदल घडविणारा उपक्रम
शाळेतील विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी हा उपक्रम निश्चितच आनंददायक आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे शिक्षणासोबतच स्वच्छता आणि आरोग्यासाठीही पोषक वातावरण निर्माण होते. अलर्ट सिटीजन फोरम आणि एरियन फाउंडेशनच्या सामाजिक भान आणि सेवाभावी वृत्तीचे विशेष कौतुक केले जात आहे. ग्रामीण भागातील शाळांसाठी अशी उपक्रमशीलता भविष्यातही सुरू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा