BREAKING NEWS
latest

जोगेश्वरीच्या समस्या सरकारच्या डोळ्यांसमोर, पण उपाय शून्य? आमदार बाळा नर यांचा सवाल!


संदिप कसालकर (वार्ताहर)

मुंबई: जोगेश्वरी (पूर्व) हा मुंबईतील सतत समस्यांनी ग्रस्त असलेला परिसर म्हणून ओळखला जातो. येथे पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, आणि सामाजिक योजनांमधील त्रुटी यांसारख्या गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, सरकारकडून यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार अनंत (बाळा) नर यांनी २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्यक्त केली.

पाणीटंचाईचा प्रश्न भीषण – जबाबदार कोण?

मुंबईत ४,६०० ते ४,८०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना फक्त ४,००० दशलक्ष लिटरच पाणी मिळत आहे. त्यातील ६०० ते ८०० दशलक्ष लिटर पाणी जोगेश्वरीसारख्या भागांपर्यंत पोहोचतच नाही! वाढत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी नवीन जलाशयांची गरज असताना सरकार गप्प का? असा सवाल त्यांनी सभागृहात विचारला.

संजय गांधी निराधार योजनेत अन्याय – गरीब वंचित!

गरजू नागरिकांसाठी असलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील उत्पन्न मर्यादा आजही २५,००० रुपये इतकीच आहे. आजच्या काळात ही रक्कम एका लहान मुलाच्या शैक्षणिक खर्चासाठीही अपुरी आहे. ही मर्यादा ६०,००० रुपये करण्याची गरज असताना सरकार निर्णय का घेत नाही? तसेच, २००५ नंतर गरिबीरेषेखालील नागरिकांची यादीच तयार करण्यात आलेली नाही, त्यामुळे अनेक गरीब कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

वाहतूक कोंडी आणि बेवारस गाड्या – प्रशासन झोपेत?

जोगेश्वरीत वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न बनला आहे. रस्त्यांच्या कडेला अनधिकृत पार्किंग आणि वर्षानुवर्षे पडून असलेल्या जुन्या गाड्यांमुळे वाहतूक ठप्प होते. या गाड्या उचलण्यासाठी आणि ठेवण्यासाठी ट्राफिक विभागाकडे कोणतीही व्यवस्था नाही, हे गंभीर वास्तव आमदार नर यांनी अधोरेखित केले.

जोगेश्वरीकरांसाठी सरकार कधी जागं होणार?

महत्त्वाचे निर्णय घेणारे सरकार आणि प्रशासन या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने जोगेश्वरीकर आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. पाणी, वाहतूक आणि सामाजिक योजनांतील त्रुटी यावर सरकारने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार अनंत (बाळा) नर यांनी केली.

जोगेश्वरीचा विकास हा केवळ घोषणांपुरता राहणार की प्रत्यक्ष कृती होणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत