BREAKING NEWS
latest

मराठीचा सन्मान, कोकण रेल्वे दुपदरीकरण आणि जोगेश्वरी टर्मिनसला मल्टीमोडेल कनेक्टिव्हिटी – खासदार रविंद्र वायकर यांची मोठी मागणी!


संदिप कसालकर (वार्ताहर)

नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील रेल्वे प्रशासनात मराठीचा अधिकाधिक वापर वाढवावा, तसेच कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाला त्वरित गती द्यावी, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली.

लोकसभेतील दालनात गुरुवारी झालेल्या या बैठकीत जोगेश्वरी टर्मिनससाठी मल्टीमोडेल कनेक्टिव्हिटी विकसित करावी, अशी मागणी करण्यात आली. या टर्मिनसला मेट्रोसह इतर सार्वजनिक वाहतुकीशी जोडावे आणि हॉंगकॉंगच्या धर्तीवर आधुनिक सुविधांसह विकसित करावे, असे खासदार वायकर यांनी सुचवले. येथे पार्किंग, हॉटेल्स, मॉल्स आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरवण्याबाबतही त्यांनी निवेदन दिले.

कोकण रेल्वे दुपदरीकरण आणि विलीनीकरणाचा विषय गाजला

कोकण रेल्वे मार्गाच्या (३७० किमी) दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी वायकर यांनी केली. यासंदर्भात केंद्र सरकारने बजेटमध्ये बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ती अद्याप न झाल्याने त्यांनी हा मुद्दा मंत्र्यांसमोर जोरदार मांडला.

तसेच, कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरी गोवा आणि महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यास तयारी दर्शवली आहे, असेही वायकर यांनी मंत्र्यांना सांगितले. याला तत्वतः मान्यता देण्यात आल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोकण रेल्वेच्या पायाभूत सुविधांची मागणी

दुपदरीकरणासाठी सुमारे २० हजार कोटींचा खर्च अपेक्षित असला, तरी या मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी हे काम महत्त्वाचे आहे, असे वायकर यांनी ठामपणे सांगितले. तसेच, जुने पूल आणि बोगद्यांचे सर्वेक्षण करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी रेल्वे मंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे खासदार वायकर यांनी सांगितले. 

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत