BREAKING NEWS
latest

अंधेरी गॅस गळती दुर्घटना: जळते शरीर, उद्ध्वस्त स्वप्नं आणि मदतीसाठी हंबरडा!


मुंबई: संदिप कसालकर

मुंबईतील अंधेरी पूर्व येथे ९ मार्चच्या रात्री झालेल्या भीषण गॅस गळतीमुळे २२ वर्षीय अरविंद कैथल याच्या आयुष्याला काळोखाने ग्रासले आहे. या दुर्घटनेत ८०% भाजलेल्या त्याच्या मित्राचा मृत्यू झाला, तर अरविंद ५५% भाजलेल्या अवस्थेत जीवासाठी झुंज देत आहे. पण त्याच्या कुटुंबासमोर आता जखमांइतकीच मोठी समस्या उभी राहिली आहे – उचलू न शकणाऱ्या रुग्णालयाच्या बिलांची!

आयुष्याचा संघर्ष आणि वाढते हॉस्पिटल बिल

अरविंदला राष्ट्रीय बर्न्स सेंटर, ऐरोली येथे दाखल करण्यात आले आहे. त्याचा रोजचा उपचार खर्च १ लाखांहून अधिक आहे. टाटा ट्रस्टने काही खर्च उचलला असला तरी औषधांसाठी अजूनही मोठी रक्कम भरावी लागते. त्याच्या वडिलांचा हातमजुरीवर संसार आहे, तर भावांची मिळकत फक्त कुटुंब चालवण्यापुरतीच आहे.

"आमची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे. आम्ही भावाला वेदनेत तडफडताना पाहतोय, पण त्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च कोठून आणायचा?" अरविंदचा भाऊ अरुण कैथलने व्यथा मांडली. "नेत्यांनी मदतीचं आश्वासन दिलं, पण मिळालेलं काहीच नाही. फक्त औषधांसाठीच ६६,००० रुपये भरावे लागले आहेत, आणि अजून किती भरणार ते माहीत नाही!"

विजयाचा आनंद…आणि क्षणार्धात पेटलेल्या जखमा!

त्या रात्री भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामना पाहून अरविंद आणि त्याचा मित्र अमन सरोज दुचाकीवर घरी जात होते. शेर-ए-पंजाबजवळ अचानक गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाला आणि काही क्षणांतच दोघे पेटलेल्या अवस्थेत जमिनीवर फेकले गेले!

"आम्ही दोघं आनंदात होतो. पण काही क्षणांत माझा मित्र जळून कोळसा झाला आणि मी मृत्यूशी झुंज देतोय," अरविंदच्या डोळ्यात अश्रू तरळले. अमनने अखेरचा श्वास १० मार्चला घेतला.

चुकीचं कोणाचं? जबाबदारी कोण घेणार?

या दुर्घटनेची चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, महानगर गॅस लिमिटेडच्या पाइपलाइनमध्ये गळती झाली होती. बीएमसीच्या एका ठेकेदाराने परवानगीशिवाय ड्रेनेजसाठी खोदकाम केलं होतं, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. पोलिसांनी संबंधित ठेकेदाराला अटक केली आहे, पण या निष्काळजीपणाची किंमत कोण देणार?

माझ्या भावाला वाचवा... आम्हाला मदतीची गरज आहे!

अरविंद आता आयसीयूमधून बाहेर आला असला तरी पुढील उपचारांसाठी मोठी रक्कम लागणार आहे. त्याच्या कुटुंबाने सरकार, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य जनतेला मदतीसाठी हाक मारली आहे.

"आमचा भाऊ जगण्यासाठी लढतोय, कृपया कोणी तरी मदत करा!" – भावनिक हाक देत त्याचे नातेवाईक आसवांनी डोळे भरून घेत आहेत.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत