मुंबई : जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा क्षेत्रातील गांधीनगर, शिवशक्ती आणि एस.आर.ए. सोसायटीमधील रहिवाशांसाठी मोठा दिलासा! दीर्घकाळ खंडित झालेला विद्युत पुरवठा अखेर पुन्हा सुरू झाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागे आमदार अनंत (बाळा) भि. नर यांच्या सततच्या प्रयत्नांचे मोठे योगदान असून, त्यांच्या ठोस भूमिकेमुळे रहिवाशांना अखेर उजेडाचा आनंद मिळाला आहे.
संक्रमण शिबीरातील रहिवाशांसाठी अंधाराचे संकट
गांधीनगर विभागात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मेसर्स ओमकार डेव्हलपर्स मार्फत पुनर्वसनाचे काम सुरू होते. या प्रक्रियेत पात्र झोपडीधारकांना तात्पुरत्या स्वरुपात 'संक्रमण शिबीरात' हलवण्यात आले. येथे इमारतींच्या लिफ्ट, पाणीपुरवठा व अन्य सुविधा कॉमन मीटरच्या माध्यमातून वीजपुरवठ्यावर चालत होत्या.
मात्र, विकासकाने विजेची थकबाकी न भरल्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटीने वीजपुरवठा खंडित केला. परिणामी, रहिवाशांना मूलभूत सोयी-सुविधांचा मोठा फटका बसला.
आमदार नर यांचा तातडीचा हस्तक्षेप – संकटावर तोडगा!
या गंभीर परिस्थितीत आमदार अनंत (बाळा) भि. नर यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी विकासक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून ३,०९,४७० रुपयांचा धनादेश अदानी इलेक्ट्रिसिटीला सुपूर्द करण्यात आला, आणि अखेर विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.
रहिवाशांचा आनंद, आमदार नर यांचे आभार!
विद्युत पुरवठा पूर्ववत होताच, गांधीनगर, शिवशक्ती आणि एस.आर.ए. सोसायटीच्या रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. त्यांनी आमदार नर यांच्या तातडीच्या कारवाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
"हा विजय फक्त गांधीनगरसाठी नाही, तर संपूर्ण जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा क्षेत्रासाठी एक मोठे यश आहे," असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. आमदार नर यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे वीज संकट सुटले, आणि रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या जनसेवेच्या वृत्तीचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा