कल्याण : २०१४ साली कोळसेवाडी पोलीस ठाण्यात झालेल्या राडा प्रकरणात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण न्यायालयात आपला जबाब नोंदविला. पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याला गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी नकार दिला आहे.
माजी आमदार गणपत गायकवाड आणि निलेश शिंदे यांच्यावर केबलच्या वादातून पोलिस ठाण्यात वाद झाल्याचा आरोप आहे. मात्र, न्यायालयात दोघांनीच हा आरोप फेटाळला. 'त्या वेळी चोरी आणि सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांबाबत आम्ही पोलीसांना भेटण्यासाठी गेले होतो. मात्र कोणताही वाद घडला नाही,' असे दोघांनी न्यायालयासमोर सांगितले. या प्रकरणात गणपत गायकवाड यांनी न्यायालयात आपला जबाब नोंदविला, तर निलेश शिंदे यांनी सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केले. यापूर्वी पाच साक्षीदारांनी केबलच्या वादातून पोलीस ठाण्यात गोंधळ झाल्याची साक्ष दिली होती.
कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड सध्या तळोजा कारागृहात आहेत. महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या प्रकरणात ते अटकेत आहेत. आज न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले, त्यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यांच्या सोबत त्यांचे भाचे कुणाल पाटील आणि विकी गणात्राही न्यायालयात उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी पाच साक्षीदारांच्या जबाबाची माहिती गणपत गायकवाड यांना दिली. साक्षीदारांनी केबलच्या वादातून वाद झाल्याचे सांगितले होते. मात्र, गणपत गायकवाड यांनी "मी त्या वेळी आमदार होतो. आमच्या परिसरात चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. त्यामुळे आम्ही त्या संदर्भात पोलीसांकडे निवेदन द्यायला गेलो होतो, असे स्पष्टीकरण दिले. तसेच, त्यांनी हेही सांगितले की, 'आमच्या विरोधात पोलीसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 'निलेश शिंदे यांनी देखील सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करत 'त्या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रुपेश गायकवाड यांनी मोहिम सुरू केली होती. केबलच्या वादातून काहीच घडले नाही, असे म्हटले.
दरम्यान, माजी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयात जेवण करण्याची अनुमती देण्यात आली होती. मात्र, सुनावणीनंतर त्यांना पुन्हा कारागृहात नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. काही समर्थकांनी त्यांचा व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि समर्थकांमध्ये मोठी रेटारेटी झाली. परिणामी, न्यायालयाच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा