BREAKING NEWS
latest

ए.आय. आधारित डिजिटल परिवर्तनासाठी महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात भागीदारी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार झाला. यानुसार, राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता (ए.आय.) केंद्र स्थापन होणार आहे. हा करार “डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र” संकल्पनेला बळकटी देईल, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल. याचा थेट लाभ नागरिकांना होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

*या सामंजस्य कराराअंतर्गत महाराष्ट्रात तीन ए.आय. उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील:*

मुंबई – भूगोल विश्लेषण केंद्र: या केंद्राच्या माध्यमातून उपग्रह इमेजरी आणि जी.आय.एस. चा वापर करून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस सहाय्य मिळेल.

पुणे – न्यायवैज्ञानिक संशोधन आणि ए.आय. केंद्र: गुन्हे तपास आणि न्यायवैज्ञानिक विश्लेषणासाठी ए.आय.चा वापर वाढविण्यात येईल.

नागपूर – मार्व्हेल केंद्र: कायद्यांची अंमलबजावणी, दक्षता आणि प्रशासन सुधारण्यासाठी ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

याव्यतिरिक्त, मायक्रोसॉफ्टचे कोपायलट (Copilot) तंत्रज्ञान शासनाच्या कार्यप्रणालीत लक्षणीय सुधारणा करेल. दस्तऐवज व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण शक्य होईल. हेल्थकेअर, जमीन अभिलेख व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांमध्येही सुधारणा होईल. यामुळे शासनाची सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकहितैषी बनेल.

मायक्रोसॉफ्टच्या एमएस लर्न (MS Learn) प्लॅटफॉर्मद्वारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ए.आय. (AI) प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळेल, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमता सुधारतील. या सहकार्यामुळे महाराष्ट्रातील आयटी (IT) आणि ए.आय. (AI) क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

या पुढाकारामुळे महाराष्ट्र प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याचा आणि डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा पाऊल टाकण्याचा मार्ग मोकळा होईल. महाराष्ट्र हे ए.आय.(AI) - आधारित सरकारी सेवा सुधारण्यासाठी देशातील अग्रणी राज्य बनेल, आणि देशभरातील नागरिकांना उत्तम सेवा मिळवून देईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत