मुंबई : राज्य परिवहन विभागाकडून मांडण्यात आलेल्या ई-बाईक टॅक्सी सुरु करण्याच्या प्रस्तावाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रात फक्त ई-बाईक टॅक्सीलाच परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसार माध्यमांना सागितलं आहे.
"परिवहन विभागाच्या माध्यमातून ई-बाईक टॅक्सीचा प्रस्ताव मंत्रिमडळाच्या मान्यतेसाठी ठेवला होता. सर्व मंत्र्यांनी महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे. आत्तापर्यंत एकट्या प्रवाशांची गैरसोय होत होती. रिक्षा-टॅक्सीसाठी एका प्रवाशालाही तिप्पट भाडं द्यावं लागत होतं. आता ई-बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार आहे”, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
या प्रवासासाठी १५ किमी अंतराची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ५० बाईक एकत्रपणे घेणाऱ्या संस्थेला अशा प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली जाईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही चांगली नियमावली बनवली आहे. दोन प्रवाशांमधील पार्टिशन, पावसाळ्यात प्रवासी भिजू नये यासाठी पूर्ण कव्हर असणाऱ्याच ई-बाईकला आम्ही परवानगी देणार आहोत. ई-बाईकला प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण राज्य सरकारने ठरवलं आहे, असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा