BREAKING NEWS
latest

पैशांअभावी उपचार नाकारले, जीव धोक्यात! – 'न्याय रणभूमी' व इतर माध्यमांच्या बातमीची दखल; खासदार रविंद्र वायकर यांची थेट हॉस्पिटलला भेट


संदिप कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबई: अंधेरी पूर्वेतील नामांकित होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये हृदयविकारग्रस्त ५२ वर्षीय अमृतलाल सोनी यांना डिपॉझिट नसल्यामुळे उपचार नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना 'न्याय रणभूमी' व इतर माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. त्रासात असलेल्या रुग्णाला जवळपास दीड तास हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थ अवस्थेत बसवून ठेवण्यात आले. अखेर नातेवाईकांनी त्यांना महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल केलं, जेथे सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, होली स्पिरिटसारख्या धर्मादाय हॉस्पिटलकडूनही गोरगरीब रुग्णासाठी राखीव असलेल्या सुविधांचा लाभ नाकारण्यात आला. रुग्णाच्या नातेवाईकांनी २५ हजार रुपयांचे डिपॉझिट देण्याची तयारी दर्शवली होती, तरीही हॉस्पिटल प्रशासनाने ताठर भूमिका घेतली. धर्मादाय रुग्णालय असूनही अशा प्रकारची अमानुष वागणूक मिळाल्याने जनतेमध्ये तीव्र संताप आहे.


या घटनेनंतर नागरिकांच्या तक्रारी आणि 'न्याय रणभूमी' व इतर माध्यमांच्या बातमीची दखल घेत खासदार रविंद्र वायकर यांनी होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये अचानक भेट दिली. हॉस्पिटल प्रशासनाची कानउघाडणी करत त्यांनी रुग्णांबरोबर यापुढे सुसंवाद आणि सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी, अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिला. धर्मादाय हॉस्पिटल म्हणून गोरगरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य, राखीव सुविधा आणि तातडीची मदत मिळावी, यासाठी रचनात्मक बदल करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.


या बैठकीस मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र खंदाडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी, कार्यकारी संचालक सिस्टर लीसी, उपसंचालक सिस्टर फेलसी, मेडिकल डायरेक्टर डॉ. सुसंन तसेच माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, सदानंद परब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, विधानसभा संघटक संतोष गिरी, शाखा प्रमुख भालचंद्र जोशी, प्रकाश शिंदे, उपेश सावंत, अंशिका जाधव आणि भाई मिर्लेकर उपस्थित होते.

या प्रकारानंतर नागरिकांमधून अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, "या पुढेही पालिकेने आणि लोकप्रतिनिधींनी तत्काळ, ठोस पावले उचलावीत"


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत