डोंबिवली : हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्ष नवमी तिथी म्हणजेच रामनवमी, रामजन्म. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील रामजन्म सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागपूर येथील उच्च शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक श्री. परशुरामजी भांगे, सौ. पुष्पा भांगे, संस्थेच्या खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्वप्रथम विद्यार्थिनी इव्हा शॉ व रोमी शॉ या भगिनींनी राम स्तुती वर आधारीत 'ठुमक चलत रामचंद्र..' हे नृत्य सादर केले. इयत्ता पाचवी मधील अवंत या विद्यार्थ्याने श्रीरामाची गोष्ट सांगून माहिती दिली. इयत्ता चौथी मधील समायरा, जाई, आणि रूही या विद्यार्थिनींनी आपल्या शास्त्रीय नृत्यातून संपूर्ण रामायण सादर केले तर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. सर्व मुले राम लक्ष्मण सीता, हनुमान, तसेच रामायण मधील इतर पात्र बनून आले होते. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गीत रामायण मधील 'नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू..' हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गणित विषयाच्या शिक्षिका सौ. सुरुची पंड्या यांनी राम चरित मानस मधील पद गाऊन सर्वांना आनंद दिला. तर दुपारच्या सत्रात नाट्य विभागाचे शिक्षक नितेश मेस्त्री यांनी 'आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.. हे गीत सादर करून सर्वांच्या डोळ्यासमोर अयोध्येचे चित्र उभे केले.
पुत्र असावा तर रामासारखा, पती असावा तर रामासारखा, भाऊ असावा तर रामासारखा. श्रीरामा सारखा संयम, शत्रूलाही सुहास्य वदनाने नमविता आले पाहिजे अशा मर्यादा पुरुषोत्तमाचे गुण सर्वांमध्ये असले पाहिजेत, असे प्रमुख पाहुणे श्री. परशुरामजी भांगे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा देताना सांगितले. तर चार युगांची माहिती देत कलियुगामध्ये देव आणि दानव हे कसे मानवाच्या अंतर्गत आहेत आणि त्या अंतर्मनावर मात करण्यासाठी श्रीरामाचे अंतर बाह्य अवलोकन करणे गरजेचे आहे असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी मुलांना सांगून श्रीरामसारखे निस्वार्थी प्रेम करा असेही सांगितले व शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे सध्या शैक्षणिक चर्चासत्रासाठी माउंट अबू येथे वास्तव्यास आहेत, तेथूनच त्यांनी दूरचित्र संभाषण द्वारे (व्हिडिओ कॉल) सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. रामासारखे चरित्र, निस्सिम बंधूप्रेम, आज्ञाधारक, प्रसंगी शत्रूलाही लढा देऊन क्षमा करणारा केवळ श्रीराम आहे, अशा श्रीरामसारखे कर्तुत्ववान व्हा असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे व डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले व सर्वांना पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.
आजच्या दिवशी मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये जणु काही अयोध्या सजली होती. श्री. नरेश पिसाट, अवधूत देसाई सर यांनी सर्व ठिकाणी भगवे पताके, फुलांच्या माळा, रांगोळ्या यांची भव्य दिव्य सजावट केली होती. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाल्यावर पाहुण्यांच्या हस्ते पाळण्या मध्ये श्रीरामाची मूर्ती ठेऊन, संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी 'राम जन्मला ग सखी..' हा पाळणा गाऊन राम जन्म सोहळा संपन्न झाला. तसेच रामाची आरती करण्यात आली. त्याच बरोबर चैत्र महिना म्हणजे चैत्र देवीचे नवरात्र, तुळजा भवानी देवीची पूजा करून आरती करण्यात आली. कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, दीपा तांबे , रमेश वागे, सौ.मयुरी खोब्रागडे सौ. श्रेया कुलकर्णी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाची उत्तम तयारी करून राम जन्म सोहळा संपन्न केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा