BREAKING NEWS
latest
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Breaking News लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शहरातील ११ केव्ही विज केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने लागलेल्या आगीत ट्रान्स्फॉर्मर जळून खाक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

गंगाखेड : उपजिल्हा रूग्णालय कर्मचाऱ्यांचे निवासस्थान आहे. त्याच्या समोरील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ११ केव्ही विज वितरण केंद्रातील विजेचा ट्रान्स्फॉर्मर तांत्रिक बिघाडाने लागलेल्या आगीत पूर्णतः जळून खाक झाला. अग्निशमन दलाची गाडीला ट्रान्स्फॉर्मर जवळ जाण्यासाठी मोकळा रस्ता असल्याने सदरील आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा परीसरात वाऱ्याच्या वेगाने आग सर्वत्र पसरत होती. सुदैवाने मोठी हानी टळली. ही घटना दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रान्स्फॉर्मरचे प्राथमिक अंदाजानुसार एक कोटीचे रूपयाचे नुकसान झाले.
      
गंगाखेड शहरात विज वितरण करणाऱ्या ११ केव्ही केंद्रात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ट्रान्स्फॉर्मर मधुन धुर येत होता. या धुराचे आगीत रूपांतर झाल्याने आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर उडत होते. उडणाऱ्या या आगीच्या लोळामुळे परिसरातील दुकाने व घरांना आगीचा धोका निर्माण झाला. येथिल महावितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नगरपालीकेच्या अग्निशमन दलास बोलावुन घेतले. अग्निशमन दलास येण्यास एक तास लागला. अग्निशमन दलाचे वाहन जळत असलेल्या ट्रान्स्फॉर्मर जवळ जाण्यासाठी मोकळा रस्ता असल्याने अग्निशमन दल थेट ट्रान्स्फॉर्मर जवळ गेले. अग्निशमन दलाने पाण्यानी आग आटोक्यात येत नसल्याने पाण्यात ए.एस.के.ए.या केमिकलचे डबे मिसळून आग आटोक्यात आणली. दोन तासाच्या अथक परीश्रमाने आग आटोक्यात आणल्याने परीसरातील संभाव्य दुर्घटनेचे संकट टळले. या आगीत ट्रान्स्फॉर्मर, केबल वायर, इन्सुलेटर, व इतर साहित्य जळून  खाक होऊन जवळपास अंदाजे एक कोटीची नुकसान झाले.
    
ट्रान्स्फॉर्मरमधुन धुर येत असताना ट्रान्स्फॉर्मर बंद केले नाही. तसेच ११ केव्ही विज केद्रापासुन नगरपालीकेचे अग्निशमन दल केवळ हाकेच्या अंतराऐवढे असताना अग्निशमन दलास बोलावण्यात उशिर का झाला. सदरील घटनाच संशयाच्या भोवऱ्यात फिरत असल्याने अनेक तर्क वितर्क नागरीक काढत आहेत.

३९५ व्या शिवजयंती दिनी शिव गर्जनेत घुमला 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचा प्रांगण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा आणि महाराष्ट्राच्या कडा कपारीतून घुमणारा आवाज म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची दिनांक १९ फेब्रुवारी रोजी जयंती. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित वंदे मातरम् पदवी महाविद्यालय, जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात यंदा ३९५ वी शिवजयंती साजरी केली गेली. एखादे वादळ घोंगावत असताना त्या वादळामधून येणारा आवाज हा सर्वत्र ठिकाणी घुमतो तसंच जणू 'जय भवानी, जय शिवाजी' चा ध्वनी ने संपूर्ण 'जे एम एफ' संस्था आणि संस्थे बाहेरचा परिसर गजबजून गेला. एक महिना पूर्व तयारी करत असलेले महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी हिंदुत्वाच्या ओतप्रोत भावनेने आज शिवजयंती साजरी केली. 
'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाडर सर, शाळेच्या उप-मुख्याध्यापिका तेजावती कोटीयन तसेच सर्व शिक्षक , कर्मचारी, पालक यांनी हजेरी लावून कार्यक्रमाचा आनंद लुटला. पालखी मध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेऊन ढोल ताशे, लेझिम वाजवत भव्य दिव्य  शिवाजी महाराजांच्या पालखी ची मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण शाळा व परिसर फुलांनी सजवला होता. शिवकालीन संस्कृती जपत सर्व विद्यार्थिनींनी अंगावर नऊवारी चा साज चढविला होता तर सर्व विद्यार्थी भगव्या वेशात हातात हिंदुत्वाचा  भगवा झेंडा फडकवत गर्जनेत नृत्य करत होते. प्रवेश दाराजवळ पालखीचे आगमन होताच संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे औक्षण केले तर सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे व संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी पालखी वीरांचे चरण प्रक्षाळून त्याचे स्वागत केले. 
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुलभ गायकवाड तसेच माजी नगरसेवक महेश पाटील व इतर मान्यवर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. शाल,श्रीफळ व प्रेमाचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी बाळ शिवाजीचा पाळणा म्हणत नृत्य सादर केले तर मुलांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि शिवगीत सादर केले. इयत्ता तिसरी मधील यश खामकर ह्या विद्यार्थ्याने मावळा होऊन गायन व नृत्य सादर केले, त्याच बरोबर इतर विद्यार्थ्यांनी शिव गर्जना करून शिवाजी अफझलखान ह्यांची नाटिका सादर केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील बहारदार नृत्य सादर करून शिवरायांना मानवंदना दिली. 
ज्या प्रमाणे काशी-विश्वेश्वर हे भगवान शंकराच्या त्रिशूळावर टिकून उभे आहेत त्याच प्रमाणे आपला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीच्या टोकावर भक्कमपणे उभा आहे, भारदस्तपणे विराजीत आहे, प्रत्येकाच्या नसानसात भिनलेल्या शिवाजी महाराजाचे नाव म्हणजे अभिमानाने आणि गर्वाने फुगणारी छाती आहे, असे उद्गार काढून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. इयत्ता चौथी मधील अर्णव डोंगरे या विद्यार्थ्याने स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्कृष्ट चित्र रेखाटले होते, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी त्याचे कौतुक करून प्रशस्ती पत्रक व बक्षीस दिले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक करून आज आपल्याल्या बाल शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकाच वेळी दर्शन घडले यासारखा मणी कांचन योग नाही असेही जान्हवी कोल्हे यांनी वक्तव्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.एकनाथ चौधरी यांनी केले व पुनश्च शिव गर्जना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र्य सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असून, शिवजयंती दिनी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मुलांना, विद्यार्थ्यांना आपली तत्वे, मुल्ये आणि गौरवशाली वारशाची ओळख होईल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र्य सगळ्यांसाठीच प्रेरणादायी असून, शिवजयंती दिनी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमांमुळे मुलांना, विद्यार्थ्यांना आपली तत्वे, मुल्ये आणि गौरवशाली वारशाची ओळख होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आज केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून, आज किल्ले दुर्गाडी समोरील नॅशनल ऊर्दु हायस्कुल पासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यासमयी बोलताना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त वंदना गुळवे, स्वाती देशपांडे, अतुल पाटील, संजय जाधव, अवधुत तावडे, रमेश मिसाळ, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेशचंद्र, स्वच्छ भारत अभियानाचे महापालिकेचे ब्रँड अँबॅसिडर डॉ. प्रशांत पाटील, अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, प्रशांत भागवत, योगेंद्र राठोड‍, शैलेश कुळकर्णी, मनोज सांगळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, शिक्षणाधिकारी विजय सरकटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
आजच्या शिवजयंती दिनाचा प्रारंभ शालेय विद्यार्थी, शिक्षक, महापालिका अधिकारी व कर्मचारी आरएसपी शिक्षक अधिकारी ,स्काऊट गाईड विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, विद्यार्थी यांच्या भव्य रॅलीने झाला. सकाळच्या शितल वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांच्या वेशभुषेत तसेच पारंपारिक पोषाखात रॅलीमध्ये सहभागी झालेल्या बालचमुने, सर्व पांथस्थांचे लक्ष वेधून घेतले होते. सदर रॅलीची सांगता लाल चौकी - सहजानंद चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिरात झाली. यावेळी आमदार सुलभाताई गायकवाड आणि महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
तद्नंतर प्र.के.आचार्य अत्रे रंगमंदिरात महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिवरायांविषयी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यासमयी आमदार सुलभाताई गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव व इतर मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना न्याय मिळून दिला, त्यांना माझा मानाचा मुजरा आहे" असे सांगत आमदार सुलभाताई गायकवाड यांनी विद्यार्थी वर्गास शिवजयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
दुर्गाडी खाडी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले नौदल आरमाराची स्थापना केली होती. ही आठवण जतन करण्यासाठी महापालिकेमार्फत सदर ठिकाणी नौदल संग्रालय उभारण्यात येत असून, सदर संग्रालय नागरिकांसाठी लवकरच खुले करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी यावेळी दिली.

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव व प्रशांत पाटील यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. यानंतर महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताचे गायन झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
डोंबिवलीतही घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, अवधूत तावडे यांनी डोंबिवली (पूर्व) मानपाडा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकारी अभियंता मनोज सांगळे , ६/फ व ८/ग प्रभागाचे सहा. आयुक्त अनुक्रमे हेमा मुंबरकर, संजयकुमार कुमावत तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांचे रुग्णालयातूनही काम सुरूच..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून आमदार झाल्यापासून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी प्रत्येक क्षण नागरिकांच्या सेवेत वाहून घेतला आहे. अपघातानंतर गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात असतानाही नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देत एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे आपल्या नेत्याच्या पावलावर पाऊल टाकून आमदार मोरे यांनी दाखवून दिले आहे. आठवड्याभरातील प्रस्तावित कामे रखडून पडू नयेत यासाठी शस्त्रक्रिया पूर्ण होताच वेळ न दवडता या कामांच्या फाईल्स मागवून घेत त्यावर स्वाक्षऱ्या करत आमदार मोरे यांनी अधिकाऱ्यांना ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे अंबरनाथ येथील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रकल्प पाहणी दौऱ्यात पाय घसरून पडल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. लीलावती रुग्णालयात त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र शस्त्रक्रियेनंतरही आराम न करता त्याच दिवशी नियोजित कामांचा निपटारा करताना आमदारांना आपण रुग्णालयात असल्याचाही विसर पडला. रस्ते बाधितांना मोबदला, पाणी प्रश्नावर बैठका, रस्त्यातील इलेक्ट्रिकचे उघडे डीपी बॉक्स आणि पोल स्थलांतरणासाठी महावितरणकडे पाठपुरावा यासारख्या कामांचे नियोजन या आठवड्यात करण्यात आले होते. ही कामे आपण रुग्णालयात असल्याने रखडून पडू नयेत यासाठी आमदार मोरे यांनी रुग्णालयातच या कामांच्या फाईल्स मागवून घेत त्यावर स्वाक्षऱ्या करत संबंधित विभागाला तातडीने पत्रे पाठविण्याचे निर्देश दिले. तर अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत पाठविलेल्या पत्रांवरती चर्चा करत कामे रखडून पडणार नाही याची काळजी घ्या अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

केडीएमसीला स्मार्ट गव्हर्नन्ससाठी प्रतिष्ठित 'SKOCH म्युनिसिपल गोल्ड पुरस्कार' सन्मान !

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सन २००२ पासून 'ई-गव्हर्नन्स' प्रणाली कार्यान्वीत असून विविध पुरस्कारांसोबत सर्वोत्कृष्ट ई- गव्हर्नन्स सोल्यूशन म्हणून सन २००४ आणि सन २०११ मध्ये SKOCH ग्रुपतर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अशाच प्रकारे स्मार्ट गव्हर्नन्स क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी प्रतिष्ठित 'SKOCH म्युनिसिपल गोल्ड' पुरस्कार दिनांक १५-०२-२०२५ रोजी नवी दिल्ली येथे SKOCH ग्रुपचे अध्यक्ष श्री. समीर कोचर यांच्या हस्ते महापालिकेस प्रदान करण्यात आला. हा सन्मान महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी स्वीकारला.महापालिकेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा मिळत आहेत.

“डिजिटल गव्हर्नन्स आणि स्मार्ट सेवा – एक महत्त्वपूर्ण पाऊल”

या उपक्रमाच्या माध्यमातून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन व सार्वजनिक सेवा सुधारणा यामध्ये मोठी प्रगती करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल वाढ, स्वयंचलित प्रक्रिया, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढवणे यावर भर देण्यात आला आहे.

महसूल सुधारणा :- डिजिटल पेमेंट आणि पारदर्शक व्यवहार प्रणाली यामुळे महसूलात वाढ झाली आहे.

स्वयंचलित प्रक्रिया :-  कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप कमी करून प्रत्यक्ष सेवा जलद गतीने देता याव्या यासाठी स्वयंचलित प्रक्रीयेचा अवलंब करण्यात येत आहे.

नागरिक सहभाग आणि सहजता :- सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देऊन अर्ज करणे आणि सेवा प्राप्त करून घेणे हे सहज आणि सुलभ झाले.

डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया :- व्यवस्थापकीय निर्णयांची अचूकता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर.

पुरस्कार स्वीकारताना महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी सांगितले की, ”हा पुरस्कार केडीएमसीच्या टीमच्या अथक परिश्रमांचे प्रतीक आहे. डिजिटल गव्हर्नन्स आणि स्मार्ट सेवांच्या मदतीने आम्ही शहरातील नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.भविष्यातही या प्रवासात सातत्य ठेवू.”

या सन्मानामुळे केडीएमसीच्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित सेवा आणि प्रशासकीय सुधारणा यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. हा पुरस्कार केडीएमसीच्या सर्व अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेत सजला द्राक्षांचा मळा, आनंद लुटण्यासाठी झाले बालगोपाल गोळा तर खजिनदार जान्हवी कोल्हे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : निसर्गाच्या सान्निध्यात राहणे सर्वानाच आवडते. त्यातून फेब्रुवारी महिना म्हणजे द्राक्षांचा महिना, सर्व मुलांना आवडणारे फळ म्हणजे द्राक्ष. असाच आनंद लुटण्यासाठी 'जे एम एफ' मंडपात द्राक्षांचा मळा फुलवण्यात आला आणि द्राक्षांबरोबरच कलिंगड, केळी , अननस, आणि अनेक फळं ठेवण्यात आली. मोठा मळा बनवून द्राक्षांचे घोस दोरीला लटकवून ठेवले गेले ही कल्पना अस्तित्वात आणली ते म्हणजे 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव माननीय डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी. मुलांच्या आनंदामधे आनंद मानणारे कोल्हे दाम्पत्य नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी सज्ज असतात.
१७ फेब्रुवारी रोजी संस्थेच्या खजिनदार व चित्रपट दिग्दर्शिका जान्हवी कोल्हे यांचा वाढदिवस. दरवर्षी जान्हवी मॅडम चा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांचे आजी आजोबा सोबत साजरा केला जातो व निसर्गाच्या सानिध्यात छोट्याशा सहलीचे आयोजन केले जाते, पर्यंतु ह्या वर्षी मुलांसहित सर्व पालकांना, आजी आजोबांना 'जे एम एफ' मंडपम मध्ये साकारलेल्या द्राक्षांच्या मळ्यामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. पालकांनीही मुलांबरोबर येथेच्छपणाने द्राक्षाचा आनंद लुटला. संस्थेच्या सचिव व जान्हवी कोल्हे यांच्या मातोश्री डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या लेकीला औक्षण करून भरभरून आशीर्वाद दिला तर संस्थापक व पिताश्री डॉ. राजकुमार कोल्हे यांनी देखील लाडक्या लेकीला 'यशस्वी भव' असा शुभाशीर्वाद दिला. त्यासोबत सर्व आजी आजोबांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. एकाच वेळी एवढे मोठे मनापासून दिलेले आशीर्वाद आणि शुभेच्छांचा वर्षाव बघून मी कृतकृत्य आणि धन्य झाले असे उद्गार जान्हवी कोल्हे यांनी काढले. प्रत्येक वाढदिवस हा मला नेहमीच नवीन अनुभव आणि आनंद देऊन जातो आणि दरवर्षीच 'जे एम एफ' कुटुंबाबरोबर मला माझा वाढदिवस साजरा करण्यात आनंद मिळतो असेही त्या म्हणाल्या.
सर्व कलात्मक शिक्षकांनी ही द्राक्षांची बाग बनवली. शिशुविहार ते इयत्ता आठवी पर्यंत सर्वच मुलांनी लटकवलेली द्राक्ष हात न लावता, उडी मारून खाण्याचा आनंद घेतला. अनेक फळांनी सजवलेली ही बाग म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच होती. शिशु विहार च्या शिक्षकांनी सुंदर रित्या फळे कापून फळांचा केक, फळाचे प्राणी आणि सुबकरीत्या फळांचे तबक सजवून ठेवले होते. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांच्या हस्ते बागेचे उद्घाटन करून सर्व मुलांनी एकच जल्लोष केला व स्वतः डॉ. श्री व सौ कोल्हे यांनी मुलांना त्यांच्या हाताने खाऊ घातले. द्राक्षाच्या बागेत तर-तऱ्हेची खेळणी ठेवण्यात आली होती. सर्व मुलांनी त्या सर्व खेळण्याचा आनंद लुटला.
फलाहार हा आरोग्यासाठी नेहमीच चांगला असतो, रोज पिझ्झा, बर्गर, मॅगी सारखे फास्ट फूड न खाता ऋतुनुसार फळं खावी, असे सांगून डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सर्वांना मनसोक्तपणे फळे खाऊ घातली. रोजच्या शालेय डब्यात देखील रोज एक फळ आणा आणि प्रतिकार शक्ती वाढवा असे सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगितले. 'जन गण मन' सीबीएसई , विद्यामंदिर तसेच पदवी व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व मुलांनी द्राक्ष महोत्सवाचा आनंद लुटला. शिशु विहार मधील अनेक छोट्या मुली मुले शेतकरी वेशभुषेमधे आली होती, व स्वतःच्या हाताने फळांचे तबक घेऊन आनंदाने वावरत होते. सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील 'जे एम एफ' द्राक्ष बागेत बागडण्याचा आनंद घेतला.

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’ !


प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दि २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.  या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
    
या उपक्रमात कसे सहभागी व्हाल?

आपण स्वतः कवी, लेखक, कलाकार, गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही (वाचन) आपण करू शकता. याबरोबरच गझल वाचन, गायन, लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग, पोवाडे, नाट्यछटा, लघुकथा, गायन, भारुड आधी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. तर चला मग करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला.

“व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन”

आपले व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील.
    
आपले व्हिडिओ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ईमेल: <dgiprdlo@gmail.com> या ईमेलवर अथवा ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६ या व्हॉट्सऍप क्रमांकावर तसेच ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या <diothane2013@gmail.com> अथवा 9503546004 या व्हॉट्सऍप क्रमांकावर पाठवावेत.
    
महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खालील समाजमाध्यमांवर उत्कृष्ट व्हिडिओ व कलाकृतीला प्रसिद्धी देण्यात येईल –
महासंवाद – <https://mahasamvad.in/> 
एक्स – <https://twitter.com/MahaDGIPR> 
फेसबुक – <https://www.facebook.com/MahaDGIPR> 
इन्स्टाग्राम – <https://www.instagram.com/mahadgipr> 
युट्यूब – <https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR>
टेलिग्राम चॅनल – <https://t.me/MahaDGIPR>

तरी, ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ या उपक्रमात सहभागी व्हावे व आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळवावी, असे आवहन ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.

कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर : प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. भाविक जात, भाषा, पंथ विसरून कुंभमेळ्यात एकत्रित येतात. हा समाजाच्या एकतेचा योग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

’महाकुंभ प्रयाग योग ‘ कार्यक्रमाला उपस्थिती

शहरातील रेशीमबाग मैदानात आयोजित ‘महाकुंभ प्रयाग योग’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. 'द सत्संग फाउंडेशन' नागपूर केंद्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, राजेश लोया, अमेय मेटे आदी यावेळी उपस्थित होते.

५० कोटींपेक्षा जास्त भाविकांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात स्नान केले. ज्या भाविकांना कुंभमेळ्यात जाण्याचा योग आला नाही त्यांच्यासाठी प्रयागराज येथील संगमावरील जल नागपुरात आणण्यात आले. यासाठी महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

आजवर कोट्यवधी भाविकांनी महाकुंभादरम्यान प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या स्नानाची अनुभूती व्हावी या अनुषंगाने प्रयागराज येथील जल रामटेकमार्गे नागपुरात आणण्यात आले होते. या अनुषंगाने महाकुंभ प्रयाग योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

साडे सहा हजार कुटुंब बेघर करणाऱ्या बिल्डर आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? दीपेश म्हात्रे यांचा संतप्त सवाल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : साडे सहा हजार कुटुंबांना बेघर होऊ देणार नाही, त्यांच्या घरांवर कारवाई होऊ देणार नाही.. आदित्य ठाकरेंसह पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामावर मनपा कायदेशीर कारवाई करत असताना अनधिकृत इमारतींमधील नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्या ६५ इमारतींमधील रहिवाशांच्या घरांवर तोडक कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या रहिवाशांना पाठिंबा दर्शवला आहे. या इमारतीमधील रहिवाशांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेत घरांवर कारवाई होऊ देणार नाही असे दीपेश म्हात्रे म्हणाले. याबाबत आदित्य ठाकरेंसह उद्धव बाळासाहेब ठाकरे व पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असे सांगितले आहे.
दीपेश म्हात्रे यांनी “ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावर कारवाई, मात्र ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई नाही हा कोणता न्याय ?" असा संतप्त  सवाल उपस्थित केला. यावेळी बोलताना ज्या कथित बिल्डरांवर गुन्हे दाखल झाले ते बिल्डर नाहीत, त्यामागचे सूत्रधार दुसरेच आहेत, खोटे कागदपत्र बनवले, खोटे कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशन केले. शासनाची फसवणूक केली. मात्र याप्रकरणी खोटी कागदपत्र बनवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही, त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप देखील दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पत्रकारांना सांगितले. 
                               
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या खोट्या कागदपत्राच्या आधारे महारेरा प्रमाणपत्र मिळविलेल्या ६५ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर इमारत वाचविण्यासाठी न्यायलयात गेलेल्या 'साई गॅलेक्सी' इमारतीची याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावल्याने या इमारतीवर कारवाई होण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे या इमारती मधील रहिवासी हवालदिल झाले आहेत. आपल्याला खोटी कागदपत्र देऊन आपली फसवणूक करणाऱ्या विकासकांवर, पालिका अधिकाऱ्यांना रान मोकळे करून आपल्यावर अन्याय का असा प्रश्न या इमारती मधील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
                              
शिवसेना ठाकरे गटाने रहिवाशांच्या बाजूने आज मेळावा आणि पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी यावेळी याप्रकरणी बोलताना रहिवाशांचा कोणताही दोष नसताना त्यांच्यावर कारवाई होत आहे, मात्र ज्यांनी रेराचे खोटे कागदपत्र तसेच स्टॅम्प बनवले, खोटे रजिस्ट्रेशन केले त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, या प्रकरणात अशा कोणत्याही व्यक्तीला अटक केलेली नाही. मग कारवाई फक्त दिखाव्यासाठी होती का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
या प्रकरणाची ६५ बिल्डरांची जी यादी दिली ते खरे बिल्डर नाही, डमी उभे केले आहेत, या यादीत प्रत्यक्ष त्या बांधकाम साईटवर काम करणारे इलेक्ट्रिशन, प्लंबर, लेबर यांची बिल्डर म्हणून नावे आहेत. त्यांची बांधकाम व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. हे एक मोठे रॅकेट आहे, या रॅकेटला राजकीय वरदहस्त आहे. ते उघड झाले पाहिजे अशी मागणी यावेळी म्हात्रे यांनी केली. या रहिवाशांच्या पाठीशी उद्धव  बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष खंबीरपणे उभा आहे असे दीपेश  म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.