BREAKING NEWS
latest
featured लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
featured लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

फायर इक्स्टिंग्विशर हातात... नागरिक सज्ज! अग्नी सुरक्षा सप्ताहात धडाकेबाज उपक्रम!

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

जोगेश्वरी | एप्रिल २०२५
अग्नी सुरक्षा सप्ताह २०२५ निमित्ताने मुंबई अग्निशमन दलातर्फे शहरभर विविध ठिकाणी जनजागृतीचे उपक्रम राबवले जात आहेत. "सावध रहा, सुरक्षित रहा!" या संदेशासोबत नागरिकांना आगीच्या धोक्यांपासून बचावाचे धडे दिले जात आहेत.

१३ एप्रिल – रणभेरी वाजली रस्त्यावर!
परिमंडळ ३ तर्फे वांद्रे अग्निशमन केंद्र ते अंधेरी अग्निशमन केंद्र दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायरन, बॅनर्स आणि अग्निशमन दलाच्या शिस्तबद्ध पावलांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

१५ एप्रिल – समाजाच्या हृदयाशी भिडले ‘फायर सेफ्टी’चे धडे!
शिव साफल्य गृहनिर्माण संस्था, शिवाजी नगर, जोगेश्वरी (पूर्व) येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
"आग लागल्यावर घाबरायचं नाही, सज्ज व्हायचं!" या मंत्रासोबत नागरिकांना फायर इक्स्टिंग्विशर वापरण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

अग्निशमन दलाचे अधिकारी, स्वयंसेवक यांची प्रेरणादायी उपस्थिती
या कार्यक्रमात मरोळ अग्निशमन केंद्राचे वरिष्ठ केंद्र अधिकारी अजय जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून कायम सज्जतेचा संदेश दिला.
समाजसेविका आणि अग्निशमन स्वयंसेविका सुरक्षा घोसाळकर यांनी महिलांना आग लागल्यास काय काळजी घ्यावी यावर विशेष मार्गदर्शन केले.

स्थानिक सहभाग हीच खरी ताकद!
कार्यक्रमाचे आयोजन शिव साफल्य संस्थेचे मुख्य प्रवर्तक डॉ. डॉमिनिक फर्नांडिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने केले.
"जनजागृती हीच खरी आग विझवण्याची पहिली पायरी आहे!" हे त्यांचे विचार उपस्थित नागरिकांना प्रेरणा देऊन गेले.

जैन मंदिर प्रकरण: घाडगे हटले... पण खरा निर्णय घेणारा मास्टरमाईंड कोण? राजकीय पक्ष की आणखी कोण?

श्रद्धेवर बुलडोझर! विले पार्लेतील ९० वर्षे जुने जैन मंदिर तोडले, समाजात संताप… BMC अधिकारी नवनाथ घाडगे यांची तडकाफडकी बदली!

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबई | १९ एप्रिल २०२५
मुंबईतील विले पार्ले पूर्व येथील प्रसिद्ध दिगंबर जैन चैतालयावर बीएमसीच्या के/ईस्ट विभागाने अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली केलेली कारवाई सध्या संपूर्ण शहरात संतापाचा विषय ठरली आहे. ९० वर्षांहून अधिक प्राचीन असलेले हे मंदिर कोणतीही पूर्वसूचना न देता तोडण्यात आले, आणि या घटनेने जैन समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

कारवाईचा धक्का – आणि तत्काळ परिणाम
१६ एप्रिल रोजी पहाटे बीएमसीचे अधिकारी मोठ्या पोलिस बंदोबस्तासह मंदिरात दाखल झाले. मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश करत पूजासामग्री, धार्मिक मूर्ती आणि ग्रंथांची नासधूस करण्यात आली, असा आरोप विश्वस्तांनी केला आहे. या कारवाईने केवळ एक धार्मिक स्थळ नव्हे तर एक ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त केला.

घाडगे यांची तडकाफडकी बदली
संपूर्ण घटनेमुळे बीएमसीच्या के/ईस्ट विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनाथ घाडगे वादाच्या भोवऱ्यात आले.
संतप्त समाजाच्या निदर्शनानंतर मुंबई महापालिकेने तत्काळ निर्णय घेत, घाडगे यांची बदली केली असून सध्या त्यांची जबाबदारी इतर विभागाकडे सोपवण्यात आली आहे.

हा निर्णय जाहीर होताच, आंदोलन करीत असलेल्या नागरिकांनी व जैन समाजाने काहीसा दिलासा व्यक्त केला, परंतु समाजाचा रोष अद्याप शांत झालेला नाही. "फक्त बदली नाही, कारवाई हवी!" अशी मागणी अजूनही होत आहे.

जैन समाजाचा सवाल – श्रद्धा अनधिकृत असते का?
मंदिर प्रशासनाने आधीच नियमनासाठी अर्ज केले होते, न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती, तरीही कारवाई करण्यात आली. ८ एप्रिल रोजी कोर्टाने उच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळ दिला होता, हे समजूनही BMC ने अचानक कारवाई केली.

मोठ्या प्रमाणात निषेध, पाठिंबा आणि राजकीय हालचाली
या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाने आणि इतर धार्मिक संघटनांनी मोर्चे, निदर्शने केली.
"श्रद्धास्थळावर कारवाई हे केवळ बेकायदेशीर नव्हे तर अमानुष देखील आहे," असे मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

शेवटचा सवाल:
"आज मंदिर… उद्या कोण?"
धर्मस्थळे अनधिकृत असू शकतात का? की नियोजनशून्य प्रशासनच जबाबदार आहे?

क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पवन भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना 'शिवछत्रपती पुरस्कार'..

प्रतिनिधी : अवधुत सावंत

डोंबिवली : क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला 'द्रोणाचार्य पुरस्कार' आणि 'शिवछत्रपती पुरस्कार' हे माझ्या डोंबिवलीकर असलेल्या भोईर जिमखान्याचे संस्थापक पवन भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले, त्यामुळे तो माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान आहे. डोंबिवली शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी पवन भोईर यांच्या घरी जाऊन 'द्रोणाचार्य पुरस्कारा'ने त्यांना सन्मानित केले जाणार असल्याने त्यांचा आणि डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा 'शिवछत्रपती पुरस्कार' जाहीर झाला याबद्दल या दोन्ही युवा खेळाडूंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने यथोचित सन्मान केला.
त्यावेळी माध्यमांना चव्हाण यांनी सांगितले की, "हा सन्मान मिळाला याचा मला या शहराचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे. भोईर जिमखाना जेव्हा सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे. आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्व. सुरेंद्र वाजपेयी सरांची आज आठवण येते, त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आला की, खूप आनंद वाटायचा. त्यांनी समाजामधून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न बघितले होते. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे, याचाही मला मनस्वी आनंद आहे."
डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलीन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा 'शिवछत्रपती पुरस्कार' जाहीर झाला आहे, तसेच त्यांचे गुरू पवन भोईर यांना 'द्रोणाचार्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. पुण्यात १८ एप्रिल रोजी म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून माननीय राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे. भोईर, पाखले यांच्या कुटुंबीयांनी देखील हा अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत, त्या सगळ्यांचे चव्हाणांनी मनापासून अभिनंदन केले. 'माझे डोंबिवलीकर माझा अभिमान' असल्याचे चव्हाण यांनी यावेळी पुन्हा सांगितले. तसेच त्या सर्व खेळाडूंना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

डोंबिवलीतील नांदिवलीत विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये बेकायदा इमारतीची उभारणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली :  उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डोंंबिवलीतील ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील इमारती तोडण्याचे नियोजन कल्याण-डोंबिवली पालिका, पोलीसांकडून सुरू आहे. या बेकायदा इमारतींवर न्यायालयाची टांगती तलवार असताना डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथे आर.के. बाझार दुकान, सर्वोदय ऑर्चिड इमारतीच्या पाठीमागील बाजूस भूमाफियांनी पालीकेच्या विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये घाईघाईने एक बेकायदा इमारत उभारणीचे काम पूर्ण केले आहे. या बेकायदा इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून एकाचवेळी बांधकाम आणि त्याचवेळी त्या इमारतीला सफेद रंग लावून ही इमारत जुनी आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न भूमाफियांकडून केला जात आहे.

६५ इमारती तोडण्याचे नियोजन सुरू असताना भूमाफियांचे पालिकेला आव्हान

डोंबिवली पूर्वेतील स्वामी समर्थ मठ भागातील आर.के.बाजार दुकानाच्या पाठीमागील भागातील रस्त्यावर, सर्वोदय ऑर्चिड गृहसंकुलाच्या लगत मागील भागात ही बेकायदा इमारत पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. या भागातून पालिकेचा विकास आराखड्यातील १८ मीटरचा रस्ता जातो. या रस्त्यामध्येच ही बेकायदा इमारत भूमाफियांकडून उभारली जात आहे. डोंबिवलीतील बेकायदा इमारती तोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पालिका, पोलीस आणि या इमारतींमधील रहिवासी हादरून गेले आहेत. अशा परिस्थितीत न्यायालय, पालिका या यंत्रणांना आव्हान देत असल्याने परिसरातील रहिवासी हैराण आहेत. या भूमाफियांना पालिका प्रशासनाचा धाक राहिला आहे की नाही, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. ही बेकायदा इमारत अधिकृत आहे असे घर खरेदीदारांना दाखवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका विक्री करण्याची प्रक्रिया भूमाफियांनी सुरू केली असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. या आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीत घर खरेदीदारांची फसवणूक होण्यापूर्वीच पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी या गंभीर प्रकरणात लक्ष घालावे आणि इमारत तात्काळ भुईसपाट होईल यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिक आणि तक्रारदारांकडून केली जात आहे

नांदिवली पंचानंद हा डोंबिवली शहरातील नागरीकरण होत असलेला महत्वाचा भाग आहे. या भागात आखीव रस्ते, बगिचे, उद्याने, मैदानांसाठीचे राखीव भूखंड भूमाफियांनी यापूर्वीच बेकायदा इमारती बांधून हडप केले आहेत. सर्वोदय ऑर्चिड इमारतीच्या पाठीमागील बाजुला आठ वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या आठ बेकायदा इमारती रखडलेल्या अवस्थेत आहेत. सर्वोदय ऑर्चिड ला पण त्यावेळच्या जिल्हाधिकारी यांनी सील ठोकले होते अशी कुजबुज ऐकू येत आहे.


नांदिवली पंचानंद भागात सर्वाधिक बेकायदा इमारती उभारणारा भूमाफिया रस्ते मार्गात बेकायदा इमारत उभारत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. डोंबिवली नांदिवली पंचानंद भागात अलीकडे एकाही नवीन बांधकामाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित इमारत बेकायदा आहे. या इमारतीची सर्वेयरमार्फत पाहणी करून कारवाईच्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या जातील असे नगररचना विभागाचे उपअभियंता देविदास जाधव म्हणाले. तसेच 'ई' प्रभाग हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम सुरू नाही. तरीही असे काही बांधकाम सुरू असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन त्यावर विहित प्रक्रिया पार पाडून त्या बेकायदा इमारतीवर तात्काळ कारवाई केली जाईल असे 'ई' प्रभाग सहाय्यक आयुक्त, तुषार सोनावणे यांनी बोलून दाखवले.

विद्यार्थ्यांच्या मनात थरांच्या उंचीइतकी प्रेरणा...! जय जवान गोविंदा पथकाचं भांडुपमधील थरारक सादरीकरण


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी वर्तमानपत्र)

नुकतेच भांडुप (प.) येथील यशवंत चांदजी सावंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उत्कर्ष नगर येथे एक आगळं-वेगळं दृश्य पाहायला मिळालं. परंपरेचा वारसा आणि नव्या पिढीला दिली जाणारी ऊर्जा यांचा अनोखा संगम विद्यार्थ्यांनी अनुभवला – कारण जय जवान गोविंदा पथकाला शाळेकडून थरांचे प्रात्यक्षिक व कार्यशाळा सादर करण्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं.

या वेळी विद्यार्थ्यांनी गोविंदांच्या सादरीकरणाकडे केवळ पाहिलं नाही, तर त्या प्रत्येक थरात त्यांनी प्रेरणाही शोधली. प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिस्तबद्ध आणि जीव ओतून सादर केलेलं प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर ठसलं. त्यांच्या डोळ्यांतील चमक, विचारलेले प्रश्न, आणि प्रत्येक क्षणाचं कौतुक – हे दृश्य वर्णन करण्याइतपत शब्द अपुरे पडतात.

दहीहंडी केवळ सण नाही तर तो आता संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास शिकवणारा एक प्रकारचा साहसी खेळ बनला आहे, हे या उपक्रमाने अधोरेखित केलं. या विशेष कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक राजू तु. गडहिरे आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षकवर्गाचे मनःपूर्वक आभार मानले गेले.


जोगेश्वरीत मनपा शाळेसमोरचा ‘मौत का चेंबर’ – पाय अडकून नागरिक जखमी, स्थानिकांनी जीव वाचवला!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी वर्तमानपत्र)

जोगेश्वरी (पूर्व) प्रभाग क्र. ७३ मधील गांधीनगर येथील मनपा शाळेसमोरील रस्त्यावरील तुटलेला चेंबर सध्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. आज (18 एप्रिल) सकाळी 11 वाजता या धोकादायक चेंबरमध्ये एका नागरिकाचा पाय अडकला.


हा चेंबर शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच असून, दररोज शेकडो मुले-पालक या मार्गाने जातात. ही घटना घडल्यानंतर आजूबाजूचे स्थानिक नागरिक मदतीला धावले. तात्काळ परिस्थिती पाहता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेनेचे उपसचिव अमित पेडणेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत त्वरीत मदतीसाठी मार्गदर्शन केले.

स्थानिक रहिवाशांनी एका वेल्डिंग करणाऱ्याच्या मदतीने चेंबरवरची धातूची जाळी कापून त्या नागरिकाचा पाय बाहेर काढला. हे दृश्य इतके भयावह होते की आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

घटनेनंतर रहिवाशांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. मात्र, प्रशासनाने यापूर्वी वारंवार तक्रारी असूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांचं म्हणणं आहे की, “हा चेंबर जर लवकरात लवकर दुरुस्त झाला नाही, तर पुढे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊ शकते. यासाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलावी.”


डोक्यावर हंडे, तोंडात घोषणा! महापालिकेवर शिवसेनेचा पाण्यासाठी एल्गार!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबईत ‘पाणीबाणी’चा स्फोट! शिवसेनेचा हंडा मोर्चा प्रशासनाच्या विरोधात दणक्यात उतरला

‘मुंबईकरांना पाणी द्या; नाहीतर खुर्ची खाली करा!’ या घोषणा देत शिवसैनिकांचा हंडा मोर्चा के पूर्व कार्यालयावर धडकला.

मुंबई | १७ एप्रिल २०२५ — जोगेश्वरी आणि अंधेरीतील नागरिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या आणि दूषित पाण्याचा प्रश्न आता रस्त्यावर आलाय! ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ पक्षाच्या वतीने गुरुवारी दुपारी ३ वाजता मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयावर भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अनंत (बाळा) नर यांनी केले. महिलांनी डोक्यावर हंडे घेत, "पाणी हवंय... आश्वासनं नाहीत!" अशा घोषणा देत प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.
मोर्चामध्ये शिवसेनेचे नेते अनिल परब, वरुण सरदेसाई, महिला संघटिका शालिनी सावंत, अंधेरी संघटक प्रमोद सावंत, जोगेश्वरी प्रमुख विश्वनाथ सावंत, तसेच जितेंद्र वळवी, अशोक मिश्रा, सुगंधा शेट्ये, प्रकाश भोसले, संजय सावंत यांसह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले.

मागणी एकच — शुद्ध आणि नियमित पाणी द्या!
गेल्या महिन्यापासून कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे जोगेश्वरी-अंधेरीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या वतीने हे तीव्र आंदोलन करण्यात आले.

मोर्चा नव्हे, हे लोकशक्तीचं उग्र रूप होतं!
प्रशासनानं आता तरी जागं व्हावं, नाहीतर खुर्ची सोडण्याची तयारी ठेवावी, असा इशारा या मोर्चातून देण्यात आला आहे.

#पाणीहक्कासाठीहंडामोर्चा #शिवसेनाचाआंदोलन #जोगेश्वरीचीहाक

हवे असल्यास याच बातमीचं सोशल मीडिया पोस्ट/व्हिडीओ स्क्रिप्टही बनवू शकतो.


जिथं श्रद्धा असते तिथं अपवित्रता नकोच – श्यामनगरच्या विसर्जन तलावात ड्रेनेजचं पाणी? भाविकांमध्ये खळबळ!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबई: जोगेश्वरी पूर्व विभागातील गणेश भक्तांसाठी भावनिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव, श्यामनगर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या नैसर्गिक विसर्जन तलावात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार, स्थानिक नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी व्यक्त केला असून, यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

या तलावाला अनेक दशकांचा इतिहास असून, गणपती विसर्जनासाठी हा तलाव स्थानिकांसाठी एकमेव पर्याय आहे. प्रत्येक वर्षी हजारो गणेशभक्त इथे श्रद्धेने आपले बाप्पा विसर्जन करतात. मात्र सध्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे तलावाचे पावित्र्य आणि पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे.

या मुद्द्यावर नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर महानगरपालिकेने तात्काळ दखल घेतली. तलावाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे, या पाहणीनंतर स्थानिक आमदार श्री. बाळा नर यांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस महानगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत तलावाच्या स्वच्छतेबाबत, ड्रेनेजच्या पाण्याच्या संभाव्य प्रवाहाबाबत चर्चा झाली.

यावेळी आमदार बाळा नर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "हा तलाव आमच्या संस्कृतीचा भाग आहे, येथे कोणतीही अस्वच्छता सहन केली जाणार नाही. नागरिकांच्या भावना लक्षात घेता त्वरित उपाययोजना व्हायलाच हव्यात."

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील तातडीने ड्रेनेजचे पाणी रोखण्यासाठी योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले.

गणेशभक्त आणि स्थानिक नागरिकांनी आमदार बाळा नर यांचे विशेष आभार मानले असून, पुढील विसर्जन सण सुरक्षित आणि पवित्र पद्धतीने होण्यासाठी लवकरच उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


जोगेश्वरीत घडला कुस्तीचा ऐतिहासिक दिवस! खासदार केसरी कुस्ती दंगल 2025 झाली थरारक — मैदानात झळकले देशभरातील नामवंत मल्ल


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी पूर्व येथे कालचा दिवस थेट इतिहासात नोंदवला गेला. प्रथमच येथे पारंपरिक मातीच्या आखाड्यात ‘खासदार केसरी कुस्ती दंगल 2025’ चे भव्य आयोजन झाले आणि परिसरात कुस्तीचा जयघोष झाला.

ही स्पर्धा शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकारातून, तसेच महाराष्ट्र केसरी व सहाय्यक पोलीस आयुक्त नरसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.

काय पाहायला मिळालं?

  • देशभरातील अग्रगण्य महिला आणि पुरुष मल्लांनी आपल्या ताकदीचा चमत्कार दाखवला

  • प्रत्येक कुस्ती निकाली — एकाहून एक झुंजार पैलवानांचे प्रदर्शन

  • प्रेक्षकांनी भरलेला मैदान — उत्साह आणि शिस्त यांचे अनोखे मिश्रण

  • लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत कुस्तीचा थरार अनुभवणारे नागरिक

खासदार रवींद्र वायकर यांनी दिला महत्त्वपूर्ण संदेश:

“जोगेश्वरी पूर्वसारख्या ठिकाणी ही स्पर्धा घेऊन आलो याचा मला अभिमान आहे. मुलांनी खेळाकडे वळावं, व्यसनमुक्त आयुष्य जगावं, आणि त्यांच्यात संस्कार रुजावेत, हाच या कुस्ती दंगलमागचा हेतू होता. ही सुरुवात आहे — आता हे स्पर्धेचं वार्षिक पर्व होईल.”

नरसिंह यादव यांचा संदेश:

“केवळ महाराष्ट्र केसरी म्हणून नव्हे, तर एक पोलिस अधिकारी म्हणून माझं ध्येय आहे तरुण पिढीला योग्य दिशा देणं. कुस्तीसारखा खेळ त्यांना शिस्त, ताकद आणि संयम शिकवतो.”

या स्पर्धेचा खरा परिणाम काय?

  • मुलांना स्क्रीनपासून मैदानाकडे वळवणं

  • शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर भर

  • एक सामाजिक चळवळ — खेळातून संस्कार



पैशांअभावी उपचार नाकारले, जीव धोक्यात! – 'न्याय रणभूमी' व इतर माध्यमांच्या बातमीची दखल; खासदार रविंद्र वायकर यांची थेट हॉस्पिटलला भेट


संदिप कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबई: अंधेरी पूर्वेतील नामांकित होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये हृदयविकारग्रस्त ५२ वर्षीय अमृतलाल सोनी यांना डिपॉझिट नसल्यामुळे उपचार नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना 'न्याय रणभूमी' व इतर माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. त्रासात असलेल्या रुग्णाला जवळपास दीड तास हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थ अवस्थेत बसवून ठेवण्यात आले. अखेर नातेवाईकांनी त्यांना महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल केलं, जेथे सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, होली स्पिरिटसारख्या धर्मादाय हॉस्पिटलकडूनही गोरगरीब रुग्णासाठी राखीव असलेल्या सुविधांचा लाभ नाकारण्यात आला. रुग्णाच्या नातेवाईकांनी २५ हजार रुपयांचे डिपॉझिट देण्याची तयारी दर्शवली होती, तरीही हॉस्पिटल प्रशासनाने ताठर भूमिका घेतली. धर्मादाय रुग्णालय असूनही अशा प्रकारची अमानुष वागणूक मिळाल्याने जनतेमध्ये तीव्र संताप आहे.


या घटनेनंतर नागरिकांच्या तक्रारी आणि 'न्याय रणभूमी' व इतर माध्यमांच्या बातमीची दखल घेत खासदार रविंद्र वायकर यांनी होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये अचानक भेट दिली. हॉस्पिटल प्रशासनाची कानउघाडणी करत त्यांनी रुग्णांबरोबर यापुढे सुसंवाद आणि सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी, अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिला. धर्मादाय हॉस्पिटल म्हणून गोरगरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य, राखीव सुविधा आणि तातडीची मदत मिळावी, यासाठी रचनात्मक बदल करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.


या बैठकीस मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र खंदाडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी, कार्यकारी संचालक सिस्टर लीसी, उपसंचालक सिस्टर फेलसी, मेडिकल डायरेक्टर डॉ. सुसंन तसेच माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, सदानंद परब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, विधानसभा संघटक संतोष गिरी, शाखा प्रमुख भालचंद्र जोशी, प्रकाश शिंदे, उपेश सावंत, अंशिका जाधव आणि भाई मिर्लेकर उपस्थित होते.

या प्रकारानंतर नागरिकांमधून अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, "या पुढेही पालिकेने आणि लोकप्रतिनिधींनी तत्काळ, ठोस पावले उचलावीत"


फक्त २४ तासांत चमत्कार! भारत २४ तासच्या बातमीनंतर जोगेश्वरी स्टेशन फेरीवाल्यांपासून मुक्त!


संदिप कसालकर, संपादक (न्याय रणभूमी)

जेव्हा पत्रकारितेला लोकशक्तीची साथ मिळते, तेव्हा बदल घडतो! भारत २४ तासची बातमी, आणि महापालिकेची कारवाई – जोगेश्वरीकर म्हणतात, 'आता खरंच काहीतरी बदलतेय!

बातमीचा सविस्तर तपशील:
जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्थानकाजवळील परिसर 'ना फेरीवाला झोन' असतानाही, मागील अनेक महिन्यांपासून इथे शेकडो फेरीवाल्यांचं अतिक्रमण वाढलेलं होतं. हातगाड्या, फळभाज्या, कपडे अशा अनेक वस्तूंच्या विक्रीमुळे प्रवाशांना दररोज अडथळ्यांना तोंड द्यावं लागत होतं.
या परिसरात वाहतूक विस्कळीत होत होती, स्टेशनच्या लिफ्ट व मार्गांवर अडथळे निर्माण होत होते, आणि अपघाताच्या घटनाही वाढत होत्या. काही प्रवासी संघटनांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या, पण ठोस कारवाई होत नव्हती.
भारत २४ तासचा इम्पॅक्ट:
भारत २४ तासवर प्रकाशित झालेल्या वृत्तात हे सर्व वास्तव व प्रत्यक्ष चित्रफीत समोर मांडण्यात आलं. बातमी प्रसारित होताच, के-पूर्व महापालिका विभागाने तात्काळ दखल घेतली.
- महापालिका कर्मचाऱ्यांनी विशेष पथकासह फेरीवाले हटवले
- अतिक्रमित रस्त्यांची साफसफाई करण्यात आली
- परिसरात नियमित देखरेखीचा निर्णय घेण्यात आला

प्रशासनाचे पाऊल स्वागतार्ह!
नागरिकांनी प्रशासनाच्या या तत्परतेचं अभिनंदन केलं असून, अशाच प्रकारे लोकांच्या अडचणींवर लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढाकार
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्षाचे उपविभाग संघटक सुशांत हर्याण यांनीही काही दिवसांपूर्वी या गंभीर परिस्थितीविरोधात अधिकृत पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यावेळी संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.
याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उत्तम सर्वोदय या अधिकाऱ्यांना भेटून अश्या कारवाई वारंवार झाल्या पाहिजेत असे निवेदन देणार असल्याचे हरयाण यांनी सांगितले आहे.


एक स्थानिक नागरिक म्हणाले:
"पहिल्यांदा असं वाटतंय की आपली तक्रार कुणीतरी ऐकली! भारत २४ तासचे आभार, आणि महापालिकेचेही!"
या पुढेही महापालिका अशीच कारवाई करेल, जेणेकरून स्थानिकांना त्रास होणार नाही – अशी अपेक्षा आता जोगेश्वरीकर व्यक्त करत आहेत!


मजबूत पत्रकारिता + जागृत नागरिक + जबाबदार प्रशासन = सकारात्मक बदल!
भारतातील मीडिया कधी प्रभावी ठरतो, हे या घटनेतून स्पष्ट होतं. अशाच बातम्यांसाठी आणि लोकशाहीला बळ देण्यासाठी पाहत राहा – भारत २४ तास!








एक शिक्षक, एक व्हिडीओ आणि दोन पुरस्कार! रोम्युला यांनी सेंट अर्नोल्ड शाळेचं नाव केलं उज्वल!


संदिप कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबई | ११ एप्रिल २०२५ – शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनात उजळवलेली प्रेरणेची ठिणगी! आणि हीच ठिणगी तेवत ठेवणाऱ्या शिक्षकांमध्ये सेंट अर्नोल्ड हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या रोम्युला फिलिप पिंटोयांचे नाव आता गौरवाने घेतले जाते. 

शैक्षणिक विभाग आयोजित "Quality Educational Video Competition" मध्ये त्यांच्या नावीन्यपूर्ण व्हिडीओने परीक्षकांची मने जिंकली आणि त्यांना तालुका स्तरावर प्रथम क्रमांक तर जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळवून दिला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना ११ एप्रिल रोजी, भायखळा येथील पेन्ग्विन ऑडिटोरियममध्ये मोठ्या सन्मानाने ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या समारंभात मुंबईभरातील २१८ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला होता, मात्र रोम्युला यांचा पराक्रम विशेष ठरला. पश्चिम उपनगर अधीक्षक दीपिका पाटील यांच्या हस्ते झालेला हा सन्मान, केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण शाळेसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे:

* टिटवाळा स्टेशन: २५ कोटी रुपये

* शहाड स्टेशन: ८. ४ कोटी रुपये

* दिवा स्टेशन: ४५ कोटी रुपये

* बेलापूर स्टेशन: ३२ कोटी रुपये

याव्यतिरिक्त, कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली स्टेशनचा देखील या योजनेत समावेश आहे. या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

"१ लाख नसेल तर मरण पत्करा!" — मुंबईतील होली स्पिरिट हॉस्पिटलचा अमानुष निर्णय

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी साप्ताहिक)

"पैशांअभावी उपचार नाकारले, जीव धोक्यात!" — होली स्पिरिट हॉस्पिटलवर गंभीर आरोप, हृदयविकारग्रस्त रुग्णाला प्रवेश नाकारल्याचा प्रकार

जोगेश्वरी/अंधेरी: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच, मुंबईतही पैशांअभावी उपचार नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पूर्वेतील नामांकित होली स्पिरिट हॉस्पिटलने हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला डिपॉझिट न दिल्यामुळे ऍडमिट करून घेण्यास नकार दिला. तब्बल दीड तास रुग्ण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थ अवस्थेत बसून राहिला आणि अखेर महापालिकेच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

जिवंत असतानाही हॉस्पिटलने पाठ फिरवली!
जोगेश्वरी पूर्वेतील दुर्गानगरमधील ५२ वर्षीय अमृतलाल सोनी यांना मंगळवारी रात्री अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने होली स्पिरिटमध्ये नेण्यात आले. मात्र हॉस्पिटलने तत्काळ १ लाख रुपयांचे डिपॉझिट भरण्याची अट घालून रुग्णाला ऍडमिट करण्यास स्पष्ट नकार दिला.

धर्मादाय हॉस्पिटलची अमानुष वागणूक!
होली स्पिरिट हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत असूनही निर्धन व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या बेड्सचा लाभ रुग्णाला मिळाला नाही. २५ हजार रुपये देण्याची विनंती केली असतानाही रुग्णालयाने हट्टाने नकार दिला, हे विशेष!

राजकीय हस्तक्षेप, तरीही उत्तर नाही!
अखेर नातेवाईकांनी सोनी यांना मध्यरात्री कूपर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच मनसेच्या जोगेश्वरी विभागाने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. मात्र कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे मनसेचे सचिव नितीन गावडे यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी धर्मादाय आयुक्त व आरोग्यमंत्री यांना पत्रव्यवहार करण्याची घोषणा केली आहे.

एक प्रश्न अनुत्तरित — धर्मादाय संस्थांचे ध्येय फक्त पैसा कमवणेच आहे का?
या प्रकारानंतर होली स्पिरिट हॉस्पिटलच्या प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. आता बघावे लागेल की प्रशासन जबाबदारी स्वीकारते की या प्रकरणातही एखाद्या जीवाच्या किंमतीवर गप्प राहते!

ह्या अमानुषतेला जबाबदार कोण?
रुग्णाच्या जीवावर बेतणाऱ्या 'पेहले पैसे, फिर उपचार' या मानसिकतेविरोधात आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.


प्रशासनाचा चांगल्या अनुभवाचा उपयोग कल्याण-डोंबिवली पालिकेत होईल - आयुक्त अभिनव गोयल

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : आरोग्य  व शिक्षण, विभागाची माला आवड असल्याने या विभागात विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे मत नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना हिंगोली जिल्हा अधिकारी पदी चांगले काम केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पदी केल्याचे समाधान नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केले.

माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासन लोकाभिमुख व्हावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याची मोहीम राबविण्यात येत असून, त्या धरतीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात येणार असल्याचे मत महा पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी मांडले.

कल्याण डोंबिवली या शहरी भागात आपल्या क्षेत्राचे आव्हाने, त्याचे भविष्यातील नियोजन , आणि आपल्याकडे काय काय समस्या आहे, काय काय प्रश्न आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या विकास कामांचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांना गती देण्याची आपल्याला गरज आहे, त्याच्यावर एकदा सविस्तर चर्चा करून आपल्याला त्या कामावर भर देण्यात येईल. कल्याण-डोंबिवली महापालिके च्या अनधिकृत ६४ बिल्डिंगचा प्रश्न न्याय प्रविष्ट असल्याने  आपल्याला योग्य वेळेची वाट पाहावी लागणार असल्याचे मत आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले, फूट पथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

रामनवमीला शिवसेनेचा ‘पॉवर शो’ – शाखा क्र. ७७ चं भव्य उद्घाटन!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

रामनवमीच्या दिवशी शिवसेनेचं संघटनबळ झळकलं! जोगेश्वरी पूर्वमध्ये शाखा क्रमांक ७७ चे कार्यालय उद्घाटन

जोगेश्वरी, ६ एप्रिल २०२५ — रामनवमीच्या दिवशी जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्रमांक ७७ च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेतृत्त्वाखाली खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा आणि शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.

प्रभाग क्रमांक ७७ हा जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रभाग मानला जातो. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या भागात खासदार रविंद्र वायकर यांचे सक्रिय कार्य सुरू आहे. उद्घाटनप्रसंगी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना कार्यालयाचा वापर जनतेच्या सेवेसाठी आणि संपर्कासाठी करावा, असे आवाहन केले.

शाखाप्रमुख प्रकाश (बंड्या) शिंदे यांनी यावेळी सांगितले की, “शिवसेना पक्षाचे विचार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आणि खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे. विधानसभेत मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.”

विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत यांनी आगामी महापालिका निवडणुकीत आठही प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांबाबत सुरू असलेल्या अपप्रचाराला उत्तर देत ते म्हणाले की, "विकास कामांबाबत कोणताही गैरसमज पसरवला जाणार नाही, आणि सत्य जनतेपुढे मांडले जाईल."

कार्यक्रमास विधानसभा मार्गदर्शक मनीषा वायकर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख रचना सावंत, महिला विभाग प्रमुख प्रियांका आंबोळकर, तसेच शाखा संघटिका, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवासेना, व्यापारी आघाडी व इतर अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनाचा हा सोहळा रामनवमीच्या दिवशी पार पडत असल्याने परिसरात एक उत्साही वातावरण निर्माण झाले होते. नव्याने सुरु झालेलं हे कार्यालय शिवसैनिकांसाठी नवे केंद्रबिंदू ठरणार आहे.


'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'रामनवमी' सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्ष नवमी तिथी म्हणजेच रामनवमी, रामजन्म. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील रामजन्म सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागपूर येथील उच्च शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक श्री. परशुरामजी भांगे, सौ. पुष्पा भांगे, संस्थेच्या खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्वप्रथम विद्यार्थिनी इव्हा शॉ व रोमी शॉ या भगिनींनी राम स्तुती वर आधारीत 'ठुमक चलत रामचंद्र..' हे नृत्य सादर केले. इयत्ता पाचवी मधील अवंत या विद्यार्थ्याने श्रीरामाची गोष्ट सांगून माहिती दिली. इयत्ता चौथी मधील समायरा, जाई, आणि रूही या विद्यार्थिनींनी आपल्या शास्त्रीय नृत्यातून संपूर्ण रामायण सादर केले तर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. सर्व मुले राम लक्ष्मण सीता, हनुमान, तसेच रामायण मधील इतर पात्र बनून आले होते. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गीत रामायण मधील 'नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू..'  हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गणित विषयाच्या शिक्षिका सौ. सुरुची पंड्या यांनी राम चरित मानस मधील पद गाऊन सर्वांना आनंद दिला. तर दुपारच्या सत्रात नाट्य विभागाचे शिक्षक नितेश मेस्त्री यांनी  'आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.. हे गीत सादर करून सर्वांच्या डोळ्यासमोर अयोध्येचे चित्र उभे केले.
पुत्र असावा तर रामासारखा, पती असावा तर रामासारखा, भाऊ असावा तर रामासारखा. श्रीरामा सारखा संयम, शत्रूलाही सुहास्य वदनाने नमविता आले पाहिजे अशा मर्यादा पुरुषोत्तमाचे गुण सर्वांमध्ये असले पाहिजेत, असे प्रमुख पाहुणे श्री. परशुरामजी भांगे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा देताना सांगितले. तर चार युगांची माहिती देत कलियुगामध्ये देव आणि दानव हे कसे मानवाच्या अंतर्गत आहेत आणि त्या अंतर्मनावर मात करण्यासाठी श्रीरामाचे अंतर बाह्य अवलोकन करणे गरजेचे आहे असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी मुलांना सांगून श्रीरामसारखे निस्वार्थी प्रेम करा असेही सांगितले व शुभेच्छा दिल्या.
     
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे सध्या शैक्षणिक चर्चासत्रासाठी माउंट अबू येथे वास्तव्यास आहेत, तेथूनच त्यांनी दूरचित्र संभाषण द्वारे (व्हिडिओ कॉल) सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. रामासारखे चरित्र, निस्सिम बंधूप्रेम, आज्ञाधारक, प्रसंगी शत्रूलाही लढा देऊन क्षमा करणारा केवळ श्रीराम आहे, अशा श्रीरामसारखे कर्तुत्ववान व्हा असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे व डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले व सर्वांना पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. 
      
आजच्या दिवशी मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये जणु काही अयोध्या सजली होती. श्री. नरेश पिसाट, अवधूत देसाई सर यांनी सर्व ठिकाणी भगवे पताके, फुलांच्या माळा, रांगोळ्या यांची भव्य दिव्य सजावट केली होती. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाल्यावर पाहुण्यांच्या हस्ते पाळण्या मध्ये श्रीरामाची मूर्ती ठेऊन, संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी 'राम जन्मला ग सखी..' हा पाळणा गाऊन राम जन्म सोहळा संपन्न झाला. तसेच रामाची आरती करण्यात आली. त्याच बरोबर चैत्र महिना म्हणजे चैत्र देवीचे नवरात्र, तुळजा भवानी देवीची पूजा करून आरती करण्यात आली. कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, दीपा तांबे , रमेश वागे, सौ.मयुरी खोब्रागडे सौ. श्रेया कुलकर्णी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाची उत्तम तयारी करून राम जन्म सोहळा संपन्न केला.

खडकपाडा पोलीस ठाणे हद्‌दीतील अटाळी परिसरातील वृद्ध महिलेच्या खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : दिनांक २०/०३/२०२५ रोजी श्रीमती रंजना चंद्रकात पाटेकर (वय: ६० वर्षे), राहणार. सिद्धीविनायक चाळ, खापरीपाडा, अटाळी, आंबिवली कल्याण (पश्चिम) यांचा राहते घरी अज्ञात मारेकरी याने जबरी चोरी करून श्रीमती रंजना पाटेकर या वृध्द महिलेचा खुन केल्याबाबत वृद्ध महिलेचा भाचा श्री. हर्षल प्रेमाचंद पाटकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पो.स्टे. गु.रजि.नं. २५३/२०२५ भारतीय न्याय संहीता १०३(१) ३११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी बाबत काहीएक धागा दोरा नसताना तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यानी शिताफीने माहिती काढून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख, (वय; ३० वर्षे), राहणार. संतोषी माता नगर, नवनाथ कॉलनी, रूम न. १० आंविवली, कल्याण (पश्चिम) यांस मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे ताब्यात घेवुन आरोपी नामे चांद उर्फ अकबर शेख याच्याकडे शिताफीने व सखोल तपास करून सदर गुन्ह्यातील जबरी चोरी झालेला मुद्देमाल १,०५,०००/- रूपये किंमतीचा हस्तगत करून आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करून कौशल्यपूर्ण पध्द‌तीने गुन्हा उपडकीस आणलेला आहे.

गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख हा घटनास्थळाचे परिसरात राहण्यास असुन आरोपीस मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे हवे असल्याने त्याने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने मयताचे घराची काही दिवसापासून रेकी करून घटनेच्या वेळी मयत श्रीमती रंजना पाटकर ह्या घरात एकटयाच असताना आरोपी याने मयत यांच्याकडे पिण्याचे पाणी मागितले, मयत पाणी आणण्यासाठी आत गेल्या असतां आरोपी याने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून हॉलमधील टिव्हीचा आवाज वाढविला, तदनंतर मयत ह्यांनी आरडा ओरडा करू नये म्हणून हाताने तोंड दाबुन जमीनीवर आपटून, गळा दाबुन जिवे ठार मारले, त्यानंतर मयताच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र, व कानातील सोन्याची कर्नफुले असा एकुण १,०५,०००/- रूपये किंमतीचा मु‌द्देमाल जबरी चोरी केला होता.

अटक आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख यास यापुर्वी कोळशेवाडी पो स्टे. गु.रजि.नं. १२२/२०१४ भा.दं.वि.सं.कलम ३०२,२०१,४६०,३४ मध्ये आधारवाडी कारागृहात बंदी होता. आठ महिन्यापूर्वी सदर आरोपी हा कारागृहातून बाहेर येवुन मानेगांव अटाळी, कल्याण (पश्चिम) येथे राहण्यास होता. तदनंतर त्याने सदरचा गुन्हा केला असुन त्यास सदर जबरी चोरीसह खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सध्या तो खडकपाडा पोलीस ठाण्याच्या  पोलीस कोठडी मध्ये आहे.

सदर गुन्ह्यात अज्ञात मारेकरी यांचा कोणत्याही प्रकारचा धागा दोरा नसतांना खडकपाडा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोश डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३. कल्याण श्री. अतुल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री. कल्याणजी घेटे यांनी तपासकामी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संदीप शिवले नेम. खडकपाडा पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कामगिरी खडकपाडा पोलीस ठाणे तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले. सपोनि. विजय गायकवाड, अनिल गायकवाड, पोउपनिरी. अर्जुन दांडेगावकर, सेपोउपनि. सुधीर पाटील, पोहवा. राजु लोखंडे, योगेश बुधकर, कुंदन भामरे, संदीप भोईर, विनोद कामडी, किरण शिर्के, संजय चव्हाण, ज्योती देसले, पोशि. ललीत शिंदे, महेश बगाड, राहुल शिंदे, अविनाश पाटील, अनंता देसले, सुरज खंडाळे, मनोहर भोईर, धनराज तरे यांनी यशस्वीपणे केली आहे.

दोन बलात्कारी गुन्ह्यातील रिल स्टार आरोपीस नाशिक येथुन खंडणी विरोधी पथक, ठाणे यांच्याकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : मानपाडा पोलीस स्टेशन गुरजिनं ३४१/२०२५ बीएनएस कायदा कलम ६४, ७४, ११५(२), ३५१(२), ३(५) सह आर्म ऍक्ट कायदा कलम ३,२५ व  टिळकनगर पोलीस स्टेशन गुरजिनं २६७/२०२५ भादंवि कलम ३७६ (२), (एन) ५०४, ५०६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय: ५२ वर्षे), राहणार. चौधरी बिल्डिंग, २ रा माळा, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, बारा बंगला रोड, ठाकुर्ली, डोंबिवली (पुर्व) हा गुन्हे दाखल झाल्यापासुन फरार झालेला होता व सापडत नव्हता. सदर पाहीजे आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा गुप्त बातमीदारांकरवी शोध घेतला असता तो 'हॉटेल सेलीब्रेशन' जिल्हा नाशिक याठिकाणी लपुन बसला असल्याबाबत माहीती प्राप्त झाली होती.
सदर मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील यांस इंदीरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांच्या मदतीने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी 'हॉटेल सेलीब्रेशन' जिल्हा नाशिक येथुन दिनांक ०४/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०८.०० वाजता पकडून ताब्यात घेतले असुन, त्यास पुढील तपासकामी मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -२, गुन्हे शाखा, ठाणे, यांच्या  मार्गदर्शनाखाली पोनि. नरेश पवार, सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी. सुहास तावडे, सपोउपनिरी. संदीप भोसले, पोहवा. ठाकुर, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावसकर, पोना. हासे, मधाळे, चापोना. हिवरे, पोशि. वायकर, ढाकणे यांनी यशस्वीपणे केली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.०४ एप्रिल रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील ३० भूप्रमाण केंद्रांचे उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :- तहसिल कार्यालयामध्ये सुरू असलेल्या सेतु सेवा कार्यालयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील उप-अधीक्षक भूमी अभिलेख, ठाणे आणि उप-अधीक्षक भूमी अभिलेख, शहापूर या कार्यालयातील भुप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.०४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला.

या केंद्रामध्ये संगणकीकृत मिळकत पत्रिकेवरील फेरफार सर्व प्रकारचे ऑनलाईन फेरफार अर्ज, ई-मोजणी व्हर्जन २.० मधील सर्व प्रकारचे मोजणी नकाशे, मिळकतीच्या डिजिटल सही केलेले फेरफार, नोंदवही उतारे आणि ऑनलाईन अर्ज करायची सुविधा, तसेच नकाशे व स्कॅन अभिलेख याच्या डिजिटल सही केलेल्या नकला, जनतेला वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यापूर्वी भूमी अभिलेख विभागातील विविध प्रकारचे नकला मिळविण्यासाठी नक्कल अर्ज करण्यासाठी जनतेला कार्यालयात छापील अर्ज करून हेलपाटे घालावे लागत होते. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांची खाजगी संस्थेकडून आर्थिक पिळवणूक होत होती आणि सुविधा वेळेत मिळत नव्हत्या. परंतू आता भूप्रमाण केंद्राच्या माध्यामातून जनतेला सर्व सुविधा वेळेत आणि वाजवी दरात मिळाल्यामुळे प्रशासनातील विलंब कमी होऊन लोकाभिमुख प्रशासनाला हातभार लागणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण ३० भूप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले असून यामुळे भूमी अभिलेख खाते लोकाभिमुख होणार आहे.