BREAKING NEWS
latest

डोंबिवली खंबाळपाडा येथे ऑटो स्टॅन्डवर नंबरात रिक्षा लावण्याच्या किरकोळ वादातून रिक्षाचालकाची हत्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात रिक्षा स्टँडवर नंबर लावण्यावरून दोघा रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. या  किरकोळ वादातून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकावर लोखंडी रॉडने हल्ला केला. फटका जिव्हारी बसल्याने रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दिनांक.३ रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. अविनाश कांबळे असे मृत रिक्षाचालकाचे नाव असून याप्रकरणी सुनील राठोड याच्यावर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंबाळपाड्याच्या कमानीजवळ रिक्षा स्टँड आहे. या स्टँडवरून ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याणसह अन्य परिसरात रिक्षा चालतात. त्यामुळे या स्टँडवर प्रवाशांसह रिक्षाचालकांची नेहमीच वर्दळ असते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास या स्टँडवर अघटित घटना घडली. रिक्षाचा नंबर लावण्यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाला. सुनील राठोड याने रिक्षात लपवलेला लोखंडी रॉड काढून अविनाश कांबळे याच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉडच्या साह्याने अविनाशच्या डोक्यात जबरी फटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर अविनाश कांबळे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी टिळकनगर पोलीसांनी गुन्हा नोंदवून हल्लेखोर खुनी सुनील राठोड याला ताब्यात घेतले. या संदर्भात टिळकनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रिजन्सी अनंतम शेजारील वन विस्तीर्ण जागेवर १ हजार २०० वृक्षांचे वृक्षारोपण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण-शीळ रोड येथील रिजन्सी अनंतम शेजारील वन विभागाच्या असलेल्या विस्तीर्ण जागेवर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंडे यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या वृक्षारोपण मोहिमेद्वारे तब्बल १ हजार २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. ज्यामध्ये सर्व झाडे ही भारतीय प्रजातीची आहेत. यावेळी संत निरंकारी मिशनचे स्वयंसेवक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे केडीएमसीच्या नेतीवली शाळेचे अनेक विद्यार्थीही मोठ्या संख्येने या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप देखील केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीणचे महेश पाटील, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, गुलाब वझे, विश्वनाथ राणे, सागर जेधे, कविता गावंड यांच्यासह केडीएमसीचे अधीक्षक संजय जाधव, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, रोहिणी लोकरे, रीजन्सी ग्रुपचे महेश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१ ऑगस्ट पासून या नागरिकांचे सरसकट वीज बिल होणार माफ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक अतिमहत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील विविध सरकारी खाती आणि खाजगी कंपन्यांना वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्यासाठी वेगवेगळ्या तारखा असल्याने निर्माण होणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून महावितरणने एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे आता सर्व वीज कनेक्शनची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली विज बिलिंग आणि माहिती तंत्रज्ञान या विभागांनी संयुक्तपणे ही सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या नव्या व्यवस्थेमुळे ग्रामविकास, पाणीपुरवठा, पोलीस अशा विविध सरकारी खात्यांना तसेच मोठ्या खाजगी कंपन्यांना एका मोठ्या समस्येतून मुक्तता मिळणार आहे.

वेळेत बिल भरल्यास विशेष सवलती

या नव्या सुविधेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे वेळेत बिल भरल्यास ग्राहकांना विशेष सवलती मिळणार आहेत. प्रत्येक बिल वेळेत भरल्यास एक टक्का सवलत मिळणार आहे. याशिवाय, कागदी बिलाऐवजी इलेक्ट्रॉनिक बिल स्वीकारल्यास प्रत्येक बिलावर दहा रुपयांची सवलत मिळेल. तर डिजिटल पेमेंट केल्यास कमाल पाचशे रुपयांपर्यंतची सवलत मिळणार आहे. या सवलतींमुळे ग्राहकांना आर्थिक बचत करण्यास मदत होणार आहे.

ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, संबंधित सरकारी खाते किंवा कंपनी यांना त्यांच्या मुख्यालयातून राज्यातील विविध ठिकाणच्या वीज कनेक्शनसाठी आलेली बिले आणि त्यांची अंतिम मुदत याची माहिती मिळेल. यामुळे बिले भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि व्यवस्थित होईल.

समस्येचे मूळ आणि त्यावरील उपाय

राज्यातील विविध कार्यालयांची विविध वीज कनेक्शन आणि त्यांची बिले भरण्यासाठी वेगवेगळी अंतिम मुदत असल्याने अनेक समस्या निर्माण होत होत्या. आर्थिक तरतूद असूनही वेळेत बिले भरली जात नव्हती, त्यामुळे दंड आणि व्याज द्यावे लागत होते. कधीकधी बिल न भरल्याने कनेक्शनही तोडले जात होते. महावितरणच्या या नव्या सुविधेमुळे या समस्येवर मात करणे शक्य होणार आहे. आता एकाच ठिकाणाहून सर्व बिले भरता येणार असल्याने, वेळेत बिल भरण्याची शक्यता वाढणार आहे. यामुळे दंड आणि व्याज भरण्याची वेळ येणार नाही, तसेच कनेक्शन तोडण्याची समस्याही कमी होईल.

डिजिटल इंडियाच्या दिशेने एक पाऊल

ही सुविधा भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेशी सुसंगत आहे. ऑनलाईन बिल भरणे, इलेक्ट्रॉनिक बिले स्वीकारणे आणि डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे या सर्व गोष्टी डिजिटल इंडियाच्या संकल्पनेशी जुळणाऱ्या आहेत. यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता वाढण्यास मदत होईल.

पर्यावरण संरक्षणाला हातभार

इलेक्ट्रॉनिक बिलांना प्रोत्साहन दिल्याने कागदाचा वापर कमी होईल. यामुळे झाडे तोडण्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण संरक्षणाला मदत होईल. तसेच, ऑनलाईन बिल भरण्यामुळे ग्राहकांना कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही, ज्यामुळे वाहनांचा वापर कमी होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. या सुविधेमुळे भविष्यात अनेक फायदे होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, सरकारी खात्यांना आणि कंपन्यांना त्यांच्या वीज वापराचे विश्लेषण करणे सोपे होईल. यामुळे ते अधिक कार्यक्षम पद्धतीने वीज वापर करू शकतील. तसेच, महावितरणलाही वीज पुरवठ्याचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल.

या नव्या सुविधेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी ग्राहक महावितरणच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधू शकतात. तेथे त्यांना या सुविधेची सविस्तर माहिती, ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया आणि इतर संबंधित मार्गदर्शन मिळू शकेल. महावितरणची ही नवी सुविधा राज्यातील नागरिकांसाठी, विशेषतः सरकारी खाती आणि मोठ्या कंपन्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. यामुळे वीज बिले भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार असून, वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.

राज्य सरकार च्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयात तळोजा, रत्नागिरीसह ७ प्रकल्पांना हिरवा कंदील..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : राज्य सरकार कडून राज्यातील सात मोठ्या प्रकल्पांना मंगळवारी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तळोजासह रत्नागिरी येथील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

कोणते प्रकल्प व किती रोजगार ?

तळोजा (नवी मुंबई) आणि पुणे येथे 'आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी' मार्फत सेमी कंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प. महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमी कंडक्टर निर्मिती करणारा प्रकल्प. या प्रकल्पात प्रथम टप्प्यात १२ हजार कोटींची गुंतवणूक. ४,००० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती. दुसऱ्या टप्प्यामध्ये एवढीच गुंतवणूक. म्हापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्त्वावर सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होईल.

रत्नागिरी येथे 'हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजेस' मार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मितीचा विशाल प्रकल्प. १,५०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

नागपूर भागात 'जेएसडब्ल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन लि.' यांचा लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प असून त्यात २५ हजार कोटींची गुंतवणूक आणि ५,००० रोजगार निर्मिती होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे 'जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लि.' कंपनीचा इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा पहिलाच अतिविशाल प्रकल्प. या प्रकल्पात एकूण २७ हजार २०० कोटी रुपये गुंतवणूक. ५,२०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती. या प्रकल्पात वार्षिक ५ लाख इलेक्ट्रिक प्रवासी कार व १ लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे.

बुटीबोरी, नागपूर आणि पनवेल येथील भोकरपाडा एमआयडीसी परिसरात 'आवाडा इलेक्ट्रो कंपनी' चा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प येणार असून कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राज्यात स्थापित होणार आहे. बुटीबोरी, नागपूर येथे 'परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा. लिमिटेड' मार्फत मद्यार्क निर्मितीचा विशाल प्रकल्प. प्रकल्पात १,७८५ कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले.

भुयारी गटारात राहून घरफोडी करून त्यानंतर विमानाने गावी पळून जाणाऱ्या अट्टल गुन्हेगारास ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : भुयारी गटारात राहून  घरफोडी करून त्यानंतर विमानाने गावी पळून जाणाऱ्या ठाण्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकास यश आले आहे. मुंबईतील सांताक्रूझ भागातील एका भुयारी गटारामध्ये काही दिवस वास्तव्य करायचे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील बंद घराची रेकी करून घरफोडी करायची आणि चोरलेल्या पैशांतून विमानाने पुन्हा त्रिपूरा येथील गावी निघून जायचे अशा कार्यपद्धतीने पोलीसांना जेरीस आणलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. राजु मोहम्मद शेख (वय: ४१ वर्षे) असे अटकेत असलेल्या अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपीचे नाव असून ठाणे खंडणी विरोधी पथक पोलीसांनी त्याच्याकडून १ लाख १३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला यापूर्वी मुंबई पोलीस आणि गुजरात पोलीसांनी देखील अटक केली होती.

श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घरफोडीच्या प्रकरणात सहभागी असलेला चोरटा वागळे इस्टेट येथे दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, साहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, उपनिरीक्षक तुषार माने यांच्या पथकाने सापळा रचून घरफोड्या राजु शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, पोलीसांना त्याच्याकडे १ लाख १३ हजार १०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आढळून आली. याप्रकरणी पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने श्रीनगर आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सात घरफोड्या केल्याचे समोर आले. तसेच त्याच्याविरोधात मुंबईतील काही पोलीस ठाण्यात आणि गुजरात राज्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. येथील प्रकरणांमध्ये त्याला अटक देखील झाली होती. शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतरही त्याने पुन्हा घरफोड्या केल्या. सांताक्रूझ येथील एका भुयारी गटारामध्ये वास्तव्य करायचे. त्यानंतर काही दिवस घरफोडीसाठी बंद घरांची रेकी करायची. तसेच घरफोडी करून चोरलेला मुद्देमाल विकायचा आणि विमानाने त्रिपूरामधील मूळ गावात निघून जायचे अशी त्याच्या गुन्हेगारीची कार्यपद्धती असल्याचे पोलीसांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

आरटीई अंतर्गत पहिल्या टप्यातील प्रवेशासाठी ५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ % ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्या टप्यातील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याकरिता दि.३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तरी पहिल्या टप्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी दि.०५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 

पहिल्या टप्यात निवड झालेल्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही त्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय पडताळणी समितीस भेट देऊन कागदपत्रे तपासून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावेत असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघावर भाजपचा दावा; नंदू परब यांचे नाव आघाडीवर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : आगामी विधानसभा मतदार संघासाठी भाजपाने कंबर कसली असून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघावर भाजपाने दावा केला आहे. या विधानसभेवर दोन वेळेला शिवसेनेचा उमेदवार विजयी झाले नाही. यावेळी भाजपचा उमेदवार म्हणून कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांचे नाव आघाडीवर आहे.

२०१४ आणि २०१९ साली भाजपा - शिवसेना युतीने विधानसभा निवडणूक लढविली होती. दोन्ही वेळेस युतीतून  शिवसेनेचा उमेदवार उभा करण्यात आला होता. २०१९ साली मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील हे निवडून आले होते. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघावर दावा जाहीर केला आहे.

भारतीय जनता पार्टी डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर, दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वनाथ पेडणेकर अशा तिन्ही मंडळ अध्यक्षांनी कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी तसेच कोर कमिटी यांच्याकडे ११४-कल्याण ग्रामीण विधानसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी असे पत्र दिले आहे.
   
याबाबत भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर म्हणाले, कल्याण ग्रामीण विधानसभा यापूर्वी युतीमधुन सन २०१४ व २०१९ दोन्ही वेळा शिवसेना पक्षाने लढवली होती. परंतु दोन्ही वेळा शिवसेनेला हार पत्करावी लागली होती. या निवडणुकीत कल्याण ग्रामीण विधानसभा हा भारतीय जनता पार्टीलाच मिळणे आवश्यक आहे. या विधानसभा क्षेत्रात एकूण ३६० बूथ असून त्यातील निम्मे बूथ हे डोंबिवली ग्रामीण मंडळ विभागात येतात. नुकत्याच झालेल्या कल्याण लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान हे कल्याण ग्रामीण विधानसभा मधून झाले. त्यानंतर पदवीधर मतदारसंघासाठीही मोठ्या प्रमाणात मतदान ग्रामीण विधानसभेमधूनच झाले. कल्याण ग्रामीण विधानसभेतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक गेली पाच वर्ष या विधानसभेमध्ये काम करत आहेत. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघ निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. भाजपला यंदा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून नक्कीच विजयश्री खेचून आणता येईल असा ठाम विश्वास आहे.