BREAKING NEWS
latest

शिवसेनेच्या वतीने डोंबिवलीत भरविलेल्या भव्य नोकरी महोत्सवात हजारो तरुणांना मिळाला रोजगार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.११ :  शिवसेनेचे कल्याण लोकसभेत तब्बल तिसऱ्यांदा निवडून आलेले   खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ११ ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील 'होरायझन' सभागृहात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवाचे आयोजन शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यातर्फे करण्यात आले. या नोकरी महोत्सवात सुमारे ५००० तरुणांनी सहभाग घेतला. या रोजगार मेळाव्यात १३० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग होता, ज्यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने या नोकरी महोत्सव उपक्रमाचा मोठा लाभ झाला आहे. 
शिवसेनेच्या या उपक्रमामुळे तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार मिळविण्यास मदत झाली असून, या मेळाव्यामुळे डोंबिवलीत उत्साहाचे वातावरण होते. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, लताताई पाटील, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, एकनाथमामा पाटील, उपशहर प्रमुख संतोष चव्हाण, गुलाब वझे, प्रकाश म्हात्रे, कविता गावंड, हरिश्चंद्र पाटील, पंढरीनाथ पाटील, विजय पाटील, जनार्धन म्हात्रे, गजानन व्यापारी, माजी नगरसेवक संजय पावशे आदीसह अनेक शिवसेना पदाधिकारी या नोकरी महोत्सवात उपस्थित होते.
यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र व डोंबिवली विधानसभा क्षेत्राकरिता महाराष्ट्र शासन व शिवसेना शाखा यांच्या माध्यमातून हा भव्य दिव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला असून नुकत्याच परीक्षा झालेल्या आहेत. अनेक तरुण - तरूणी नोकरीच्या शोधात आहेत.  अशा तरुणांना या नोकरी महोत्सवात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे, हजारो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. या नोकरी महोत्सवात युवक-युवती जे चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत अशा युवक-युवतीं करिता हा नोकरी महोत्सव रोजगार मेळावा उपयोगी आहे. या नोकरी महोत्सवात 'ऑन दि स्पॉट' नियुक्तीपत्र देण्यात आले, ज्यांची पात्रता आहे त्यांना या नोकरी महोत्सवाचा नक्कीच फायदा झाला .

आगीत भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं आणि हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापुरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटींची आर्थिक मदत देणार अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे केली. त्यांनी आगीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ८ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक झालं ही अतिशय दुर्देवी घटना आहे. हे नाट्यगृह युध्दपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार २५ कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा ५ कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक कलाकार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलाकारांशी संवाद साधून त्यांना धीरही दिला. 
उपस्थित माध्यमांशी संवाद साधून त्यांच्यामार्फत त्यांनी कोल्हापूरमधील नागरिकांना आवाहनही केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नाट्यगृहे अनेक असतात पण काही नाट्यगृहांशी कलावंत आणि श्रोत्यांचं जिव्हाळ्याचं नातं असतं. जशा कोल्हापूरवासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. अनेक कलावंताची मागणी आहे की, हे नाट्यगृह जसं पूर्वी होतं तसंच पुन्हा उभं राहावं. मदतीसाठी मला खूप फोन आले, खूप मेसेजेस आले. शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारं असून कलावंत आणि श्रोत्यांचा देखील आदर करणारं शासन आहे. ते पुढे म्हणाले, स्थानिक कलावंतांशी संवाद साधल्यानंतर नाट्यगृहाशी भावनिक नातं किती घट्ट होतं याची एक प्रचिती येते. नुकसानग्रस्त झालेल्या नाट्यगृहासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, याबाबत फॉरेन्सिंक विभाग व पोलीस विभाग या घटनेची चौकशीही करीत आहेत. परंतु हे नाट्यगृह उभे पुन्हा उभं राहणं हे महत्त्वाचं आहे. चौकशी होईल आणि जे दोषी असतील त्याच्यावर पुढे कारवाईही केली जाईल.

ज्येष्ठ सैनिकांनी महापालिकेचे दूत म्हणून जनमानसात समन्वयाचे कार्य करण्याचे महापालिका आयुक्तांचे आव्हान..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण, दि.०९: स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांचे आणि देशासाठी आपले योगदान दिलेल्या माजी सैनिकांचे कार्य अतुलनीय आहे. या माजी ज्येष्ठ सैनिकांनी महापालिकेचे दूत म्हणून जनमानसात समन्वयाचे कार्य करावे, असे विनंतीवजा आवाहन महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड़ यांनी आज  महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या ऑगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात केले. यावेळी उपस्थित सैन्यदल, नौदल, हवाईदलातील माजी ज्येष्ठ अधिकारी वर्गाशी महापालिका आयुक्तांनी संवाद साधला. ज्येष्ठ नागरीकांच्या समस्यांबाबत लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित ज्येष्ठांना दिले.
०९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात असलेल्या हुतात्मा स्मारकास महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, सर्व उपायुक्त, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क), सहा.आयुक्त व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते, सर्व उपस्थितांमार्फत हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत "तिरंगा प्रतिज्ञा" घेण्यात आली.
यासमयी पद्मश्री पुरष्कार विजेते गजानन माने, माजी आर्मी इंजिनिअर ए.व्ही.कंरदीकर, इंडियन नेव्हीचे माजी अधिकारी एस.बी.खांडेकर, एअरफोर्स चे माजी अधिकारी एन.एस.मानकर तसेच महापालिका अग्निशमन विभागात काम करताना एका दुर्घटनेमध्ये शहीद झालेल्या अग्निशमन अधिकाऱ्यांच्या जवळचे आप्तेष्ट जयेश शेलार, दिपा वाघचौडे, यज्ञेश आमले व पौर्णिमा कांबळे यांचा महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे हस्ते पुस्तक व गुलाब पुष्प देवून सन्मान करण्यात आला.
शासनाच्या निर्देशानुसार आज महापालिकेमार्फत "हर घर तिरंगा" म्हणजेच "घरोघरी तिरंगा" या अभियानाचा प्रारंभही करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना ध्वज विक्री करण्यात आले. 'हर घर तिरंगा' अभियानाच्या माध्यमातून महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या शुभ्र फलकावर (कॅन्व्हासवर) "जय हिंद" व "घरोघरी तिरंगा" या शब्दांचे आरेखन करीत उपस्थितांनी आपल्या स्वाक्षरीची मोहर उ‍मटविली.

भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची नियुक्ती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : भारत-अमेरिका अंतराळ मोहिमेसाठी भारताने आपल्या चार प्रमुख अंतराळवीराची निवड केली आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे या मोहिमेचे प्रमुख अंतराळवीर असतील. कॅप्टन प्रशांत नायर यांचीही या मोहिमेसाठी निवड करण्यात आल्याचे 'इसरो'ने काल जाहीर केले. बॅकअप म्हणून तो त्याचा भाग असेल.

शुभांशु 'इंटरनॅशनल स्पेस स्टेशन'वर (आयएसएस) कधी जाणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दोघांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. इसरो ने सांगितले की, 'ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर' (एचएसएफसी) ने आयएसएस मधील आगामी 'ऍक्सीयॉम ४' मोहिमेसाठी यूएस आधारित 'ऍक्सीयॉम स्पेस' सोबत 'स्पेस फ्लाइट करार' (एसएफए) केला आहे.

४ गगनयात्रींमध्ये शुभांशूची निवड

'इसरो'ने सांगितले की, ‘४ गगनयात्रींपैकी 'नॅशनल मिशन असाइनमेंट बोर्डा'ने शुभांशू आणि प्रशांत यांची निवड केली आहे. 'इंडो यूएस स्पेस मिशन' करारामुळे भारताची आगामी गगनयान मोहीम पूर्ण करण्यात मदत होईल.

ग्रुप कॅप्टन शुभांशू आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत या दोघांनाही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून अमेरिकेत मिशनसाठी प्रशिक्षण दिले जाईल. अंतराळ मोहिमेदरम्यान, निवडलेली गगनयात्री वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञानाची चाचणी घेतील. याशिवाय ते अंतराळातील आउटरीच उपक्रमांमध्येही सहभागी होतील.

शुभांशुने सुखोई आणि मिग सारखी लढाऊ विमाने उडवली आहेत

शुभांशू ३८ वर्षांचा आहे. तो एक फायटर पायलट आणि लढाऊ लीडर आहे. त्याला २००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी सुखोई-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जॅग्वार, हॉक, डॉर्नियर आणि एएन-३२ ही विमाने उडवली आहेत.

शुभांशूचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनऊ, उत्तर प्रदेश येथे झाला. शुभांशु हा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (एनडीए) माजी विद्यार्थीही आहे. १७ जून २००६ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात त्यांची नियुक्ती झाली.

कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे गगनयात्रींमध्ये सर्वात वयस्कर (४७ वर्षे) वयाचे आहेत. प्रशांत हे एनडीएचे माजी विद्यार्थीही आहेत. एअरफोर्स अकादमीत त्यांना 'स्वॉर्ड ऑफ ऑनर'ही मिळाला. प्रशांत यांचा जन्म २६ ऑगस्ट १९७६ रोजी केरळमधील तिरुवाझियाड येथे झाला. १९ डिसेंबर १९९८ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहात त्यांची नियुक्ती झाली.

ग्रुप कॅप्टन नायर हे 'क्लास-ए' फ्लाइट ट्रेनर आहेत. त्यांना ३००० तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी सुखोई-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, हॉक, डॉर्नियर आणि एन-३२ ही विमानेही उडवली आहेत.

प्रशांतने सुखोई-३० एमकेआय स्क्वाड्रनची कमान घेतली आहे. ते अमेरिकेच्या स्टाफ कॉलेजचे माजी विद्यार्थीही आहेत. याशिवाय ते डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन आणि फ्लाइंग इंस्ट्रक्टर स्कूल, तांबरम येथील कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन करत आहेत.

अमेरिकेत 'जॉबी' ची हायड्रोजनवर आधारित ‘हवाई टॅक्सी’ ची चाचणी यशस्वी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
    
न्यूयॉर्क : हवाई टॅक्सी येत्या काळातील रस्त्यांवरील प्रचंड गर्दीवर एक उपाय म्हणून पाहीले जात आहे. ही सेवा प्रत्यक्षात येण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरु असून असाच एक प्रयोग अमेरिकेत यशस्वी झाला आहे. प्रायोगिक स्तरावर असणारी ‘फ्लाईंग एअर टॅक्सी’ अर्थात ‘उडणारी हवाई टॅक्सी‘ आता लवकरच प्रत्यक्षात सेवेत रुजू होईल, असे संकेत मिळाले आहेत. या टॅक्सीच्या उड्डाणाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. हायड्रोजनवर चालणार्‍या या एअर टॅक्सीने चाचणी दरम्यान ९०२ किलोमीटर्सचे विक्रमी अंतर यशस्वीरीत्या पार करून सुखरूप  लँडिंग केले.
लँडिंग केल्यानंतर या एअर टॅक्सीत १० टक्के हायड्रोजन इंधन शिल्लक होते. त्यामुळे ही एअर टॅक्सी याहून अधिक अंतरही कापू शकते, हे स्पष्ट झाले आहे. 'जॉबी' ने तयार केलेली ही पहिलीच हायड्रोजन इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट टॅक्सी असून ती व्हर्टिकली उड्डाण करू शकते आणि जमिनीवर उतरूही शकते. टॅक्सीने हवाई प्रवास हा मानवी विकासाचा पुढील टप्पा असून यावर आणखी संशोधन सुरू आहे, असे 'जॉबी'चे संस्थापक व प्रमुख जोएबेन बेव्हिर्ट यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्यावर्षी पूर्णपणे इलेक्ट्रिकवरील एअर टॅक्सीची छोट्या ट्रिपमध्ये चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर हायड्रोजन-इलेक्ट्रिक व्हर्जनकडे लक्ष केंद्रित करण्यात आले.

एअर टॅक्सीमुळे मॅनहॅटन ते जेएफके हा प्रवास अवघ्या सात मिनिटांत होऊ शकतो. सध्या हा रस्ता मार्गाने कार प्रवासासाठी एक तासाचा अवधी लागतो. सॅन फ्रॅन्सिस्को ते सॅन दिएगो, बॉस्टन ते बॅल्टिमोर, नॅश्विल्ले ते न्यू ऑर्लियन्स या मार्गावर सध्या हवाई टॅक्सीची सेवा सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. यात नव्या द्रवरूप हायड्रोजन इंधन टाकीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यात ४० किलो द्रवरूप हायड्रोजन साठवले जाऊ शकते. एक चालक व चार प्रवासी या हवाई टॅक्सीतून आरामशीर प्रवास करू शकतील असे वर्तविण्यात आले.