BREAKING NEWS
latest

वैद्यकीय उपचारांच्या हलगर्जीपणातून शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू झाल्याचा सागर जोंधळे यांचा आरोपामुळे गिता खरे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल..


प्रतिनिधी: अवधुत सावंत


डोंबिवली : डोंबिवलीतील जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांना दोन वर्षापूर्वी यकृताचा कर्करोग झाला होता. त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी पुरेपुर वैद्यकीय उपचार होणे आवश्यक होते. परंतु, शिवाजीराव जोंधळे नियंत्रक असलेल्या 'विघ्नहर्ता ट्रस्ट'च्या सचिव गिता खरे आणि त्यांचा खरे कुटुंबातील मुलगा, मुलगी, सून, जावई यांनी शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशातून त्यांना वेळोवेळी मानसिक त्रास देऊन वैद्यकीय उपचार घेण्यापासून वंचित ठेवले. शिवाजीराव यांच्यावर कर्करोग आजारातून बरे होण्यासाठी यकृताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गिता खरे यांनी होऊ दिली नाही. त्यामुळे आपल्या वडिलांच्या मृत्यूस गिता खरे कुटुंब कारणीभूत आहे. हा शिवाजीराव जोंधळे यांचा मुलगा सागर यांचा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथमदर्शनी मान्य करून गिता खरे यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश विष्णुनगर पोलिसांना दिले.
                               
कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी सायली लम्भाते यांच्या आदेशावरून डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी सागर शिवाजीराव जोंधळे यांच्या तक्रारीवरून 'विघ्नहर्ता ट्रस्ट'च्या सचिव गिता खरे, वर्षा देशमुख, प्रितम देशमुख, हर्षकुमार खरे आणि स्नेहा खरे यांच्या विरूध्द शनिवारी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने खरे कुटुंबियांची बाजू ऐकून घेऊन हा आदेश दिला. एखाद्याचा मानसिक छळ करणे, निष्काळजीपणा, गुन्हेगारी कट रचणे या भारतीय न्याय संहिता कलमाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीराव जोंधळे यांना कायदेशीर विवाहाच्या वैशाली पत्नीपासून चार अपत्ये आहेत. 'समर्थ समाज' या शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद ते सांभाळत होते. या संस्थेत काही वर्षापूर्वी गिता खरे या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. गिता खरे यांच्या बरोबर शिवाजीराव यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. या प्रकाराने शिवाजीराव जोंधळे यांच्या कुटुंबीयांवर अन्याय झाला. शिवाजीराव यांनी मिळकतीमधून आसनगाव सह अनेक ठिकाणी जागा घेऊन तेथे शिक्षण संस्थेची उभारणी केली. गिता खरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीराव यांना ब्लॅकमेलिंग करून, जोंधळे कुटुंबीयांना अंधारात ठेऊन या सर्व मिळकती स्वत:च्या नावावर ब्लॅकमेलिंग च्या दबावाने करून घेतल्या. या विषयावरून शिवाजीराव आणि मुलगा सागर यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाले.
जानेवारी २०२२ मध्ये शिवाजीराव यांना यकृताचा कर्करोग झाला. कौटुंबिक वितुष्ट दूर सारून मुलगा सागरने त्यांची काळजी घेण्यास सुरुवात केली. चेन्नई, मुंबई, डोंबिवलीतील रुग्णालयात शिवाजीराव यांच्यावर उपचार करण्यात आले. सागर यांची शिवाजीरावांबरोबरची जवळीक खरे कुटुंबीयांना आवडली नाही. सागरने वडिलांसाठी स्वतः यकृत देण्याची तयारी सुद्धा केली. ती गिता खरे यांनी व्देषातून नाकारली. सागर व शिवाजीराव एक झाले तर आपणास शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करता येणार नाही म्हणून गिता खरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवाजीराव यांना कर्करोगाच्या योग्य उपचारापासून वंचित ठेवले. खोटी कारणे डॉक्टरांना सांगून त्यांना उपचाराविना घरी डांबून ठेवले. या निष्काळजीपणातून शिवाजीराव यांचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला, असे सागर यांनी त्याच्या तक्रारीत म्हटले आहे. आपल्या वडिलांच्या मृ्त्यूस गीता खरे कुटुंब जबाबदार असल्याने त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सागर यांनी पोलिसांकडे केली होती. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने हस्तक्षेप केल्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली नसल्याचा आरोप सागर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे कल्याण जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. तर अधिक माहितासाठी गिता खरे यांना संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्या कारणाने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

डोंबिवली पोलिसांकडून मोटार सायकल चोरी करणारा सराईत आरोपी काही तासांत जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि नं. ७९१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (ब) प्रमाणे दिनांक १४/०८/२०२४ रोजी ००.४५ वा. गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी हेमंत धिरजलाल वाडेल (वय: ४१ वर्षे), धंदा-व्यवसाय, राहणार: भानु को.हौ.सो, सी/३४ शहीद भगतसिंग रोड, डोंबिवली पुर्व, यांनी दिनांक १३/०८/२०२४ रोजी सांयकाळी ०६:३० वा.च्या दरम्यान ओम सुवृत्ती को.हौ.सो, राजाजी पथ, डोंबिवली पुर्व येथे आपली २५,०००/- रुपये किंमतीची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटारसायकल नं. एमएच-०५ सीएन ५९७२, ही सोसायटीच्या मोकळया जागेमध्ये पार्क करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीने चोरून नेली म्हणुन सदरचा गुन्हा दाखल आहे.
नमुद गुन्ह्यातील आरोपी हा अज्ञात असल्याने, तसेच गुन्हा करताना घटनास्थळावर त्याने कोणताही मागमुस ठेवला नसल्यामुळे गुन्ह्याचा छडा लावणे हे एक मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. परंतु पोलीसांनी सदरचे आव्हान स्विकारून, नमुद गुन्ह्याचा तपास चालु केला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळाच्या आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचे फुटेज पोशि. राठोड यांनी प्राप्त करून, आरोपीची ओळख पटवुन सदर आरोपी हा   डोंबिवली पूर्वेकडील केळकर रोड वरील तलप चहाचे बाजुला असल्याची पोहवा. विशाल वाघ यांना दिनांक १४/०८/२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त बातमीचे अनुषंगाने सपोनि. बळवंत भराडे, पोउनि. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ व इतर अंमलदार असे सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता, सराईत गुन्हेगार नामे राम रमेश पोटे (वय;२४ वर्षे), राहणार: गजानन चाळ, रूम नं.३, कोपर, आयरेगाव, डोंबिवली पुर्व हा तलप चहाचे बाजुला, केळकर रोड, डोंबिवली पूर्व येथे असल्याने, त्यास पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जाण्याचे प्रयत्नात असताना, त्यास पळुन जाण्याचा वाव न देता, जागीच १८:३० वा. च्या सुमारास ताब्यात घेवुन, डोंबिवली पोलीस ठाणे येथे हजर केले. त्याचेकडुन नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेली २५,०००/- रूपये किंमतीची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटारसायकल हस्तगत केली आहे. नमुद आरोपी याचा गुन्हेगारी अभिलेख तपासुन पाहिला असता, त्याच्यावर १) शिवाजीनगर पोलीस ठाणे, मुंबई, गु.रजि नं. ५०९/२०२० भा.द.वि.क.४५४, ३८०, २) घाटकोपर पोलीस ठाणे, गु.रजि नं. ९०/२०२३ भा.द.वि. क.३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे सराईत आरोपीत यास गुन्हा दाखल होताच काही तासांच्या आत अटक करून, नमुद गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरचा गुन्हा सहायक पोलीस आयुक्त मा. सुहास हेमाडे, डोंबिवली विभाग, वपोनि मा. गणेश जावदवाड, पोनि. पंकज भालेराव (गुन्हे) डोंबिवली पोलीस ठाणे यांच्या  मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा सपोनि. बळवंत भराडे, पोलीस उपनिरी. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ, सचिन भालेराव, प्रशांत सरनाईक, दत्तात्रय कुरणे, पोना. दिलीप कोती, शरद रायते, पोशि. देविदास पोटे, पोशि. शिवाजी राठोड, मंगेश विर यांनी उघडकीस आणला आहे.

भंगार दुकानातील मजुरांचे मोबाईल फोन व वाहनांच्या बॅटऱ्या चोरून विक्रीकरीता आलेल्या दोन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखा घटक-३ कल्याण च्या पोलिसांनी केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: आज रोजी गुन्हे शाखा घटक-३ घटकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, दोन इसम चोरीचे मोबाईल व वाहनातुन चोरी केलेली बॅटरी विक्री करण्याकरिता येणार आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा, घटक-०३ कल्याण कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कोळेगाव रोडच्या बाजुला कल्याण शिळ फाटा रोड येथे सापळा लावुन संशयित इसम १) अनुराग सुनिल मंडराई (वय: २० वर्षे) रा: संत रोहिदास बिल्डींग रूम नं. ७०८, वीर सावरकर रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, डोंबिवली (पूर्व) व  २) इरफान बाबु शेख (वय: २२ वर्षे) रा. प्रमिता बिल्डींग रूम नं. १०२, स्मशानभुमी जवळ, गोलवली गाव, मानपाडा डोंबिवली पूर्व यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे मिळून आलेल्या मोबाईल व बॅटरी बाबत दोघांकडे अधिक विश्वासात घेवून कसून विचारपुस करता त्यांनी माहिती दिली की, त्यांनी दोघांनी मिळून दि. ०७/०८/२०२४ रोजी रात्रीच्या सुमारास सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व) येथील भंगार दुकानात पार्क केलेल्या ऍप्पे तीन चाकी टमटमची बॅटरी व सदर भंगार दुकानात झोपलेल्या कामगारांचे मोबाईल चोरी केले असुन ते मोबाईल व बॅटरी विक्री करण्याकरीता ते घेवुन जात असल्याचे सांगितले. सदर  मोबाईल फोन व बॅटरी चोरी बाबत परिमंडळ - ३ कल्याण पोलीस ठाणे यांच्याकडे खात्री करता, मानपाडा पोलीस ठाणे गु.रजि नंबर ९७०/२०२४ बी. एन.एस २०२३ कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. नमुद दोन्ही आरोपी यांच्याकडुन एकुण ५०,१००/- रु. किमंतीचे ०५ मोबाईल व ०१ तीन चाकी वाहनाची बॅटरी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपी यांना गुन्ह्याच्या  पुढील तपासकामी सापडलेल्या  मुद्देमालासह मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली पूर्व येथे हजर करण्यात आले आहे.

सदर दोन्ही गुन्हेगार पोलीस रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी करणारे असून १) इरफान बाबू शेख वर मानपाडा पोलीस स्टेशन, डोंबिवली पोलीस स्टेशन आणि टिळक नगर पोलीस स्टेशन येथे एकूण घरफोडी, चोरीचे १२ गुन्हे दाखल आहेत, तसेच २) अनुराग सुनिल मंडराई याच्यावर वरील पोलीस स्टेशन प्रमाणे घरफोडी चोरीचे ५ गुन्हे दाखल आहेत. सदरचा पुढील तपास मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.
प्रस्तुत गुन्ह्याची यशस्वी कामगिरी मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. शेखर बागडे, सहा पोलीस आयुक्त, (शोध - १) गुन्हे ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, सपोनि. संतोष उगलमुगले, सपोउपनि. दत्ताराम भोसले, पोहवा. विश्वास माने, पोना. दिपक महाजन, पोकाँ. गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, उमेश जाधव, सतिश सोनावणे यांनी यशस्वीपणे केलेली आहे.

महिलांच्या बँक खात्यावर “लाडकी बहीण” योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : येत्या आठवड्यात येऊ घातलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महिला भगिनींना सुखावणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी एक्स खात्यावरून प्रसिद्धी माध्यमांना दिली.

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. १ जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंक १ कोटी ३५ लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. परंतु, त्या आधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत १ कोटी ३५ लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येत आहेत. परंतु, पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे २७ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी दिले आहेत. तसंच, कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या १७ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. ३१ ऑगस्ट़नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

डोंबिवलीतील श्री गणेश संस्थानाला सुमीत मोगरे यांनी दिली '३० किलो चांदीची वीट' भेट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: डोंबिवलीतील ग्रामदैवत असलेले श्री गणेश संस्थान मंदिराला यंदा १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. ज्यावेळी एखाद्या देवस्थानाला १०० वर्ष पूर्ण होतात त्याविषयी त्या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचे दर्जा प्राप्त होत असतो. डोंबिवली श्री गणेश मंदिरात जीर्णोद्धारावेळी गाभाऱ्यात चांदी बसवत असून इतर सुशोभीकरण करत आहे. पुढील पिढीसाठी या मंदिराची योजना आहे. तयार झालेल्या गाभाऱ्यात काम सुरु असून, अजून कामाकरता १०० ते १५० किलो चांदी अपेक्षित आहे. त्यात बऱ्या पैकी चांदी आली आहे. 

श्री गणेश मंदिर संस्थान हे अनेक लोकांपर्यत जात असून आवाहन करत आहे तसेच डोंबिवलीकार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातूनही आवाहन करण्यात आले होते. नांदेड येथील दानशूर व्यक्ती सुमित मोगरे यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ३० किलो वजनाची चांदीची वीट अर्पण केली आहे. शनिवार १० तारखेला ही वीट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत श्री गणेश मंदिर संस्थानला देण्यात आली. या प्रसंगी मंदिर समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते. या जीर्णोद्धारामुळे मंदिराचे ऐतिहासिक महत्व जपले जाईल आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा आहे. वीट अर्पण करणाऱ्या सुमित मोगरे यांचे मंदिर समितीने आभार मानले असून या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मंदिराच्या अध्यक्षा अलका मुतालिका, राहुल दामले, प्रवीण दुधे आदी मान्यवर उपस्थित होते.