BREAKING NEWS
latest

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील कोंडीने प्रवासी हैराण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक भागातील वाहन कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी पालिका, पोलीस, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करायचे आहेत, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी देऊनही ही कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे चित्र आहे.

डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात १६ वर्षाहून अधिक काळ वापरलेल्या भंगार रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी सर्वाधिक वापरल्या जातात. हे रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून रस्ते, चौक, रेल्वे स्थानकाची प्रवेशव्दारे येथे प्रवासी वाहतुकीसाठी उभे राहतात. आरटीओ अधिकारी डोंबिवली, कल्याणमध्ये फिरत नसल्याने या बेकायदा रिक्षा चालकांची चंगळ असते. त्यामुळे कोंडीत सर्वाधिक भर पडते. डोंबिवली पूर्व भागातील फडके रस्त्यावरून केडीएमटी, एसटीच्या बस, रिक्षा, खासगी मोटारी, कंपन्यांच्या, शाळेच्या बस धावतात. या वाढत्या तुलनेत फडके रस्ता, बाजीप्रभू चौक वाहनांसाठी अपुरे पडत आहेत. बाजीप्रभू चौकात केडीएमटीचा बस थांबा आहे.

पाटकर प्लाझामध्ये पालिकेचे वाहनतळ आहे. हे वाहनतळ सुरू करण्यात राजकीय अडथळे आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आरटीओ, वाहतूक पोलिसांना हे वाहनतळ सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. इतर राजकीय मंडळींनी या प्रक्रियेत मुद्दाम अडथळे आणले. बाजीप्रभू चौकातील वर्दळीच्या रस्त्यावर पाच रिक्षा वाहनतळ आहेत. या वाहनतळांवर दोन ते तीन रांगांमध्ये भर रस्त्यात रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते.

फडके रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरील हाॅटेल, दुकानांसमोर खरेदीदार आपली वाहने उभी करून निघून जातात. त्यामुळे मोठी वाहने या कोंडीत अडकतात. के. बी. विरा शाळेसमोरील अरूंद गल्लीत पालिकेच्या कचरा वाहू गाड्या, मोटारी दुतर्फा उभ्या असतात. वाहतूक पोलिसांचे टोईंग व्हॅन या भागात फिरत असते. यामधील हवालदाराने दुकानांच्या समोर उभ्या असलेल्या मोटारी, दुचाकी उचलण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.

संध्याकाळच्या कंपन्यांच्या, शाळेच्या बस रस्त्यावर आल्या की कोंडीत सर्वाधिक भर पडते. डोंबिवली परिसरातील गृहसंकुलांमधील खासगी बस डोंबिवली पूर्व भागातील विविध रस्त्यांवर उभ्या असतात. या बससाठी रेल्वे स्थानक भागात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत. डोंबिवली शहर अलीकडे नियमित वाहन कोंडीत अडकू लागल्याने प्रवासी हैराण आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून मानपाडा रस्ता ते शिळफाटा, पलावा भागात जाणाऱ्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल होतात. या रस्त्यांवर दररोज कोंडी होते. मानपाडा रस्त्यावरील स्टार काॅलनी छेद रस्ता, सोनारपाडा पोहच रस्ता चौक भागात दररोज कोंडी होते.

डोंबिवलीतील वाहनांची संख्या वाढली आहे. या वाढत्या वाहन संख्येमुळे रस्ते अपुरे पडत आहेत. शहरात कोंडी होणार नाही यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक चौक, वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक तैनात असतात, असे डोंबिवली वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

कल्याण-डोंबिवलीकरांना मालमत्ता कराबद्दल श्रीकांत शिंदें यांच्या पाठपुराव्याने मोठा दिलासा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : कल्याण-डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण महापालिका मालमत्ता कराचा मुद्दा ऐरणीवर आला असताना अव्वाच्या सव्वा करामुळे कल्याण डोंबिवलीकर वैगातगले होते. अखेरीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ‘२७ गावातील मालमत्ता कराचा प्रश्न आहे तो २०१५ च्या नुसार घेतला जाईल व त्यापुढील संपूर्णपणे कर हा माफ केला जाईल असा देखील मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे’ अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, २७ गावांचा प्रश्न होता त्याच्यावरती अनेक दिवसांपासून या ठिकाणी मालमत्ता कर प्रलंबित होता. परंतु तो वसूल केला जावा अशी मागणी नागरिकांची होती. मुख्यमंत्र्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा जीआर देखील काढलेला आहे. २७ गावातील टॅक्स प्रश्न आहे तो २०१५ च्या नुसार घेतला जाईल. त्या पुढील संपूर्णपणे टॅक्स हा माफ केला जाईल असा देखील मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मालमत्ता कराचा प्रश्न आता मार्चमध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर २७ गावातील सर्व समस्या दूर होतील, अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

२७ गावांमध्ये 'अमृत योजना' सुरू आहे त्या अमृत योजनांसाठी अतिरिक्त निधी याची मागणी केलेली आहे. दोनशे कोटी अतिरिक्त निधी या ठिकाणी मागण्यात आलेला आहे. २७ गावांसाठी टाकी बनवण्यासाठी आम्हाला निधी मिळाला नाही आणि त्यामध्ये वेळ निघून गेला. त्या ठिकाणी पाईपलाईन टाकायची आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिरिक्त निधी मागण्यात आलेले आहे. २७ गावांमध्ये अतिरिक्त पाण्यासाठी कशाप्रकारे योजना केली जाईल, असं आश्वासनही श्रीकांत शिंदे यांनी दिले.

कल्याण-डोंबिवलीतील पाणी प्रश्न सुटणार, मुख्यमंत्री शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

मीरा-भाईंदर साठी सूर्या डॅम होत आहे आणि तेव्हा त्यांना स्वतंत्र पाणीपुरवठा होणार आहे. आता जेवढे जास्त पाणी उचलत आहोत ते रेग्युलर करता येईल का ही चर्चा करण्यात आली. २७ गावातील जे कामगार आहेत त्यांना कायम करून घेण्याचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे. २७ गावातील कर्मचाऱ्यांचा कायमस्वरूपी रुजू करून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री लवकरच घेतील, असंही शिंदे म्हणाले. ‘मशाल हाती घेण्याचा दम त्यांच्यामध्ये नाहीये. परंतु माकडाच्या हातात मशाल आल्यावर ते माकड कसं असतं हे सगळ्यांना माहित आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे लोकांच्या खात्यामध्ये मिळू लागलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. विरोधकांना वाटलं नव्हतं की, या ठिकाणी सरकार हा निर्णय घेईल आणि या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यात पैसे दिले जातील. आज या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त मोठी भेट सरकारकडून मिळालेले आहे, असं म्हणत शिंदे यांनी विरोधकांना टोलाही लगावला.

‘विरोधकांची सवय आहे की सकाळी उठल्यावरती सरकारला  शिव्या देत फिरायचं. महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहे तर त्या खुशीच्या आशीर्वाद आहे तर त्यांनी विचार केला सरकारने आमचा विचार केलेला आहे. गेल्या सरकारमध्ये अडीच दिवसच फक्त मंत्रालयात जाण्याचा आणि फेसबुक लाईव्ह करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड या मागच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. त्यांना योजना समजणार नाही. या योजना सरकारच्या माध्यमातून घरोघरी पोचलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे, असा टोलाही शिंदेंनी यावेळी बोलताना लगावला.

डोंबिवली पोलीसांनी घरफोडीतील सराईत आरोपीस शिताफीने केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि नं. ७६९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१(४) प्रमाणे दिनांक २४/०७/२०२४ रोजी १९:२६ वा. गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे लिलाधर पद्मनाभ सालियान (वय: ५८ वर्षे) धंदा नोकरी, राहणार: बी/००२, श्री अन्नपूर्णा पुजा बिल्डीग, आयरे रोड तुकाराम नगर, डोंबिवली पूर्व, यांच्या राहत्या घरी दिनांक २४/०७/२०२४ रोजी रात्रौ ००:३० वा. ते पहाटे ५:०० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने राहत्या घरातील देवघरासाठी असलेल्या हॉल मधील खिडकी उघडुन त्यावाटे घरात प्रवेश करून घराचे हॉलमधील लोखंडी कपाटातील एकुण १,६४,०८०/- रूपये किंमतीची सोन्या व चांदीचे दागिने घरफोडी चोरी करून नेले म्हणुन सदरचा गुन्हा दाखल आहे.
नमुद गुन्ह्यातील आरोपी हा अज्ञात असल्याने, तसेच गुन्हा करताना घटनास्थळावर त्याने कोणताही मागमुस ठेवला नसल्यामुळे गुन्ह्याचा छडा लावणे हे एक मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. परंतु पोलीसांनी सदरचे आव्हान तत्परतेने स्विकारून, नमुद गुन्ह्याचा तपास चालु केला. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळाच्या आजुबाजुचे सी.सी.टी.व्ही फुटेज पोशि. राठोड यांनी प्राप्त करून, आरोपीची ओळख पटवुन, पोहवा. विशाल वाघ यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या  अनुषंगाने पोउनि. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ व इतर अंमलदार असे सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता आरोपी नामे आकाश चंद्रकांत मोरे, (वय: २३ वर्षे), रा. रूम नं.४०४, दत्तनगर वसाहत, दत्तनगर, डोंबिवली पूर्व, यास पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन जाण्याचे प्रयत्नात असताना, त्यास पळुन जाण्याचा वाव न देता, ताब्यात घेतले. दिनांक १७/०८/२०२४ रोजी ००:४९ वा. अटक केली आहे. त्याच्याकडुन नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेले रुपये १,६४,०८०/- किंमतीचे सोन्या व चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. नमुद आरोपी याच्याकडे सखोल तपास करता, त्याने डोंबिवली पोलीस ठाणे, गुरजि नं. ७९५/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१ (४) प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. अशा प्रकारे सराईत आरोपी यास शिताफीने अटक करून  सदरचा गुन्हा उघडकीस आणून पुढील तपास डोंबिवली पोलिसांकडून सुरू आहे.

प्रस्तुत गुन्ह्यातील कारवाई मा. सुहास हेमाडे, सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. गणेश जवादवाड, पोनि. पंकज भालेराव (गुन्हे) डोंबिवली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा पोउनिरी. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ, सचिन भालेराव, प्रशांत सरनाईक, दत्तात्रय कुरणे, लोखंडे, पोना. कोळेकर, दिलीप कोती, पोशि. देविदास पोटे, शिवाजी राठोड, मंगेश वीर यांनी यशस्वीपणे केली आहे.

पालकांच्या उग्र आंदोलनामुळे रेल्वे सेवा १० तास रोखल्याने बदलापूर प्रकरणी राज्य सरकार कडून 'एसआयटी' चौकशी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
  
बदलापूर, दि. २० : बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध आज संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शने केली. सकाळी साडे सहा वाजल्यापासून पालक आणि नागरिक शाळेबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिला. आरोपी अक्षय शिंदेला कठोर शिक्षा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यानंतर आंदोलकांनी पटरीवर उतरून रेल्वेगाड्या रोखून धरल्या. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून आता कडक भूमिका घेण्यात आली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत व ह्या फास्ट ट्रॅक खटल्यासाठी ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड. उज्वल निकम ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बदलापूरमधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला. यातील एक चिमुकली चार वर्षांची, तर दुसरी सहा वर्षांची असल्याची माहिती मिळत आहे. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रूजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या २३ वर्षांच्या नराधमाने चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी लैंगिक कृत्य केलं. ही घटना १२ ऑगस्टची आहे. त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली. १२ ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणीनंतर त्या  नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप आहे. अखेर शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायदा आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, तर शाळेने मुख्याध्यापिकेचे निलंबन करून वर्गशिक्षिका आणि आयाला नोकरीवरून काढून टाकले.

यामुळे झाला नागरीकांचा उद्रेक

बदलापूर पोलीसांनी हा गंभीर गुन्हा नोंदवून घेण्यात अक्षम्य दिरंगाई केली. शहरातील अतिशय नामांकीत असलेल्या संबंधित शाळेनेकडूनही दुर्लक्ष झाल्याची उघडकीस आले. पोलीसांच्या तपासात शाळा व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या असून निष्काळजीपणाही उघड झाला आहे. मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नसण्यासोबतच शाळेतील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचंही काही पालकांनी सांगितलं. या घटनेमुळे बदलापूरमधील विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतींबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. यामुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट असून आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. आंदोलक आक्रमक झालं असून आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर येऊन लोकल अडवली व १० तास रेल्वेची सेवा खोळंबली  याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूरच्या आदर्श शाळेत १ ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. दरम्यान याच काळात त्याने गैरफायदा घेतला. विशेष म्हणजे शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या साफ सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेच्या निषेधार्थ आरोपींना फशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत बदलापूर रेल्वे स्थानकावर ठिय्या आंदोलन केलं होतं. सुमारे सात रेल्वे विभागाला याचा फटका बसला होता. मात्र आंदोलकांनी आपला ठिय्या काही हलवला नाही. पोलीसांसह स्थानिक आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं, मात्र आंदोलक मागे हटले नाहीत अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. बदलापूरमधील रेल्वे स्थानकामध्ये पटरीवर बसलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात केला. आंदोलकांनी पोलीसांवर दगडफेक केली याला पोलीसांनीही दगडफेक करत प्रत्युत्तर दिलं. आता बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलीसांनी आपला ताबा मिळवला आहे.

शाळा प्रशासनाकडून जाहीर माफी

शाळेत यापुढे सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी यापुढे अनेक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे शाळेच्या प्रशासनाने म्हटलं आहे. तर या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पालक आणि पोलीसांना सर्वतोपरी सहकार्य आणि कायदेशीर मदत संस्थेच्या वतीने केली जाईल, असंही शाळा प्रशासनाने म्हटलं आहे. शाळा प्रशासनाने घडलेल्या या प्रकाराबाबत सर्व पालकांची जाहीर माफी देखील मागितली आहे.

१० तासांनंतर रेल्वे सेवा हळूहळू पूर्ववत

दरम्यान, आता बदलापूर रेल्वे स्टेशनला पोलीस छावणीचे स्वरूप आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही आता स्टेशनमध्ये प्रवेश दिला जात नाहीये. आंदोलनामुळे बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी १०.१० वाजता रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. सकाळपासून जवळपास ८ तास आंदोलन सुरू होतं. या काळात बदलापुरवरुन सीएसएमटीकडे तसंच बदलापुरहून कर्जतकडे एकही ट्रेन गेली नव्हती. आता तब्बल १० तासांनी कर्जतवरुन निघालेली पहिली लोकल सीएसटीकडे रवाना झाली आहे. मात्र सध्या सीएसएमटी ते अंबरनाथपर्यंत लोकल सुरू असून अंबरनाथ ते कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प आहे.

संध्याकाळी गर्दीच्या वेळी कल्याण ते अंबरनाथवरून प्रवाशांसाठी राज्य परिवहन आणि केडीएमसीकडे एकूण १०० बस गाड्यांची मागणी केली आहे. मेल-एक्स्प्रेस सरासरी एक तास उशीराने धावत होत्या.

'म्हाडा'ची बनावट वेबसाईट बनवून ग्राहकांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर सेलने ठोकल्या बेड्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई:  महाराष्ट्रातील गरीब, अत्यल्प उत्पन्न व मध्यम उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी 'म्हाडा' तर्फे सोडत काढून घराचे स्वप्न साकार केले जाते, परंतु काही भामटे म्हाडाची खोटी वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक व दिशाभूल करीत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील स्वप्नाच्या घरासाठी म्हाडाने २०३० घरांची लॉटरी काढली असून अर्ज भरायला देखील सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या जाहिरातीनंतर मुंबईकरांचाही मोठा प्रतिसाद म्हाडाला मिळत असून चौकशी संदर्भाने विविध माध्यमातून म्हाडाशी संपर्क साधला जात आहे. त्यातच म्हाडाच्या याच जाहिरातीचा आधार घेऊन म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यास फेक वेबसाईट बनवून नागरिकांची लूट करण्यात येत असल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. स्वत: म्हाडाने याची दखल घेत पोलीसांत तक्रार दाखल केली होती. म्हाडाच्या घरासाठी डिपॉझिट रक्कम म्हणून भरण्यात येणाऱ्या ५० हजार आणि १ लाख रुपयांच्या रकमेतून मोठा अपहार करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर म्हाडाने मुंबई पोलीसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आता दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

म्हाडाची बनावट संकेतस्थळ तयार करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघड झाली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हाडाच्या माहिती संचार आणि तंत्रज्ञान विभागाकडून वांद्रे–कुर्ला संकुल येथील सायबर कक्षाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानुसार सायबर पोलिसांनी पुढील कारवाई करत नुकतीच याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. एकाला नालासोपाऱ्यातून तर दुसऱ्याला माहीम मधून सायबर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यातील एक म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स सायबर सेल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा नालासोपाऱ्यामधून एकाला तर माहीममधून एकाला अटक करण्यात आली आहे. अमोल पटेल (वय: २९ वर्षे) आणि कल्पेश सेवक (वय: ३५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाचा सूत्रधार कल्पेश सेवक असल्याचे तपासात समोर आले आहे. कल्पेश सेवक यानेच बनावट संकेतस्थळ तयार केले होते. तर या बनावट संकेत स्थळावरील पेमेंट लिंकद्वारे पन्नास हजाराची जी रक्कम ऑनलाईन पद्धतीने अदा झाली होती ती कल्पेश सेवक याच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती. हाच धागा पकडत पोलीसांनी तपास केला आणि दोन्ही आरोपींना पकडण्यात यश मिळवले. अमोल पटेल हा आपण म्हाडाचा अधिकारी असल्याचे सांगत नागरिकांना घरे दाखवत असे आणि म्हाडाची घरे देण्याच्या नावे त्यांची फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लाडक्या बहिणींचा धावा करणाऱ्यांनी भानावर येण्यातच सुचले शहाणपण..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई: विधानसभा निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या अशा खेळी 'सुंभ जळाला तरी पिळ कायम' याचं जिवंत आणि ताजं द्योतक होय. लोकसभा निवडणुकीत संविधानाचा जयघोष महाराष्ट्राने मनुवाद्यांना दिलेला दणका अवघा देश जाणतो. त्या पडझडीतून सावरण्यासाठी सत्ताधारी केविलवाणी धडपड करत असून 'लाडकी बहीण' त्याच धडपडीचं एक अपत्य !

ह्या अपत्याचा निवडणुकीत जास्तीत उपयोग करून घेण्यासाठी सरकार रात्रीचा दिवस करत असून विरोधक याला रडीचा डाव संबोधत आहेत. त्यांच्या या आरोपात दम असून त्यातील तथ्यांश न समजण्या इतपत महाराष्ट्रातील जनता वेडी नाही. नवीन विधानसभा २८ नोव्हेंबरपूर्वी अस्तित्वात येणे गरजेचे असल्याने पहिल्यांदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होतील असं सांगितलं गेलं. नंतर बोलले दिवाळीनंतर.. आणि आता चक्क डिसेंबर !
ही चालढकल नेमकी कशासाठी याचं नेमकं उत्तर सरकार देईल असं वाटत नाही. कारण कथनी आणि करणीमध्ये तारतम्य नसलेली त्यांची संस्कृती होय. एकिकडे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून 'वन नेशन वन इलेक्शन' च्या वल्गना करायच्या आणि हरियाणा आणि जम्मू काश्मीरसोबत महाराष्ट्राच्या निवडणुका न घेता निवडणुका पुढे ढकलायच्या ! ढकला.. ढकलून ढकलून किती दिवस पुढे ढकलणार ? लाडक्या बहिणींचा धावा करणाऱ्यांना कदाचित अजून समजलं नाही की त्या अत्यंत जागृत असून त्यांना त्यांच्या मताचं मूल्य चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि हो...मदत,हक्क आणि उपकार यातील फरक ते लीलया जाणतात आणि कृती विचारपूर्वकच करतात ! दिसेलच ते आता येत्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये.

अंमली पदार्थ २ किलो गांजा विक्री करण्यास आलेल्या २ इसमांच्या मुसक्या आवळण्यात डोंबिवली पोलिसांना यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउपनि केशव हासगुळे व अंमलदार हजर असतांना पोहवा. विशाल वाघ यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारने माहीती दिली की, दिनांक १६/०८/२०२४ रोजी २०:०० वा. ते २१:०० वा. दरम्यान दोन इसम नामे १) साहील लक्ष्मण बोराडे रा. साबेगाव, जिवदानी नगर, दिवा पूर्व २) प्रकाश गंगाधर जाधव, रा. सावेगाव, दिवा पूर्व हे सुका गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी नेहरू रोड, डोंबिवली पूर्व येथे येणार आहे. सदर खबरीबाबत मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे यांना माहीती दिली.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सपोनि अच्युत मुपडे यांनी बातमीच्या अनुषंगाने नेहरू रोड, डोंबिवली पूर्व येथे जावुन दोन पथक तयार करून सापळा रचला प्राप्त खबरीतील वर्णनाचे दोन इसम नेहरू रोडचे बाजुकडुन येताना दिसले, त्यातील एक इसम हातात कशाने तरी भरलेला एक कागदी बॉक्स घेवुन क्लॉथ सेंटरचे बोळीत पायी चालत येत असल्याचे दिसले. तेव्हा पोलीस पथकाने त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवले असता प्राप्त खबरीतील इसम तेच दोघे असल्याची खात्री झाल्याने सपोनि. मुपडे व पथकाने त्यांना चोहोबाजुनी घेराव घालुन पळण्याची संधी न देता २०:५० वाजता त्यांचे जवळील कागदी बॉक्ससह जागीच अटकावुन ठेवले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता प्राप्त खबरीप्रमाणे आपले नाव पत्ता सांगितले, त्यानंतर साहील लक्ष्मण बोराडे याच्या कडील बॉक्स उघडुन पाहीला असता त्यात प्लास्टीक पिशव्याच्या वेगवेगळया पाकिटामध्ये काळया हिरव्या रंगाचा सुका पानासारखा पदार्थ दिसुन आला. सदर बाबत दोघांणकडे विचारणा केली असता, त्यांनी गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे सांगितले. तेव्हा सपोनि मुपडे यांनी पंचां समक्ष सोबत आणलेल्या इलेक्ट्रीक वजन काटयाचे सहायाने गांजा या पदार्थाचे वजन केले असता तो एकुण वजन २ किलो ६३८ ग्रॅम (कागदी बॉक्स व प्लॅस्टीक पिशवीसहीत) किंमत २५,०००/- रूपये असल्याचे आढळुन आले. सदर इसमांना व गांजा हा अंमली पदार्थ ताब्यात घेवुन त्यांचे विरूध्द डोंबिवली पोलीस ठाणे गु.रजि नं. ७९७/२०२४ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क) व २० (ब) प्रमाणे दिनांक १७/०८/२०२४ रोजी ००.४७ वा. गुन्हा दाखल करून सदर इसमांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि. हासगुळे हे करत असुन या दोघांचा मा. न्यायालयाकडुन सदर आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेला आहे.
सदरची कारवाई मा. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण, मा. सुहास हेमाडे सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. गणेश जवादवाड, पोनि. पंकज भालेराव, सपोनिरी. अच्युत मुपडे, पोउनि. केशव हासगुळे, पोहवा. विशाल वाघ, सचिन भालेराव, दत्तात्रय कुरणे, प्रशांत सरनाईक, शेखर कोळी, पोना. शरद रायते, दिलीप कोती, पोशि. सुनिल शिंदे, मंगेश वीर, निलेश पाटील यांनी केली आहे.