BREAKING NEWS
latest

शिंदे शिवसेना गटाला धक्का देत दीपेश पुंडलिक म्हात्रे यांचा शिवसेना उबाठा गटात पक्षप्रवेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आज कल्याण-डोंबिवली माजी स्थायी समिती सभापती तसेच शिवसेना शिंदे गटातील महाराष्ट्र राज्याचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उबाठा शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. 
                                     
मातोश्री वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन  बांधून पक्षप्रवेश केल्यानंतर ते डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरील शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करून ते बाजीप्रभू चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते उबाठा गटाचा कार्यालयात गेले व तेथे फटाक्यांची आतिषबाजी करत घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला. त्यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात डोंबिवलीतील शिंदे सेनेचे आणखी काही पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेणार असल्याची कुजबुज सुरू आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवरील वर्दळीच्या ठिकाणची हटवली उपहारगृहे..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन या रेल्वे स्थानकातील फलाटांवरील प्रवासी गर्दीला अडथळा ठरणारी उपहारगृहे हटविण्यात आली आहेत. ही उपहारगृह रेल्वे स्थानका बाहेरील रेल्वेच्या हद्दीत तिकीट खिडकीजवळ, फलाटांच्या एका बाजुला स्वच्छतागृहांजवळ स्थलांतरित करण्यात आली आहेत. ही उपहारगृह हटविण्यात आल्याने प्रवाशांची कुचंबणा होऊ लागली आहे.

मध्य रेल्वे स्थानकावरील डोंबिवली सर्वाधिक प्रवासी गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या फलाटावर मागील अनेक वर्षापासून रेल्वेच्या परवानगीने प्रवाशांच्या खानपान सेवेसाठी उपहारगृहे सुरू होती. ही उपहारगृहे जिन्यांच्या मार्गात यापूर्वी उभारण्यात आली होती. जुन्या काळात उभारण्यात आलेली ही उपहारगृहे फलाटावरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे आता अडथळा ठरू लागली होती.

डोंबिवली रेल्वे स्थानकात स्कायवाॅकचे आधारखांब, पुलाचे लोखंडी सांगाडे यांची गुंतागुंत आहे. हे सगळे अडथळे अगोदरच असताना, डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांवरील उपहारगृहे सकाळ, संध्याकाळच्या वेळेत प्रवासी गर्दीला अडथळा ठरू लागली होती.

डोंबिवली स्थानकातील प्रवाशांची वाढती गर्दी विचारात घेऊन प्रवाशांना रेल्वे स्थानकातील फलाटांवर सुटसुटीतपणे जाता यावे. उभे राहता यावे या विचारातून मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी केली. या पाहणीच्यावेळी या स्थानकातील उपहारगृहे ही प्रवाशांच्या येण्याच्या जाण्याच्या मार्गात आणि गर्दीच्या वेळेत अडथळा ठरत असल्याचे दिसून आले होते. अधिकाऱ्यांनी फलाटावरील उपहारगृहे रेल्वे स्थानकालगतच्या रेल्वेच्या जागेत रेल्वे तिकीट खिडक्यांजवळ व फलाटाच्या एका बाजुला स्वच्छतागृहांजवळ प्रवासी वर्दळ नसलेल्या भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाप्रमाणे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोन, तीन आणि पाच वरील उपहारगृहे अन्य भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला. उपहारगृह चालकांना त्यासंबंधी नोटिसा देऊन महिनाभराची मुदत देण्यात आली. उपहारगृह चालक मे. एस. एच. जोंधळे केटरिंग लायसन्स, मे. ए. एच. व्हिलर यांनी रेल्वे प्रशासनाकडे उपहारगृह हटविण्यासंबंधी मुदत वाढून देण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने ही मागणी फेटाळली. विहित वेळेत उपहारगृह स्थलांतरित केली नाहीतर कारवाई करण्याचा इशारा दिला.

त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांंक दोनवरील उपहारगृह फलाटावरील कल्याण बाजुला स्कायवॉकखाली, पाचवरील उपहारगृह रामनगर रेल्वे तिकीट खिडकीजवळ स्थलांतरित करण्यात आली आहेत. ही उपहारगृहे स्थलांतरित करण्यात आल्याने प्रवाशांची मात्र गैरसोय होऊ लागली आहे. नवीन जागेत स्थलांतरित करण्यात आलेली स्वच्छतागृहे एका बाजुला आणि प्रवासी वर्दळीपासून दूर असल्याने ग्राहक येत नाहीत. स्वच्छतागृहाजवळील दुर्गंधीमुळे उपहारगृहाकडे प्रवासी फिरकत नाहीत, अशा तक्रारी चालक करू लागले आहेत.

ई-केवायसी न केल्यास आता रेशन होणार बंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : देशातील नागरिकांना केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे. ज्यामध्ये बहुतांश गरीब गरजू लोकांचा सामावेश आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन मिळते. दरम्यान, आता केंद्र सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी नवीन नियमावली लागू केली असून, शिधापत्रिकेची ई-केवायसी केली नाही, तर १ नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार आहे. 

कमी किमतीच्या रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांकडे शिधापत्रिका असणे खूप आवश्यक आहे. आता सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून रेशन बंद होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिका धारकांसाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच जारी होती. मात्र अनेक शिधापत्रिका धारकांची अवस्था अशीच आहे. ज्यांनी ई-केवायसी प्रकिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई-केवायसी करण्याकरिता ३१ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. शिधापत्रिकाधारकाने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रकिया पूर्ण न केल्यास त्याला पुढचा महिना रेशन मिळणार नाही. अशा शिधापत्रिका धारकांची नावेही शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत. ई-केवायसी नसलेल्या शिधापत्रिका रद्द केल्या जातील. यानंतर या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही. असे स्पष्ट सूचित करण्यात आले आहे. हयात नसलेल्यांची नावे वगळली जाणार रेशनकार्डवर बरीच नावे अशी आहेत, जे हयात नाहीत. त्यामुळे ती नावे वगळली जाणार आहेत. त्यामुळे आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजेच कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदलेली आहेत, या सर्वांना ई-केवायसी प्रकिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी ते त्यांच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात. कोणत्याही सदस्याने ई-केवायसी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाणार आहे.

एलपीजी गॅस सिलेंडर आता 'ओटीपी' शिवाय मिळणारच नाही..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : एलपीजी कंपनीद्वारे आता ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मोबाइलवर येणारा ओटीपी सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या घरी सिलेंडर येईल, तेव्हा ओटीपी सांगावा लागेल. तेव्हाच गॅस सिलेंडर मिळेल व डिलिव्हरी यशस्वी होईल. तुम्ही ज्या मोबाईलवरून सिलेंडर बुक केले आहे, तो मोबाईलधारक घरी नसेल तर घरच्यांची तारांबळ उडू शकते. त्यामुळे यापुढे गॅस सिलेंडर घेताना जरा नियोजन करावं लागेल. त्यासाठी आधीच गॅस बुकिंग निश्चित झाल्याचा मेसेज घरातील इतरांनाही पाठवून ठेवावा लागणार आहे.

आजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरसाठी जशी बुकिंग करत होता, यापुढेही त्याच पद्धतीने फोनवरूनच बुकिंग करावं लागणार. मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी गरजेचा असणार आहे. मात्र असे असले तरी या नव्या नियमाने ग्राहकांची चांगलीच अडचण निर्माण होणार आहेत.

घरगुती वापराचा सिलेंडर बुक केल्यावर काही दिवसांनंतर एजन्सीचे कर्मचारी तो घरपोच करतात अशी सध्याची पद्धत आहे. मात्र यात आता महत्वाचा बदल होणार आहे. ओटीपीशिवाय सिलेंडरची होम होम डिलेवरी होणार नाही. यापूर्वी पण हा नियम होताच. परंतू तो आता अनिवार्य करण्यात आला आहे. सिलेंडर ऑनलाईन बुक केल्यावर ग्राहकांच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, गॅस एजन्सीचा कर्मचारी सिलेंडरची डिलेव्हरी करण्यासाठी घरी आल्यावर ग्राहकांना हा ओटीपी दाखवावा लागेल. अन्यथा ग्राहकांना सिलेंडर मिळणार नाही.

गॅस सिलेंडर बुकींग व डिलिव्हरीची नवीन प्रक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅसची बुकींग करण्यावरच आता ही प्रक्रिया थांबणार नाही. बुकींग नंतर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल. ज्यावेळी सिलेंडर डिलिव्हरी बॉय घरी देण्यास येईल, तेव्हा त्या व्यक्तीसोबत ग्राहकांनी हा ओटीपी शेअर करणं अपेक्षित असेल. ग्राहकांचा मोबाईल नंबर अपडेट नसल्यास डिलीव्हरी पर्सन ऍपच्या माध्यमातून रिअल टाईम अपडेटही करु शकणार आहे. म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी त्या ऍपच्या साह्याने तुम्ही मोबाईल नंबर डिलिव्हरी बॉयच्या सहाय्यानं अपडेट करु शकाल. ऍपच्या माध्यमातून रिअल टाईम बेसिसवर मोबाईल क्रमांक अपडेट होईल. त्यानंतर त्याच क्रमांकावर कोड जनरेट करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. हा नवा बदल कसोशीने अंमलात आणल्या जाणार आहे.

सिलेंडर वितरकांचे म्हणणे काय ?

ही नवी प्रक्रिया डोकेदुखी ठरणार असल्याचे म्हटले जाते. कारण नोंदणी करणारा मोबाईलधारक घरी नसल्यास डिलिव्हरी बॉय गॅस सिलेंडर देणार नाही. अनेकांचे मुले घराबाहेर असतात. ते बुकिंग करीत पैसे भरून टाकतात. पण घरी जर वृद्ध आई-वडीलांस ओटीपी सांगता आला नाही तर सिलेंडर मिळू शकणार नाही. पण ही सिस्टीम डोकेदुखीची ठरणार असल्याचे आम्ही वितरकांनी कंपन्यांना कळविले होते. पण काळानुरूप लोकं जुळवून घेतील. तक्रारी टप्प्या टप्प्यात दूर होतील. त्रास होवू नये, याची काळजी घ्या. मुख्य म्हणजे या पद्धतीबाबत जागरुकता आवश्यक आहे. तसेच गॅस जोडणी असणाऱ्या कुटुंबाने वितरकाकडे अधिकृत एकच नंबर नोंदवावा. कारण एका नंबरवर नोंदणी झाल्यास त्यावरून एक महिना झाल्याशिवाय दुसऱ्यावेळी सिलेंडर मागणी करता येणार नाही.

थायलंड देशातून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या मुलींची सुटका करून खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी केला वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहर परिसरात थायलंड देशातील महिलांना वेश्यागमनासाठी तयार करून चांगल्या आर्थिक प्राप्तीचे अमिष दाखवुन परदेशातुन बोलावुन घेवुन त्यांचेकडून सेक्शन १७, उल्हासनगर-३, येथील 'सितारा लॉजींग ऍंड बोर्डिंग' येथे  वेश्याव्यवसाय करवुन घेत असल्याची बातमी खंडणी विरोधी पथकास गुप्तरीत्या मिळाली होती.
सदर बातमीचे आधारे खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. नरेश पवार व पथकाने दिनांक ०२/१०/२०२४ रोजी सेक्शन १७, उल्हासनगर-३ येथे ०१:१० वा 'सितारा लॉजींग ऍंड बोर्डिंग' येथे बनावट ग्राहक पाठवून छापा घातला असता, सदर लॉजमध्ये मॅनेजर नामे कुलदिप उर्फ पंकज जयराज सिंग (वय: ३७ वर्षे), राहणार, सितारा लॉजींग ऍंड बोर्डिंग, सेक्शन नंबर १७, उल्हासनगर नंबर ३ याच्यासह चार कामगार यांना ताब्यात घेवुन १५ थाई बळीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. सदर छापा कारवाई दरम्यान नमुद लॉज मधून ५,२७,०००/- रूपये रोख व साधने जप्त करण्यात आली आहेत.
सदर 'सितारा लॉजींग ऍंड बोर्डिंग'चे मॅनेजर व तेथे काम करणारे ४ कामगार यांच्या विरुद्ध उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता १४३ (१), १४३(३) सह अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ प्रमाणे दिनांक ०२/१०/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध - २. गुन्हे शाखा, ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध- १. गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. नरेश पवार, सपोनि. सुनिल तारमळे, पोउपनिरी. विजयकुमार राठोड, सुभाष तावडे, पोहवा. संजय राठोड, सचिन शिंपी, मपोहवा. शितल पावसकर, चापोना. भगवान हिवरे, पोशि. तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, यांच्या पथकाने यशस्वीपणे केली आहे.