BREAKING NEWS
latest

डोंबिवलीच्या रोटरी भवन मध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट वर "घर से ऑफिस तक, दिल से दिमाग तक" शिर्षकाखाली सेमिनार संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.१३ : डोंबिवलीसारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नगरीत रोटरी जिल्ह्यातर्फे 'आयएमए' संघटनेच्या सहकार्याने रोटरी भवन येथे काल दि.१३.१०.२०२४ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत 'स्ट्रेस मॅनेजमेंट' या विषयावर "घर से ऑफिस तक, दिल से दिमाग तक" शिर्षकाखाली सेमिनार चे आयोजन करण्यात आले.
यावेळी या विषयावर चर्चा करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) संघटनेचे मानसोपचार तज्ञ केईएम इस्पितळाचे एमबीबीएस, एमडी डॉ. दुष्यंत भादलीकर आणि 'मनोबल' नेरोसायकॅट्रिक सेंटर चे डायरेक्टर डॉ. विजय चिंचोले हे 'स्ट्रेस मॅनेजमेंट' वरील "घर से ऑफिस तक, दिल से दिमाग तक"  या विषयावर आपले मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापनाचे महत्व सांगण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सेमिनार चे प्रमुख वक्ते होते.
कार्यक्रमाला राष्ट्रगीताने सुरुवात करत रोटरीचे अध्यक्ष माधव सिंग यांनी प्रथम रोटरीचे जिल्हा गव्हर्नर दिनेश मेहता यांनी संधी देऊन या महत्त्वाच्या 'स्ट्रेस मॅनेजमेंट' या विषयावर डोंबिवलीत सेमिनार भरवण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे प्रथम आभार मानले व म्हणाले की 'रोटरी इंटरनॅशनल'ने मानसिक आरोग्याच्या जनजागृतीचे महत्त्व ओळखले आहे, विशेषतः आपल्या कामाच्या ठिकाणी. २०२४ मध्ये, रोटरी अधिकाधिक मानसिक कल्याण आणि कामाच्या ठिकाणी ताण व्यवस्थापनाच्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करीत आहे. यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या (१० ऑक्टोबर) थीमचे शीर्षक आहे "कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य".
ही थीम महत्त्वाची आहे कारण ती कामाच्या ठिकाणी वाढत्या ताण, बर्नआउट आणि इतर मानसिक आरोग्य समस्या यावर प्रकाश टाकते. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स आणि जपान यांसारख्या देशांनी आधीच कामाच्या ठिकाणी ताण कमी करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. रोटरी इंटरनॅशनल देखील "ताण व्यवस्थापन, काम, जीवन आणि रोटरी सेवा यामधील संतुलन साधा" अशा कार्यशाळांचे आयोजन करत आहे, ज्यामुळे रोटेरियन ताण व्यवस्थापन करतात आणि बर्नआउट टाळू शकतात.
जिल्हास्तरीय पातळीवर, जिल्हा गव्हर्नर दिनेश मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी दोन प्रमुख मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापन विषयक सेमिनारचे आयोजन करीत आहेत. हे सेमिनार आज ठाणे आणि डोंबिवलीत होत आहेत. हे सेमिनार तणावाच्या मूळ कारणांची समज आणि त्यावर प्रभावी उपाय शिकण्याचे मार्गदर्शन करतात.
स्थानिक पातळीवर, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट मानसिक आरोग्य आणि ताण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे. पुढील चार ते पाच महिन्यांत, आम्ही विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी, कामकाजी व्यावसायिकांसाठी आणि गृहिणींसाठी दोन मोठे सेमिनार आयोजित करणार आहोत असेही अध्यक्ष माधव सिंग म्हणाले.
या सर्व प्रयत्नांमुळे, रोटरी इंटरनॅशनल, आमचा जिल्हा, आणि आमच्या क्लबनी मानसिक आरोग्याच्या सुधारणेसाठी घेतलेल्या पुढाकाराचे महत्त्व दिसून येते. मी सर्वांना या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. एकत्र येऊन, आपण आपले, आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या समाजाचे आरोग्यदायी भविष्य निर्माण करू शकतो.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डी.ए.एफ.एस.सी टीआरएफ जिल्हा चेयरमन चंद्रहास शेट्टी, रोटरी अध्यक्ष माधव सिंग, आयएमए अध्यक्ष डॉ. शरद गुरव, सेक्रेटरी चंद्रापाणी शुक्ला, प्रमुख वक्ते मानसोपचारतज्ञ डॉ. विजय चिंचोले, डॉ. दुष्यंत भादलीकर, हेमंत मुंडके तसेच रोटोरियन लीना लोकरस, पुष्पा वैद्य, आरती धुत, गायत्री श्रीनिवासन, अनुज यादव, रिजेन्सी अनंतम रोटरी चे भगवान राघव, रोटोरियन डॉ. राजेश विनायक कदम, निलेश नेमाडे, जितेंद्र नेमाडे, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्व, पश्चिम, हेरिटेज, रिजेन्सी अनंतम, सनसिटी, अपटाऊन, सौदामिनी, मिडटाऊन, विनर्स, डाऊनटाऊन, सिटी, डायमंड, इंडस्ट्रियल एरिया तसेच न्यू डोंबिवली रोटरी चे पदाधिकारी या सेमिनार ला उपस्थित होते.
यावेळी डॉ. विजय चिंचोले यांनी घरी व कामाच्या ठिकाणी आणि आपल्या आरोग्यावर तणाव कश्या प्रकारे असू शकतात व त्यावर तुम्ही कश्या प्रकारे मात करू शकता यावर उत्तम मार्गदर्शन केले. तर डॉ. दुष्यंत भादलीकर यांनी स्वतः प्रात्यक्षिक करत उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत तुमचा ताण हा तुम्हीच दूर करू शकता हे त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना पटवून दिले आणि चला आपण प्रथम मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊया असे सांगत सर्वांना धन्यवाद दिले.

राज्य सरकारने केंद्र सरकारला उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा पाठवला विनंती प्रस्ताव..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : एक दानशूर व्यक्तिमत्त्व उद्योगपती रतन टाटा हे ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने पडद्याआड झाल्याने राज्य सरकारने शासकीय शोक जाहीर करत रतन टाटा यांचे भारताच्या विकासासाठी केलेले कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना 'भारतरत्न' देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात येणारा प्रस्तावही काल संमत करण्यात आला.

उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री (९ ऑक्टोबर) निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. राज्यात आज (१० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला. दरम्यान राज्य मंत्रिमंडळाची  महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव मांडला. यानंतर ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना 'भारतरत्न' देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात येणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.

यावेळी शोकप्रस्तावात त्यांनी म्हटलं आहे की, ”उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो. मात्र, त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते महाराष्ट्राचे सुपुत्र होते. भारताचा अभिमान होते. स्वयंशिस्त, स्वच्छ कारभार आणि मोठमोठे उद्योग सांभाळताना पाळलेली उच्च प्रतीची नैतिक मूल्ये या कठोर कसोट्या पार पाडत रतन टाटा यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आणि भारताचाही ठसा उमटवला. त्यांच्या रुपाने देशाचा एक प्रमुख आधारस्तंभ कोसळला आहे. टाटा समुहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पणतू होते. टाटा समुहाचे अध्यक्ष म्हणून आणि नंतर अंतरिम अध्यक्ष म्हणून या समुहाचा कारभार अनेक वर्ष पाहिला. देशातल्या सर्वात जुन्या अशा टाटा समुहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख म्हणून अतिशय परोपकारी वृत्तीने त्यांनी काम पाहिलं.”

ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री यांनी बैठकीत शोकप्रस्ताव मांडला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा प्रस्ताव ही संमत करण्यात आला. “टाटा यांनी नैतिक मूल्यांची जी जपणूक केली, ती इतर उद्योजकांसाठी आणि उद्योगविश्वातील भावी पिढ्यांसाठीही दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरतील. ते तत्त्वनिष्ठ कर्मयोगी होते. स्वातंत्र्यानंतर देशाची पुन्हा उभारणीत टाटा समूहाचा वाटा सिंहाचा होता. या समूहाच्या माध्यमातून रतन टाटा यांनी भारताचा झेंडा जागतिक पातळीवर दिमाखाने फडकता ठेवला. मोटारीपासून मिठापर्यंत आणि कंप्युटरपासून कॉफी-चहापर्यंत असंख्य उत्पादनांशी टाटा हे नाव अभिमानाने जोडले जाते. शिक्षण,आरोग्य आणि समाजसेवेच्या क्षेत्रातही रतन टाटा यांनी आपले अनन्यसाधारण योगदान दिले. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर त्यांनी दाखवलेला खंबीरपणा स्मरणात राहणारा आहे. कोविड काळात रतन टाटा यांनी 'पीएम रिलीफ फंड'ला तत्काळ १५०० कोटी रुपये दिले. तसेच कोविड काळात रुग्णांसाठी त्यांची बहुतांश हॉटेलही उपलब्ध करून दिली. हा त्यांचा मोठेपणा कायम लक्षात राहणारा आहे. नवनिर्मिती आणि दानशूरता यांचा अपूर्व संगम त्यांच्या ठायी होता. त्यांनी कधीही आपल्या ‘टाटा मूल्यां’शी तडजोड केली नाही.”

“तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. गडचिरोली सारख्या दुर्गम भागात तरुणांच्या कौशल्याला वाव आणि रोजगाराची संधी देण्यासाठी त्यांनी 'इनोव्हेशन सेंटर' सुरू केले. महाराष्ट्र सरकारचा पहिला ‘उद्योग रत्न’ हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाचा अनुभव महाराष्ट्राला सदैव झाला. रतन टाटा यांच्या निधनाने आपला देश आणि महाराष्ट्राचेही कधीही भरुन न येणारे नुकसान झाले आहे. टाटा समूहाच्या विशाल परिवाराच्या दुःखात मंत्रिमंडळ सहभागी आहे. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो, ही प्रार्थना. देशाच्या या महान सुपुत्राला महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या वतीने राज्य मंत्रिमंडळ भावपूर्ण श्रद्धांजली”, असं राज्य मंत्रिमंडळाच्या शोकप्रस्तावात म्हटलं.

आयरेगावातील बेकायदा 'साई रेसिडेन्सी'वर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचा हातोडा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: आयरेगावातील बेकायदा 'साई रेसिडेन्सी'वर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून महापालिकेने  कारवाई करत हातोडा मारला. जेसीबी, पोकलेन, स्लॅब तोडणाऱ्या क्रॅकर सयंत्र तोडकाम यंत्रणा तैनात करत ही तोडक कारवाई करण्यात आली.

डोंबिवली येथील पूर्व भागातील आयरे जलकुंभा शेजारील 'साई रेसिडेन्सी' या बेकायदा इमारतीवर बुधवारपासून कल्याण-डोंबिवली पालिकेच्या 'ग' प्रभागाच्या तोडकाम पथकाने भुईसपाट करण्याची कारवाई केली. मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या दोन महिन्यापूर्वी ही बेकायदा इमारत तोडण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्याने रहिवाशांच्या मागणीवरून न्यायालयाने या कारवाईला ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली होती.

उच्च न्यायालयाच्या तोडकामाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका 'साई रेसिडेन्सी' मधील रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांची मागणी मान्य न करता त्यांची याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांना कोणताही दिलासा न दिल्याने बुधवारपासून 'ग' प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, सहाय्यक अभियंता शिरिषकुमार नाकवे, रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांच्या उपस्थितीत तोडकाम पथकाने बुधवारी दुपारी 'साई रेसिडेन्सी' तोडण्याची कारवाई सुरू केली. जेसीबी, पोकलेन, स्लॅब तोडणाऱ्या क्रॅकर सयंत्र तोडकाम यंत्रणा तैनात करण्यात आली होती. ही इमारत रहिवाशांनी स्वतःहून पालिकेला रिकामी करून दिली.

आयरेगावातील भीम राघो पाटील, कलावती तुकाराम पाटील, प्रसाद तुकाराम पाटील, प्रशांत तुकाराम पाटील, सुरेखा नाना पाटील आणि 'साई रेसिडेन्सी डेव्हलपर्स' या भूमाफियांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता, शासनाचा महसूल बुडवून या बेकायदा इमारतीची उभारणी केली आहे. पाटील कुटुंबीयांमधील स्नुषा उज्वला यशोधन पाटील यांचा वारसाहक्कातील हक्क डावलल्याने त्यांनी पालिकेकडे दोन वर्ष या बेकायदा इमारतीवर कारवाईसाठी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल पालिका अधिकाऱ्यांनी न घेतल्याने उज्वला पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात 'साई रेसिडेन्सी' इमारत तोडण्यासाठी एक याचिका दाखल केली होती. दोन महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाचे न्या. महेश सोनक, न्या. कमल खाता यांनी 'साई रेसिडेन्सी' इमारत बेकायदा असल्याने ती जमीनदोस्त करण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिले होते.

ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस असल्याने रहिवाशांच्या विनंतीवरून न्यायालयाने ३० सप्टेंबरपूर्वी ही इमारत रहिवाशांना रिकामी करून पालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. तरीही रहिवाशांंनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला, रहिवाशांची याचिका फेटाळून लावली. नांदिवली पंचानंद येथील 'राधाई' बेकायदा इमारतीवर भुईसपाट होणारी 'साई रेसिडेन्सी' ही डोंबिवलीतील तिसरी इमारत आहे. यापूर्वी मानपाडा रस्त्यावरील गावदेवी मंदिराजवळील बेकायदा इमारत महापालिके कडून जमीनदोस्त करण्यात आली होती.

बेकायदा 'साई रेसिडेन्सी' इमारत उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कडोंपा आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तोडण्याची कारवाई बुधवारपासून सुरू केली आहे. या इमारतीचे पहिले स्लॅब क्रॅकरने तोडून मग शक्तिमान कापकाम यंत्राने ही इमारत जमीनदोस्त केली जाईल असे डोंबिवली 'ग' प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत  यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

डोंबिवली रेल्वे स्थानकाचे काया पलटाने स्टेशन ऐतिहासिक बनेल - बांधकाममंत्री श्री. रवींद्र चौहान

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि. ११ : डोंबिवली पश्चिमेच्या रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. पश्चिम व पूर्व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणाचे उद्घाटन राज्याचे बांधकाममंत्री श्री. रवींद्र चौहान यांच्या हस्ते शुक्रवारी संपन्न झाले.
यापूर्वी रेल्वे स्थानक परिसरात अनेक अतिक्रमणे होती, बेकायदेशीर लॉटरी बुथ होते, घाणीचे साम्राज्य होते. डोंबिवलीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या नामवंत साहित्यिक आणि कलाकारांच्या शिलालेखांनी रस्त्यावरील रेल्वे स्थानकाकडे जाणारी भिंत सजलेली आहे. या रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणामुळे डोंबिवली शहरातील नागरिकांमध्ये आनंदाची भावना पसरली असून हे शहर ऐतिहासिक होणार आहे. 
यावेळी मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनीही उपस्थित नागरिकांना संबोधित करताना शहरातील विकास कामांची माहिती दिली. व्यासपीठावर सभापती नाना सूर्यवंशी, माजी सभापती शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक  शैलेश धात्रक, विकास म्हात्रे, मंदार हळबे, मुकुंद (विशु) पेडणेकर, विश्वदीप पवार, पूनम पाटील, वर्षा परमार  आदी मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.