BREAKING NEWS
latest

बाळा नर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर व्हिडिओद्वारे खुलासा!



प्रतिनिधी: सलाहुद्दीन शेख

जोगेश्वरी विधानसभा १५८ ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांच्या कुटुंबावर घाला घालणाऱ्या खोट्या आरोपांवर संदिप दत्ताराम नारकर यांनी मोठा खुलासा केला आहे. संदिप नारकर, जे बाळा नर यांच्या भाचांपैकी एक आहेत, यांनी एका व्हिडिओद्वारे स्पष्ट केलं की काही लोकांनी राजकारणाच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा धक्क्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

संदिप नारकर यांची टिप्पणी: संदिप नारकर यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की, काही लोकांनी त्यांच्या कुटुंबावर केलेल्या आरोपांचे कोणतेही तथ्य नाही. "हे सर्व खोटे आरोप आहेत. जर कुणाला वाटत असेल की त्यांच्यावर अत्याचार झाला आहे, तर त्यांनी आमच्याशी समोपचाराने संवाद साधावा," असं ते म्हणाले.

संदिप नारकर यांनी स्पष्ट केलं की, या आरोपांचा मागोवा घेत असलेली राजकारणाची ही खेळी आहे. "राजकारणाच्या या खेळात काही लोक खोटे आरोप करत आहेत. मला विश्वास आहे की जोगेश्वरीची जनता सुजाण आहे आणि त्यांना बाळा नर यांच्या प्रतिमेबद्दल शंका नाही," असं ते म्हणाले.

मानसिक धक्का आणि हॉस्पिटल प्रवेश: संदिप नारकर यांनी सांगितलं की, या व्हिडिओमुळे त्यांच्या मामी लक्ष्मी अनंत नर यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. "हे सर्व कटकारस्थान असून एक अशा प्रकारचं धमकी देऊन पैशांची मागणी केली गेली," असं ते म्हणाले.

५ लाखांची मागणी आणि धमकी: संदिप नारकर यांनी खुलासा केला की, त्यांना धमकी देण्यात आली होती की, जर ५ लाख रुपये दिले नाहीत, तर हा व्हिडिओ वायरल केला जाईल. हे ऐकून त्यांच्या मामीला शॉक बसला आणि मानसिक ताण वाढला.

समाजसेवेतील बाळा नर यांचे योगदान: "३५ वर्ष समाजसेवा केली आहे. बाळा नर यांनी समाजसेवेच्या कामासाठी १००% वचन दिलं आहे. माझ्या मामीला माउली मानतात आणि ती त्यांच्या पाठीमागे संपूर्ण कुटुंब सांभाळते," असे संदिप नारकर म्हणाले.

उद्या फेसबुक लाईव्ह आणि पत्रकार परिषद: आमच्या कुटुंबाची एकजूट, उद्या फेसबुक लाईव्ह आणि इतर पत्रकारांद्वारे जोगेश्वरीच्या आणि महाराष्ट्राच्या जनते समोर यावं लागेल, जेणेकरून सत्य समोर येईल आणि या अन्यायाचा पर्दाफाश होईल.

भाजपचे माजी उत्पादन शुल्क मंत्री जगन्नाथ पाटील यांचा संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : शिवसेना (उबाठा) पक्षाचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. तर या भेटीवेळी दीपेश म्हात्रे यांनी त्यांचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल खिशात सुरु ठेवला होता, जेणेकरून मी काहीही चुकीचं बोललो असतो तर सर्वांना सांगितले असते, असा खळबळजनक दावा जगन्नाथ पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आहे. डोंबिवली येथे नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकत्यांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे दीपेश म्हात्रे यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात प्रवेश केला. निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने मात्र महायुतीच्या बंधनात अडकल्याने भाजपच्या पारंपरिक मतदारसंघ असलेला आणि भाजपचे रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत त्यांना निवडणूक लढविणे शक्य नसल्याने दीपेश म्हात्रे यांनी निवडणुका घोषित होण्याच्या काही दिवस आधीच मशाल हाती घेतली होती. यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून डोंबिवली विधानसभेसाठी अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली. तर दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात जोरदार प्रचार देखील सुरु केला आहे. तर काही दिवसांपूर्वी दीपेश म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. याभेटीबाबत जगन्नाथ पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता अनेक विषयांवर भाष्य केले आहे. काही दिवसांपूर्वी एका उमेदवाराने माझी भेट घेतली होती. तर या भेटी दरम्यान मला डोंबिवली विधानसभेची गणित समजावून सांगत होता. मात्र मी त्यांना सांगितले तुम्ही कितीही जोर लावला तरी या ठिकाणी तुला यश मिळणार नाही आणि येत्या २० तारखेच्या गणितात रवींद्र चव्हाण पास होतील, असे संभाषण झाल्याचे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले. तर संबंधित उमेदवाराने भेटीवेळी संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल खिशात सुरु ठेवला होता, जेणेकरून मी काहीही चुकीचं बोललो असतो तर सर्वांना सांगितले असते, असा खळबळजनक दावा जगन्नाथ पाटील यांनी दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता केला आहे.
डोंबिवली येथे पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात सर्व पदाधिकाऱ्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबोधित करून दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले. तर कल्याण लोकसभेतील सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असे मत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

राज्याच्या निवडणुक आयोगाकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तडकाफडकी बदली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवध्या १५ दिवस आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. पदरचनेतील शुक्ला यांच्या नंतरच्च्या सर्वात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. यानंतर मुख्य सचिवांनीदेखील तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनलला नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मुंबईचे आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. रश्मी शुक्लांच्या बदली आदेशांनंतर आता नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या आदेशांनुसार, तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचं पॅनल गठित करून त्यांच्याकडे नव्या नावाबाबतचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पॅनल आपला अहवाल राज्य सरकारला सादर करेल. त्यानंतर हा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला जाणार असून त्यानंतर नव्या पोलीस महासंचालकांच्या नावाची घोषणा केली जाईल.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम चालू असताना दुसरीकडे रश्मी शुक्ला यांच्या वदलीच्या आदेशांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून रश्मी शुक्लांना व त्यांच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात होतं. रश्मी शुक्ला यांच्यावर याआधीही देवेंद्र फडणवीसांच्या आदेशांनी विरोधकांचे फोन टॅप केल्याचे आरोप करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत संजय राऊत, नाना पटोले व इतर विरोधी नेत्यांकडून अजूनही फोन टॅपिंग केले जात असल्याचे आरोप रश्मी शुक्लांवर केले होते. त्यानंतर आता त्यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने जारी केल्यामुळे त्यावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करताना केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी रश्मी शुक्लांबाबतच्या प्रश्नावर अशा कारवाईसंदर्भात संकेत दिले होते. त्यावेळी रश्मी शुक्लांबाबत बोलताना 'यासंदर्भात योग्य तो तपास करून निर्णय घेतला जाईल', असं राजीव कुमार म्हणाले होते. त्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशांचं विरोधी पक्षांकडून स्वागत केलं जात आहे. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. झारखंड व पश्चिम बंगालच्या डीजीपींची बदली निवडणूक जाहीर झाल्यानंतरच केली होती. पण रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी इतके दिवस का लागले? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. पण आता रश्मी शुक्ला निवडणुकीशी संबंधित कोणत्याही व्यवस्थेत राहू नयेत, याची काळजी निवडणूक आयोगाने घ्यावी, अशी विनंती आमची निवडणूक आयोगाला असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवलीतून लेडीज स्पेशल आणि १५ डब्यांच्या लोकलगाड्या सोडण्यासाठी पुढाकार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना. रविंद्र चव्हाण हे आता चौथ्यांदा या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. आपण केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला कार्य अहवाल पत्रिकेच्या माध्यमातून त्यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकावर स्वतः नागरिकांमध्ये वाटला आणि विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी डोंबिवलीच्या स्थानिक नागरिकांनी आणि रेल्वे प्रवाशांनी त्यांच्याकडे लोकल प्रवासासंबंधित काही मागण्या केल्या. 
यावेळी रविंद्र चव्हाण यांनी नागरिकांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने डोंबिवली रेल्वे स्थानकासह कल्याणवरून १५ डब्यांची गाडी सोडण्याबाबत आणि डोंबिवलीतून लेडीज स्पेशल लोकलसुद्धा सोडण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. याबाबत चर्चा केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना संपूर्ण माहिती दिली गेली असून लवकरच सकारात्मक बदल घडवून आणू, असे आश्वासन दिले. स्व. रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांचे रेल्वे प्रवाशांसोबत अतूट नाते होते. डोंबिवलीच्या प्रवाशांसोबत नेहमी माझी चर्चा होत असते. त्यांच्या सर्व अपेक्षा आणि मागण्या मी वरिष्ठ पातळीवर पोहोचवणार आहे. या समस्या कशाप्रकारे सुटतील, यावर विशेष लक्ष देऊ असे प्रतिपादन रवींद्र चव्हाण यांनी केले.

शिवसेना ना उद्धवची ना एकनाथ शिंदेंची, ती आहे बाळासाहेबांची - राज ठाकरे

                              
प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मनसे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांच्यासाठी डोंबिवलीतील पी ऍण्ड टी कॉलोनीत झालेल्या प्रचार सभेत मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यावर निशाणा साधत मनसे सह सर्वच पक्षातील घाणेरड्या राजकारणावर सडकून टीका केली व घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्राला वाचवणं गरजेचं आहे असे म्हणत कोणत्याही पक्षापेक्षा महाराष्ट महत्वाचा असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी या प्रचार सभेत केलं.
                                  
शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू दे, भाजपा असू दे, मनसे असू दे की कोणताही राजकीय पक्ष. या सगळ्यांपेक्षा महाराष्ट्र हा  मोठा असून कोणताही पक्ष टिकला, नाही टिकला हे महत्त्वाचं नसून महाराष्ट्र हा टिकला पाहिजे, आताच्या या घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्राला वाचवणं फार  गरजेचं आहे, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर ताशेरे ओढले. डोंबिवलीच्या पी ऍण्ड टी कॉलनी येथे मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
                               
शिवसेना धनुष्यबाण चिन्ह ना उद्धवची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची, ती प्रॉपर्टी आहे बाळासाहेबांची असे खडसावत एका मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कार्यक्रमाच्या स्टेजवर लोकांची करमणूक म्हणून एका भोजपुरी महिलेनं नृत्य केल्याच्या प्रकाराबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ज्या महाराष्ट्राने अटकेपार झेंडे रोवले, ज्या महाराष्ट्राकडे एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं त्याच महाराष्ट्रात काही गोष्टी होतात. या गोष्टी तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होत असल्याचं सांगत हीच का लाडकी बहीण योजना ? असा संतप्त सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी या प्रकराकडे वैयक्तिक लक्ष घालण्याची सूचना केली. तसंच आपण आज केवळ आपल्याशी संवाद साधायला आलो असून पुन्हा १५ नोव्हेंबरला याच ठिकाणी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                                
कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार आणि उमेदवार राजू पाटील यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर तुफानी हल्ला चढवत त्यांनी या मतदारसंघात उमेदवार दिल्याने त्यांचे प्रथम आभार मानले. तसेच लोकसभा निवडणुकीला आपण केवळ राज ठाकरे यांनी आपल्याला सांगितल्यामुळेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मदत केली असा गौप्यस्फोट सुद्धा केला. यावेळी व्यासपीठावर त्यांचे बंधू रमेश रतन पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरध्यक्ष राहुल कामत, कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर, दीपिका पेडणेकर, मनोज घरत, अरुण जांभळे, योगेश पाटील, प्राजक्ता देशपांडे, अतुल जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या झालेल्या प्रचारसभेला उपस्थित होते.

"जय श्रीराम, भारत माता की जय" घोषणांच्या नारेबाजी करत मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे भव्य उदघाटन संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०३ : महायुतीचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा रविवारी रामनगर येथील बोडस मंगल कार्यालयाच्या आवरात करण्यात आला.
त्यावेळी महायुतीचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजेश मोरे, महापौर विनिता राणे, विश्वनाथ राणे, राजेश कदम, शशिकांत कांबळे, नंदू परब, पद्माकर कुलकर्णी, राहुल दामले, समीर चिटणीस, हरीश जवकर, नाना सूर्यवंशी, मंदार हळबे, जनार्धन म्हात्रे, संजय पावशे, श्याम नवरे, मोरेश्वर भोईर, दत्ता मळेकर, राष्ट्रवादी चे सुरेश जोशी, रा.स्व.संघ समन्वयक आशीर्वाद बोंद्रे, विंदा नवरे, डॉ. मिलिंद शिरोडकर, प्रज्ञेश प्रभुघाटे, संदीप पुराणिक, सुरेश पुराणिक, विनोद काळण, मनीषा राणे, पूनम पाटील, वर्षा परमार, खुशबू चौधरी, मनीषा छल्लारे, कविता गावंड, मितेश पेणकर, सिद्धार्थ शिरोडकर यांसह मान्यवर उपस्थित तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्याच मान्यवरांनी विजयी भव असे आशीर्वाद देऊन मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विजय ठाम असल्याचे म्हटले.
सातत्याने निवडणूक विषयात राज्यभर प्रवास करणाऱ्या मंत्री चव्हाण यांना इथली चिंता ठेवू नका असे म्हणत सगळ्यानी "जय श्रीराम" अशा घोषणा सुरू झाल्या. या घोषणांचा नाद विजयापर्यन्त घुमतच राहणार असे सांगताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून "रवी दादा आगे बढो"च्या घोषणा दिल्या.

मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची डोंबिवलीतील 'पी एन्ड टी' कॉलनी येथे प्रचाराची जाहीर सभा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.०४:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्रातील पहिली विधानसभा निवडणूक प्रचार सभा कल्याण - १४४ ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आज रोजी सायंकाळी ४ वाजता श्री महावैष्णव मारुती मंदिर,पी एन्ड टी कॉलनी चौक, डोंबिवली (पूर्व) येथे पार पडणार आहे. 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जाहीर सभेत काय परखड  बोलणार? कोणावर टीका करणार? महाराष्ट्रातील राजकारणावर काय बोलतील? याकडे सर्व राजकीय पक्षांचे नव्हे तर नागरिकांचेही लक्ष असते. राज ठाकरे यांची जाहीर सभा म्हणजे प्रचंड गर्दी होणार हे पोलीस यंत्रणेला माहित असल्याने सभेच्या एक दिवस अगोदर सभेच्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था वळविने, कडक पोलीस बंदोबस्त ठेवणे हे काम सुरु असते. सभेत मनसेचे कल्याण ग्रामीण उमेदवार प्रमोद (राजू) पाटील, कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरअध्यक्ष राहुल कामत, शहर अध्यक्षा मंदा पाटील, हर्षद पाटील, मनोज घरत, अरुण जांभळे, योगेश पाटील, राजेश म्हात्रे यासह माजी नगरसेवक व मनसैनिक उपस्थित राहणार आहेत. याआधी मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा डोंबिवतील डी एन सी मैदान व पश्चिमेकडील कान्होजी जेधे (भागशाळा) मैदान येथे पार पडली होती. 

या सभेतील नागरिकांची गर्दी ही इतर राजकीय पक्षातील नेते मंडळीच्या जाहीर सभे पेक्षा जास्त असून ती डोंबिवलीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. यावेळीही राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता आहे.