मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी रोजी झाला होता. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी स्वामी असे होते. मनोज कुमार यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. दिलीप कुमार हे त्यांचे आवडते अभिनेते. त्यांच्यावर दिलीप कुमार यांचाच प्रभाव होता. त्यांनी मनोज कुमार हे नाव धारण करण्यामागेही दिलीप कुमार हेच होते. शबनम या चित्रपटात दिलीप कुमार यांनी साकारलेल्या पात्राचे नाव मनोज कुमार असे होते. या चित्रपटात दिलीप कुमार यांनी साकारलेले मनोज कुमार हे पात्र त्यांना इतके भावले की त्यांनी स्वतःचे नाव मनोज कुमार असेच ठेवले. १९५७ साली शहीद या चित्रपटाद्वारे मनोज कुमार यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट खूप गाजला.या चित्रपटात त्यांनी साकारलेली भगतसिंग यांची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली.
देशभक्तीवर आधारित हा चित्रपट यशस्वी झाल्याने त्यांनी पुढे अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली. मनोज कुमार यांनी उपकार या देशभक्तीपर चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला जय जवान किसान… हा नारा त्यांनी या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. हा चित्रपट खूप गाजला या चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाली. मेरे देश की धरती… हे अजरामर गीत याच चित्रपटातले. उपकार नंतर त्यांनी पुरब और पश्चिम, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती, हिमालय की गोद मे असे देशभक्तीपर चित्रपट काढले हे सर्व चित्रपट खूप गाजले. या चित्रपटाद्वारे त्यांनी प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजविण्याचा प्रयत्न केला. मनोज कुमार यांनी आणि अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती केली म्हणून त्यांना "भारत कुमार' हे टोपण नाव पडले. त्यांनी निर्माण केलेले आणि अभिनय केलेले देशभक्तीवरील चित्रपट त्याकाळी खूप गाजले होते.
मेरे देश की धरती, सरफरोशी की तमन्ना, एक प्यार का नगमा है, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा.. अशी अनेक अजरामर गाणी मनोज कुमार यांच्यावर चित्रित झाली आहेत. आजही स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटातील गाणी आवर्जून वाजवली जातात. शोर, पत्थर के सनम, दो बदन, मेरा नाम जोकर हे त्यांनी अभिनय केलेले चित्रपट देखील खूप लोकप्रिय ठरले. मनोज कुमार यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. उपकार या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. २००५ साली त्यांना चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. १९९२ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले.
मनोज कुमार यांनी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने प्रेक्षकांमध्ये देशभक्ती रुजवणारा पडद्यावरील भारत कुमार काळाच्या पडद्याआड हरपला गेला असे म्हणावे लागेल. मनोज कुमार यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली !