BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'रामनवमी' सोहळा संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्ष नवमी तिथी म्हणजेच रामनवमी, रामजन्म. 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्रजी माध्यमिक शाळा आणि विद्यामंदिर मध्ये देखील रामजन्म सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नागपूर येथील उच्च शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक श्री. परशुरामजी भांगे, सौ. पुष्पा भांगे, संस्थेच्या खजिनदार जान्हवी कोल्हे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्वप्रथम विद्यार्थिनी इव्हा शॉ व रोमी शॉ या भगिनींनी राम स्तुती वर आधारीत 'ठुमक चलत रामचंद्र..' हे नृत्य सादर केले. इयत्ता पाचवी मधील अवंत या विद्यार्थ्याने श्रीरामाची गोष्ट सांगून माहिती दिली. इयत्ता चौथी मधील समायरा, जाई, आणि रूही या विद्यार्थिनींनी आपल्या शास्त्रीय नृत्यातून संपूर्ण रामायण सादर केले तर इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. सर्व मुले राम लक्ष्मण सीता, हनुमान, तसेच रामायण मधील इतर पात्र बनून आले होते. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गीत रामायण मधील 'नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू..'  हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गणित विषयाच्या शिक्षिका सौ. सुरुची पंड्या यांनी राम चरित मानस मधील पद गाऊन सर्वांना आनंद दिला. तर दुपारच्या सत्रात नाट्य विभागाचे शिक्षक नितेश मेस्त्री यांनी  'आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.. हे गीत सादर करून सर्वांच्या डोळ्यासमोर अयोध्येचे चित्र उभे केले.
पुत्र असावा तर रामासारखा, पती असावा तर रामासारखा, भाऊ असावा तर रामासारखा. श्रीरामा सारखा संयम, शत्रूलाही सुहास्य वदनाने नमविता आले पाहिजे अशा मर्यादा पुरुषोत्तमाचे गुण सर्वांमध्ये असले पाहिजेत, असे प्रमुख पाहुणे श्री. परशुरामजी भांगे यांनी रामनवमीच्या शुभेच्छा देताना सांगितले. तर चार युगांची माहिती देत कलियुगामध्ये देव आणि दानव हे कसे मानवाच्या अंतर्गत आहेत आणि त्या अंतर्मनावर मात करण्यासाठी श्रीरामाचे अंतर बाह्य अवलोकन करणे गरजेचे आहे असे खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी मुलांना सांगून श्रीरामसारखे निस्वार्थी प्रेम करा असेही सांगितले व शुभेच्छा दिल्या.
     
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे सध्या शैक्षणिक चर्चासत्रासाठी माउंट अबू येथे वास्तव्यास आहेत, तेथूनच त्यांनी दूरचित्र संभाषण द्वारे (व्हिडिओ कॉल) सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. रामासारखे चरित्र, निस्सिम बंधूप्रेम, आज्ञाधारक, प्रसंगी शत्रूलाही लढा देऊन क्षमा करणारा केवळ श्रीराम आहे, अशा श्रीरामसारखे कर्तुत्ववान व्हा असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे व डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले व सर्वांना पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. 
      
आजच्या दिवशी मधुबन वातानुकुलीत दालनामध्ये जणु काही अयोध्या सजली होती. श्री. नरेश पिसाट, अवधूत देसाई सर यांनी सर्व ठिकाणी भगवे पताके, फुलांच्या माळा, रांगोळ्या यांची भव्य दिव्य सजावट केली होती. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाल्यावर पाहुण्यांच्या हस्ते पाळण्या मध्ये श्रीरामाची मूर्ती ठेऊन, संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी 'राम जन्मला ग सखी..' हा पाळणा गाऊन राम जन्म सोहळा संपन्न झाला. तसेच रामाची आरती करण्यात आली. त्याच बरोबर चैत्र महिना म्हणजे चैत्र देवीचे नवरात्र, तुळजा भवानी देवीची पूजा करून आरती करण्यात आली. कलात्मक शिक्षक अभिषेक देसाई, प्रमोद पगारे, दीपा तांबे , रमेश वागे, सौ.मयुरी खोब्रागडे सौ. श्रेया कुलकर्णी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रमाची उत्तम तयारी करून राम जन्म सोहळा संपन्न केला.

खडकपाडा पोलीस ठाणे हद्‌दीतील अटाळी परिसरातील वृद्ध महिलेच्या खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : दिनांक २०/०३/२०२५ रोजी श्रीमती रंजना चंद्रकात पाटेकर (वय: ६० वर्षे), राहणार. सिद्धीविनायक चाळ, खापरीपाडा, अटाळी, आंबिवली कल्याण (पश्चिम) यांचा राहते घरी अज्ञात मारेकरी याने जबरी चोरी करून श्रीमती रंजना पाटेकर या वृध्द महिलेचा खुन केल्याबाबत वृद्ध महिलेचा भाचा श्री. हर्षल प्रेमाचंद पाटकर यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पो.स्टे. गु.रजि.नं. २५३/२०२५ भारतीय न्याय संहीता १०३(१) ३११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी बाबत काहीएक धागा दोरा नसताना तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यानी शिताफीने माहिती काढून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख, (वय; ३० वर्षे), राहणार. संतोषी माता नगर, नवनाथ कॉलनी, रूम न. १० आंविवली, कल्याण (पश्चिम) यांस मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे ताब्यात घेवुन आरोपी नामे चांद उर्फ अकबर शेख याच्याकडे शिताफीने व सखोल तपास करून सदर गुन्ह्यातील जबरी चोरी झालेला मुद्देमाल १,०५,०००/- रूपये किंमतीचा हस्तगत करून आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करून कौशल्यपूर्ण पध्द‌तीने गुन्हा उपडकीस आणलेला आहे.

गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख हा घटनास्थळाचे परिसरात राहण्यास असुन आरोपीस मोमोज विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे हवे असल्याने त्याने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने मयताचे घराची काही दिवसापासून रेकी करून घटनेच्या वेळी मयत श्रीमती रंजना पाटकर ह्या घरात एकटयाच असताना आरोपी याने मयत यांच्याकडे पिण्याचे पाणी मागितले, मयत पाणी आणण्यासाठी आत गेल्या असतां आरोपी याने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून हॉलमधील टिव्हीचा आवाज वाढविला, तदनंतर मयत ह्यांनी आरडा ओरडा करू नये म्हणून हाताने तोंड दाबुन जमीनीवर आपटून, गळा दाबुन जिवे ठार मारले, त्यानंतर मयताच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र, व कानातील सोन्याची कर्नफुले असा एकुण १,०५,०००/- रूपये किंमतीचा मु‌द्देमाल जबरी चोरी केला होता.

अटक आरोपी नामे चांद उर्फ अकबर महम्मद शेख यास यापुर्वी कोळशेवाडी पो स्टे. गु.रजि.नं. १२२/२०१४ भा.दं.वि.सं.कलम ३०२,२०१,४६०,३४ मध्ये आधारवाडी कारागृहात बंदी होता. आठ महिन्यापूर्वी सदर आरोपी हा कारागृहातून बाहेर येवुन मानेगांव अटाळी, कल्याण (पश्चिम) येथे राहण्यास होता. तदनंतर त्याने सदरचा गुन्हा केला असुन त्यास सदर जबरी चोरीसह खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सध्या तो खडकपाडा पोलीस ठाण्याच्या  पोलीस कोठडी मध्ये आहे.

सदर गुन्ह्यात अज्ञात मारेकरी यांचा कोणत्याही प्रकारचा धागा दोरा नसतांना खडकपाडा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मा. पोलीस आयुक्त श्री. आशुतोश डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. संजय जाधव, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३. कल्याण श्री. अतुल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग श्री. कल्याणजी घेटे यांनी तपासकामी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संदीप शिवले नेम. खडकपाडा पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कामगिरी खडकपाडा पोलीस ठाणे तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले. सपोनि. विजय गायकवाड, अनिल गायकवाड, पोउपनिरी. अर्जुन दांडेगावकर, सेपोउपनि. सुधीर पाटील, पोहवा. राजु लोखंडे, योगेश बुधकर, कुंदन भामरे, संदीप भोईर, विनोद कामडी, किरण शिर्के, संजय चव्हाण, ज्योती देसले, पोशि. ललीत शिंदे, महेश बगाड, राहुल शिंदे, अविनाश पाटील, अनंता देसले, सुरज खंडाळे, मनोहर भोईर, धनराज तरे यांनी यशस्वीपणे केली आहे.

दोन बलात्कारी गुन्ह्यातील रिल स्टार आरोपीस नाशिक येथुन खंडणी विरोधी पथक, ठाणे यांच्याकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : मानपाडा पोलीस स्टेशन गुरजिनं ३४१/२०२५ बीएनएस कायदा कलम ६४, ७४, ११५(२), ३५१(२), ३(५) सह आर्म ऍक्ट कायदा कलम ३,२५ व  टिळकनगर पोलीस स्टेशन गुरजिनं २६७/२०२५ भादंवि कलम ३७६ (२), (एन) ५०४, ५०६ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय: ५२ वर्षे), राहणार. चौधरी बिल्डिंग, २ रा माळा, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, बारा बंगला रोड, ठाकुर्ली, डोंबिवली (पुर्व) हा गुन्हे दाखल झाल्यापासुन फरार झालेला होता व सापडत नव्हता. सदर पाहीजे आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याचा गुप्त बातमीदारांकरवी शोध घेतला असता तो 'हॉटेल सेलीब्रेशन' जिल्हा नाशिक याठिकाणी लपुन बसला असल्याबाबत माहीती प्राप्त झाली होती.
सदर मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील यांस इंदीरानगर पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांच्या मदतीने खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी 'हॉटेल सेलीब्रेशन' जिल्हा नाशिक येथुन दिनांक ०४/०४/२०२५ रोजी सायंकाळी ०८.०० वाजता पकडून ताब्यात घेतले असुन, त्यास पुढील तपासकामी मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -२, गुन्हे शाखा, ठाणे, यांच्या  मार्गदर्शनाखाली पोनि. नरेश पवार, सपोनि. सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी. सुहास तावडे, सपोउपनिरी. संदीप भोसले, पोहवा. ठाकुर, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा. पावसकर, पोना. हासे, मधाळे, चापोना. हिवरे, पोशि. वायकर, ढाकणे यांनी यशस्वीपणे केली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.०४ एप्रिल रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील ३० भूप्रमाण केंद्रांचे उद्घाटन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई :- तहसिल कार्यालयामध्ये सुरू असलेल्या सेतु सेवा कार्यालयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील उप-अधीक्षक भूमी अभिलेख, ठाणे आणि उप-अधीक्षक भूमी अभिलेख, शहापूर या कार्यालयातील भुप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.०४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला.

या केंद्रामध्ये संगणकीकृत मिळकत पत्रिकेवरील फेरफार सर्व प्रकारचे ऑनलाईन फेरफार अर्ज, ई-मोजणी व्हर्जन २.० मधील सर्व प्रकारचे मोजणी नकाशे, मिळकतीच्या डिजिटल सही केलेले फेरफार, नोंदवही उतारे आणि ऑनलाईन अर्ज करायची सुविधा, तसेच नकाशे व स्कॅन अभिलेख याच्या डिजिटल सही केलेल्या नकला, जनतेला वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यापूर्वी भूमी अभिलेख विभागातील विविध प्रकारचे नकला मिळविण्यासाठी नक्कल अर्ज करण्यासाठी जनतेला कार्यालयात छापील अर्ज करून हेलपाटे घालावे लागत होते. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांची खाजगी संस्थेकडून आर्थिक पिळवणूक होत होती आणि सुविधा वेळेत मिळत नव्हत्या. परंतू आता भूप्रमाण केंद्राच्या माध्यामातून जनतेला सर्व सुविधा वेळेत आणि वाजवी दरात मिळाल्यामुळे प्रशासनातील विलंब कमी होऊन लोकाभिमुख प्रशासनाला हातभार लागणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण ३० भूप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले असून यामुळे भूमी अभिलेख खाते लोकाभिमुख होणार आहे.

ठाण्यात व्हॉट्सऍपवरून चालायचं सेक्स रॅकेट, दोन दलालांवर गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे शहरात व्हॉट्सऍपवरून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी एका दलालाला अटक केली आहे. तर दुसरा दलाल पसार झाला आहे. व्हॉट्सऍपवरून पीडित महिलेचा ग्राहकांना फोटो पाठवून वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन दलालांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांपैकी एका दलालाला झडप घालून पोलीसांनी अटक केली. मात्र, दुसरा दलाल पोलीसांना गुंगारा देत पसार झाला. निर्मल मंगर साव (वय: ५८ वर्षे) असे अटक केलेल्या दलालाचं नाव आहे. तर त्याचा साथीदार प्रदीप जाधव हा पसार झाला आहे.

पीडित महिलांना वेश्या व्यवसायासाठी पैशांचं आमिष दाखवून आरोपी हे सेक्स रॅकेट चालवत होते, अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

व्हॉट्सऍपवरून ग्राहकांशी करायचे संपर्क -

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दलाल प्रदीप आणि निर्मल या दोघांनी आपआपसात संगनमतानं एका ४५ वर्षीय महिलेला वेश्या व्यवसायासाठी पैशांचं आमिष दाखवलं. त्यानंतर पीडित महिलेचा वापर वेश्या व्यवसायासाठी करण्याकरिता व्हॉट्सऍपवरून आणि मोबाईल फोनद्वारे ग्राहकांशी संपर्क करण्यास सुरुवात केली.

दलाल निर्मलला अटक, पैसे जप्त -

पीडित महिलेला एका ठिकाणी वेश्या व्यवसयासाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार ३ एप्रिल रोजी सांयकाळच्या सुमारास भिवंडीतील बाबला कंपाऊंड भागात असलेल्या एका लॉजवर पोलीस पथकानं धाड टाकली. यावेळी पोलीसांनी दलाल निर्मलला अटक केली. त्याच्याकडील ७ हजार १२० रुपये रोख रक्कम जप्त केली. पीडित महिलेची भिवंडीतील एका लॉजमधून सुटका करण्यात आली.

पसार झालेल्या दुसऱ्या दलालाचा शोध सुरू -

दोन्ही दलालाविरोधात शांतीनगर ठाण्याचे पोलीस शिपाई भुषण नाना पाटील यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलीसांनी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पसार झालेल्या प्रदीपचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (प्रशासन) विनोद पाटील यांनी दिली. या या घटनेचा पुढील तपास विनोद पाटील करीत आहेत.

राज्यात कुठूनही करता येणार ऑनलाईन घर नोंदणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं. बऱ्याच वेळा लोकांना अनेक तास या कार्यालयांमध्ये ताटकळत बसावं लागतं. अनेकदा सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. काही वेळा, काही ठिकाणी दलाल पैसे उकळतात. हा सगळा प्रकार आता थांबणार आहे. कारण राज्य सरकारने घरांच्या नोंदणीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घरांची नोंदणी करता येईल. ही सगळी प्रक्रिया ऑनलाइन असेल. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर याबाबतची माहिती जाहीर केली आहे. महायुती सरकार राज्यात १ मे पासून ‘एक राज्य एक नोंदणी’ ही पद्धत सुरू करणार असल्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलं.

घरी बसून मुद्रांक नोंदणी करता येणार : बावनकुळे

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “घर खरेदी-विक्री करतेवेळी नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात जावं लागतं. तिथे अनेक हेलपाटे मारावे लागतात. नोंदणी करताना मध्ये दलालांचा अडथळा असतो. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी व गतीमान सरकारच्या १०० दिवसांच कार्यक्रम दिला होता, त्याअंतर्गत महसूल खात्याच्या मुद्रांक निरिक्षकांनी व महानिरिक्षकांनी एक चांगला उपक्रम पुढे आणला आहे. ‘एक राज्य एक नोंदणी’ अशी पद्धत आपलं सरकार सुरू करत आहे. त्याअंतर्गत राज्यातील कुठलीही नोंदणी, मुद्रांक नोंदणी घरी बसून करता येणार आहे.

१ मे पासून एक राज्य एक नोंदणी प्रक्रिया सुरू होणार : महसूल मंत्री

महसूल मंत्री म्हणाले, “तुम्ही एखादं घर खरेदी केलं असेल तर कुठेही बसून त्याची नोंदणी करता येईल. पुण्यात बसून नागपुरातील घराची, मुंबईत बसून पुण्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सगळी फेसलेस प्रक्रिया असेल. तुमचं आधार कार्ड व आयकर दस्तऐवजांच्या मदतीने तुम्ही फेसलेस नोंदणी करू शकता. ऑनलाइन मुद्रांक नोंदणी व ‘एक राज्य एक नोंदणी’ प्रक्रिया आपण १ मेपासून सुरू करत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी डिजीटल इंडिया, डिजीटल महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. आमचं सरकार त्यावर काम करत आहे.” सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मुंबई व उपनगरांत अशी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती जी आता राज्यभर सुरू होत आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जीवपेक्षा पैसा मोठा ; गर्भवतीचा दुर्दैवी अंत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे : पुण्यामधील दीनानाथ  मंगेशकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून घेण्यापूर्वी दवाखान्यात भरण्यासाठी दहा लाख रुपये नाहीत केवळ एवढ्या कारणासाठी एका बाळंतपणासाठी आलेल्या एका महिलेला एडमिट करून घेतलं गेलं नाही व परिणामी तिला जीवाला मुकावे लागले ही बाब अत्यंत खेदजनक असून दीनानाथ मंगेशकर सारख्या धर्मदाय आयुक्तकडे रजिस्टर असलेल्या हॉस्पिटल ने त्यांच्याकडील दहा ते पंचवीस टक्के बेड आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मोफत उपचारासाठी राखीव  ठेवण्याचा कायदा असतानाही भरण्यासाठी पैसे नाहीत या कारणासाठी त्या महिलेला ऍडमिट करून घेतले नाही आणि त्यातच तिचा जीव गेलेला आहे. नाव मोठं आणि लक्षण खोटं असणाऱ्या अशा या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा हा अत्यंत असंवेदनशील प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे.
       
वास्तविक पाहता धर्मदाय आयुक्त कडे नोंद असलेल्या सर्व हॉस्पिटल्सने दवाखान्याच्या बोर्डवर धर्मादाय आयुक्त संचलित असे लिहिण्याचा शासनाने कायदा केलेला आहे. अशी हॉस्पिटल निर्माण होत असताना शासनाच्या मालकीची जागा घेतात व शासनाकडून वेगवेगळ्या सवलती घेतात. इन्कम टॅक्स मधून सूट घेतात एवढेच नाही तर स्थानिक सरकारकडून पाणीपट्टी सूट, घरपट्टीत सूट सर्व प्रकारचे आर्थिक लाभ घ्यायचे आणि गोरगरिब पेशंट कडून सुद्धा अशा पद्धतीने पैसे घेतल्याशिवाय त्यांना उपचार द्यायचे नाहीत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे अशा या पैसे खाऊ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चा परवाना रद्द करणे गरजेचे आहे तसेच त्यांच्यावर मनुष्यधाचा गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.  वास्तविक पाहता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल त्या महिलेकडून किंवा तिच्या नातेवाईकांकडून पिवळ्या रेशन कार्ड व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ किंवा अगदी पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देऊ शकले असते. तथापि केवळ पैशाच्या हव्यासापोटी पैशाची मागणी करत बसलेल्या या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ने वरील योजनांचा लाभ देण्याऐवजी त्या महिलेला उपचार देण्याच्या टाळून पैसे हडपण्याच्या हेतूने अशा पद्धतीने उपचार करण्यात दिरंगाई केली. त्या महिलेला सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दवाखान्याच्या दारात बसून राहावं लागलं त्याच ठिकाणी तिला रक्तस्राव सुरू झाला. तिची मानसिक खच्चीकरण झाले आणि अशा  परिस्थितीत तिला जीवाला मुकावे लागले ही बाब अत्यंत खेदाची आहे या गोष्टीवर सर्वपक्षीय आंदोलन उभे राहणे गरजेचे आहे.

संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत त्यात सर्वात महत्वाचा जगण्याचा अधिकारच यामुळे नाकारला गेला आहे. सदर महिला ही एका आमदार साहेबाच्या पीए ची पत्नी होती. तिच्या साठी मंत्रालयातुन तिला ऍडमिट करून घ्या म्हणून ही फोन आला होता.  तरीही तिला ऍडमिट करून घेतले गेले नाही. याउलट तिला ससून हॉस्पिटलला न्या असे सांगितले. त्यामुळे नाईलास्तव तिला दुसरीकडे न्यावे लागले त्यामुळे उपचारासाठी विलंब झाला व महिलेला प्राणास मुकावे लागले. प्रसूती दरम्यान त्या महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या. हॉस्पिटल च्या अशा निष्काळजी पणामुळे मुलींना त्यांच्या आईला गमवावे लागले. सदर हॉस्पिटल वर कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे अशी पुण्यात सर्वत्र मागणी होत आहे.