BREAKING NEWS
latest

दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने अभिजात मराठीचा ‘ऑनलाईन जागर’ !


प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : दि २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.  या उपक्रमात आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.
    
या उपक्रमात कसे सहभागी व्हाल?

आपण स्वतः कवी, लेखक, कलाकार, गायक असाल तर आपल्या स्वरचित कवितेचा अथवा आपल्या कलाकृतीचा एक सुंदर व्हिडिओ तयार करून आम्हाला पाठवा. केवळ आपल्याच कविता नाही तर इतर मान्यवर कवींच्या कवितांचे सादरीकरणही (वाचन) आपण करू शकता. याबरोबरच गझल वाचन, गायन, लोककला सादरीकरण अशा अनेक स्वरूपात आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या ऑनलाईन जागरामध्ये आपण अभंग, पोवाडे, नाट्यछटा, लघुकथा, गायन, भारुड आधी कलांच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता. अभिजात मराठीच्या या उत्सवात आपला सहभाग हा आपल्या भाषेचा गौरव वाढविणारा ठरेल. तर चला मग करा रेकॉर्ड आपला व्हिडिओ आणि पाठवा आम्हाला.

“व्हिडिओ पाठवून सहभागी होण्याचे आवाहन”

आपले व्हिडिओ हे माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ या पोर्टल वर आणि महासंचालनालयाच्या राज्यभरातील कार्यालयांच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येतील.
    
आपले व्हिडिओ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ईमेल: <dgiprdlo@gmail.com> या ईमेलवर अथवा ९८९२६६०९३३ आणि ७५०४६९६७८६ या व्हॉट्सऍप क्रमांकावर तसेच ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या <diothane2013@gmail.com> अथवा 9503546004 या व्हॉट्सऍप क्रमांकावर पाठवावेत.
    
महाराष्ट्राला साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उत्सव साजरा करण्याची संधी आहे. आपल्या शब्दांनी आणि कलाकृतींनी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संस्मरणीय बनवावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या खालील समाजमाध्यमांवर उत्कृष्ट व्हिडिओ व कलाकृतीला प्रसिद्धी देण्यात येईल –
महासंवाद – <https://mahasamvad.in/> 
एक्स – <https://twitter.com/MahaDGIPR> 
फेसबुक – <https://www.facebook.com/MahaDGIPR> 
इन्स्टाग्राम – <https://www.instagram.com/mahadgipr> 
युट्यूब – <https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR>
टेलिग्राम चॅनल – <https://t.me/MahaDGIPR>

तरी, ९८ वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन जागर’ या उपक्रमात सहभागी व्हावे व आपल्या कलागुणांचा व्हिडिओ शेअर करून देश विदेशातील मराठी माणसांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळवावी, असे आवहन ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.

कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर : प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृती आणि सभ्यतेमध्ये हजारो वर्षापासून हा संगम आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळतो. भाविक जात, भाषा, पंथ विसरून कुंभमेळ्यात एकत्रित येतात. हा समाजाच्या एकतेचा योग असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

’महाकुंभ प्रयाग योग ‘ कार्यक्रमाला उपस्थिती

शहरातील रेशीमबाग मैदानात आयोजित ‘महाकुंभ प्रयाग योग’ कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. 'द सत्संग फाउंडेशन' नागपूर केंद्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, राजेश लोया, अमेय मेटे आदी यावेळी उपस्थित होते.

५० कोटींपेक्षा जास्त भाविकांनी आतापर्यंत कुंभमेळ्यात स्नान केले. ज्या भाविकांना कुंभमेळ्यात जाण्याचा योग आला नाही त्यांच्यासाठी प्रयागराज येथील संगमावरील जल नागपुरात आणण्यात आले. यासाठी महाकुंभ प्रयाग योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

आजवर कोट्यवधी भाविकांनी महाकुंभादरम्यान प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले आहे. पण ज्यांना तेथे जाणे शक्य नाही अशांनाही या पवित्र संगम जलाच्या स्नानाची अनुभूती व्हावी या अनुषंगाने प्रयागराज येथील जल रामटेकमार्गे नागपुरात आणण्यात आले होते. या अनुषंगाने महाकुंभ प्रयाग योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

साडे सहा हजार कुटुंब बेघर करणाऱ्या बिल्डर आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ? दीपेश म्हात्रे यांचा संतप्त सवाल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : साडे सहा हजार कुटुंबांना बेघर होऊ देणार नाही, त्यांच्या घरांवर कारवाई होऊ देणार नाही.. आदित्य ठाकरेंसह पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामावर मनपा कायदेशीर कारवाई करत असताना अनधिकृत इमारतींमधील नागरिकांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर त्या ६५ इमारतींमधील रहिवाशांच्या घरांवर तोडक कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या रहिवाशांना पाठिंबा दर्शवला आहे. या इमारतीमधील रहिवाशांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेत घरांवर कारवाई होऊ देणार नाही असे दीपेश म्हात्रे म्हणाले. याबाबत आदित्य ठाकरेंसह उद्धव बाळासाहेब ठाकरे व पक्षाचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असे सांगितले आहे.
दीपेश म्हात्रे यांनी “ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावर कारवाई, मात्र ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर कारवाई नाही हा कोणता न्याय ?" असा संतप्त  सवाल उपस्थित केला. यावेळी बोलताना ज्या कथित बिल्डरांवर गुन्हे दाखल झाले ते बिल्डर नाहीत, त्यामागचे सूत्रधार दुसरेच आहेत, खोटे कागदपत्र बनवले, खोटे कागदपत्रांच्या आधारे रजिस्ट्रेशन केले. शासनाची फसवणूक केली. मात्र याप्रकरणी खोटी कागदपत्र बनवणाऱ्यांवर कोणतीही कारवाई नाही, त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप देखील दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पत्रकारांना सांगितले. 
                               
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या खोट्या कागदपत्राच्या आधारे महारेरा प्रमाणपत्र मिळविलेल्या ६५ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर इमारत वाचविण्यासाठी न्यायलयात गेलेल्या 'साई गॅलेक्सी' इमारतीची याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावल्याने या इमारतीवर कारवाई होण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे या इमारती मधील रहिवासी हवालदिल झाले आहेत. आपल्याला खोटी कागदपत्र देऊन आपली फसवणूक करणाऱ्या विकासकांवर, पालिका अधिकाऱ्यांना रान मोकळे करून आपल्यावर अन्याय का असा प्रश्न या इमारती मधील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
                              
शिवसेना ठाकरे गटाने रहिवाशांच्या बाजूने आज मेळावा आणि पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी यावेळी याप्रकरणी बोलताना रहिवाशांचा कोणताही दोष नसताना त्यांच्यावर कारवाई होत आहे, मात्र ज्यांनी रेराचे खोटे कागदपत्र तसेच स्टॅम्प बनवले, खोटे रजिस्ट्रेशन केले त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, या प्रकरणात अशा कोणत्याही व्यक्तीला अटक केलेली नाही. मग कारवाई फक्त दिखाव्यासाठी होती का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
या प्रकरणाची ६५ बिल्डरांची जी यादी दिली ते खरे बिल्डर नाही, डमी उभे केले आहेत, या यादीत प्रत्यक्ष त्या बांधकाम साईटवर काम करणारे इलेक्ट्रिशन, प्लंबर, लेबर यांची बिल्डर म्हणून नावे आहेत. त्यांची बांधकाम व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. हे एक मोठे रॅकेट आहे, या रॅकेटला राजकीय वरदहस्त आहे. ते उघड झाले पाहिजे अशी मागणी यावेळी म्हात्रे यांनी केली. या रहिवाशांच्या पाठीशी उद्धव  बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष खंबीरपणे उभा आहे असे दीपेश  म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.